कथा संघर्षाची : संघर्षातून झळाळी घेतलेली सुवर्णकन्या अन्नू राणी
अन्नूच्या खेळाला कुटुंबीयांचा विरोध होता, पण तो न जुमानता तिने आपला भालाफेकीचा सराव सुरूच ठेवला आणि आशियाई स्पर्धेत भारताची मान उंचावली.
टीम सलाम
ज्या समाजामध्ये मुलींनी फक्त घर सांभाळावं, पोरंबाळं सांभाळावीत आणि पुढचं आयुष्य नवऱ्याच्या मर्जीने घालवावं असा अलिखित नियम आहे, तिथे महिलांनी खेळाडू बनणं आणि त्यामध्ये करियर करणं अजिबात सोपं नसतं. पण काही महिला या नियमांना फाट्यावर मारून आपापला मार्ग चोखळतात आणि यशस्वी होतात. उत्तर प्रदेशातल्या 31 वर्षीय अन्नू राणी हिने अशीच कामगिरी करून दाखवली आहे. नुकत्याच चीनमध्ये पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अन्नूने भालाफेक खेळात सुवर्णपदक पटकावून इतिहास रचला. ती 73 वर्षांच्या आशियाई स्पर्धेच्या इतिहासात भालाफेकीमध्ये सुवर्णपदक पटकावणारी पहिलीच भारतीय महिला ठरली. तिची कामगिरी जितकी मोठी होती तितकाच प्रवास कठीण होता.
अन्नूचा जन्म शेतकरी कुटुंबातला. तीन बहिणी आणि दोन भावांमध्ये ती सर्वांत लहान. मोठा भाऊ उपेंद्र आणि इतर चुलत भावंडं शाळा-कॉलेजांतल्या खेळांच्या स्पर्धेत भाग घ्यायचे. उपेंद्र त्या वेळी विद्यापीठ स्तरावर धावण्याच्या आणि भालाफेक स्पर्धांमध्ये भाग घेत असे. भावंडांना बघून तिला खेळात आवड निर्माण झाली आणि तीही खेळाकडे वळली. पहाटे चार वाजता उठून ती भावासोबत धावायला जायची. अन्नू क्रिकेट खेळत होती. खेळताना ती चेंडू ताकदीने फेकायची. ते पाहून मोठ्या भावाला वाटलं, अन्नूही चांगला भाला फेकू शकते. तो तिला सरावाला घेऊन जाऊ लागला.
पण भालाफेकीसाठी भाला लागतो. तो खरेदी करण्यासाठी अन्नूकडे पैसे नव्हते. तेव्हा तिने शेतातला ऊस तोडून त्याचा भाला बनवला. शेताशेजारच्या पायवाटेवर त्या भाल्याने ती सराव करू लागली. वडिलांना मात्र तिचं खेळणं आवडायचं नाही. तिने काही महिने वडिलांपासून लपवून सराव सुरू ठेवला. हळूहळू ती शालेय स्तरांवरच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली. अन्नू सांगते, “मी भालाफेक स्पर्धांमध्ये भाग घेतेय, हे माझ्या कुटुंबातल्या कोणालाच माहीत नव्हतं. मी मुलगी असल्याने घराबाहेर पडायचं नाही, खेळायचं नाही अशी घरातून ताकीदच होती.”
एका स्पर्धेत अन्नूने भालाफेकीत पहिलं बक्षीस पटकावलं. त्यानंतर कोणी तरी शाळेतून अन्नूच्या वडिलांना फोन करून याबद्दल कळवलं. वडील तडक शाळेत पोहोचले आणि वडिलांनी अन्नूला चांगलंच फैलावर घेतलं. ती प्रचंड निराश झाली. पण अन्नू इथे थांबली नाही. तिने आणखी मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. तिथेही तिने पदकांची कमाई केली.
मोठ्या स्पर्धांमध्ये पदके जिंकू लागल्यावरही अन्नूच्या वडिलांना तिचं खेळणं पटत नव्हतं. उलट, एकदा ते शाळेतल्या प्रशासनावरच डाफरले आणि म्हणाले, “आम्ही आमच्या मुलींना गावाबाहेर खेळायला पाठवत नाही. तुम्ही पालकांच्या परवानगीशिवाय मुलींच्या स्पर्धा आयोजितच कशा करता?” वडिलांनी अन्नुला पुन्हा कोणत्या स्पर्धेला जायचं नाही, अशी तंबी दिली. अन्नू सांगते, “खेळासाठी लागणारा टी-शर्ट घातला तरी कुटुंबातले लोक माझ्यावर रागवायचे. एकदा टी-शर्ट घातला म्हणून घरी शिवीगाळदेखील झाली होती.”
