कथा संघर्षाची : संघर्षातून झळाळी घेतलेली सुवर्णकन्या अन्नू राणी
अन्नूच्या खेळाला कुटुंबीयांचा विरोध होता, पण तो न जुमानता तिने आपला भालाफेकीचा सराव सुरूच ठेवला आणि आशियाई स्पर्धेत भारताची मान उंचावली. टीम सलाम ज्या समाजामध्ये मुलींनी फक्त घर सांभाळावं, पोरंबाळं सांभाळावीत आणि पुढचं आयुष्य नवऱ्याच्या मर्जीने घालवावं असा अलिखित नियम आहे, तिथे महिलांनी खेळाडू बनणं आणि त्यामध्ये करियर करणं अजिबात सोपं नसतं. पण काही महिला या नियमांना फाट्यावर मारून आपापला मार्ग चोखळतात आणि यशस्वी होतात. उत्तर प्रदेशातल्या 31 वर्षीय अन्नू राणी हिने अशीच कामगिरी करून दाखवली आहे. नुकत्याच चीनमध्ये पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अन्नूने भालाफेक खेळात सुवर्णपदक पटकावून इतिहास रचला. ती 73 वर्षांच्या आशियाई स्पर्धेच्या इतिहासात भालाफेकीमध्ये सुवर्णपदक पटकावणारी पहिलीच भारतीय महिला ठरली. तिची कामगिरी जितकी मोठी होती तितकाच प्रवास कठीण होता. अन्नूचा जन्म शेतकरी कुटुंबातला. तीन बहिणी आणि दोन भावांमध्ये ती सर्वांत लहान. मोठा भाऊ उपेंद्र आणि इतर चुलत भावंडं शाळा-कॉलेजांतल्या खेळांच्या स्पर्धेत भाग घ्यायचे. उपेंद्र त्या वेळी विद्यापीठ स्तरावर धावण्याच्या आणि भालाफेक ...