एकदा अन्नूचे प्रशिक्षक तिच्या वडिलांकडे गेले. प्रशिक्षकांनी ‘अन्नू चांगलं खेळते, तिला स्पर्धेसाठी पाठवा' असं सांगितलं. पण तिच्या वडिलांनी ‘मी प्रत्येक स्पर्धेत स्वतः अन्नूसोबत येणार' अशी अट घातली. अन्नू वडिलांना सोबत घेऊन स्पर्धेला जाऊ लागली. नंतर प्रशिक्षकांनी यावर आक्षेप घेतला. पण वडील त्यांच्या अटीवर अडून राहिले.
अन्नूसाठी हाच एक अडथळा नव्हता. खेळासाठी लागणारं साहित्य विकत घेण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. अन्नू सांगते, “स्पर्धांना जाण्यासाठी मी रेल्वेने प्रवास करायचे. तेव्हा माझ्याकडे तिकीटासाठीही पैसे नसायचे. मी अनेकदा विनातिकीट प्रवास केला. स्पर्धेत भाग घेण्यासाठी बूट आणि किट लागतं, तेही माझ्याकडे नसायचं. मी माझ्या मैत्रिणींचे किंवा भावाचे बूट घालायचे.” अन्नूचा मोठा भाऊ उपेंद्र सांगतो, “अन्नूकडे शूज नव्हते, तेव्हा मी वर्गणी गोळा करून बहिणीसाठी बूट खरेदी केले होते.”
अन्नूचा मोठा भाऊ उपेंद्र या खेळातला माहीतगार आणि अनुभवी माणूस होता. खेळाची आवड आणि कौशल्यं बघून त्याने अन्नूला एका ॲकॅडमीत दाखल केलं. ती आठवड्यातून तीन दिवस त्या ॲकॅडमीच्या मैदानावर भालाफेकीचा सराव करायला जाऊ लागली. दोन खेळाडूंचा खर्च परवडेल अशी कुटुंबाची परिस्थिती नव्हती. हे लक्षात घेऊन मोठ्या भावाने व्यावसायिक खेळातून माघार घेतली आणि बहिणीला लागेल ती मदत करण्यास सुरुवात केली.
अन्नूने तिचा सराव सुरू ठेवला. पुढे तिने भालाफेकीमध्ये चमकदार कामगिरी केली. तिचेच विक्रम मोडून ती राष्ट्रीय स्पर्धेत विजेती ठरली. यानंतर अन्नूने मागे वळून पाहिलं नाही. पुढे तिने ऑलिंपिकसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. आशियाई स्पर्धांमध्ये कांस्य आणि रौप्य, तर नुकत्याच चीनमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली. आता अन्नूचं ऑलिंपिकमध्ये पदक पटकावण्याचं ध्येय आहे.
अन्नूचा इथपर्यंतचा प्रवास असामान्य राहिलेला आहे. अन्नू म्हणते, “माझ्यासारख्या हलाखीच्या परिस्थितीतून येणाऱ्या खेळाडूंना मी सांगू इच्छिते, की त्यांनी हार मानू नये, त्यांनी स्वत:साठी लढावं. मुली कोणतंही लक्ष्य गाठू शकतात.'
जेव्हा मला माझ्या मुलीच्या कामगिरीबद्दल गावातल्या लोकांकडून कळलं तेव्हा मला किती आनंद झाला हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मला आधी भीती वाटायची, की अन्नूला खेळासाठी घरापासून खूप लांब लांब जावं लागेल. पण आता तर तिने चीनमध्ये जाऊन भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं. तिने केवळ तिच्या कुटुंबाचं आणि गावाचं नाही, तर संपूर्ण देशाचं नाव मोठं केलं आहे. मला माझ्या मुलीच्या प्रतिभेचा केवळ अभिमान वाटतो.
- अमरपाल सिंग, अन्नूचे वडील
अंक - नोव्हेंबर 2023
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा