कथा संघर्षाची : जिद्दी क्रिकेटर ओंकार रौंदाळे
ओंकारने अपघातात एक पाय गमवलेला असतानाही आत्मविश्वास आणि सरावाच्या जोरावर दिव्यांग क्रिकेटविश्वात त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे. त्याच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊ या... अर्जुन नलवडे तीन वर्षांपूर्वी झालेल्या कार अपघातात ओंकारने आपला एक पाय गमावला. त्यातून त्याने स्वतःला सावरलं आणि लहानपणीचा आपला क्रिकेटचा छंद जोपासायला सुरुवात केली. तो जिद्दीने प्रॅक्टिस करत राहिला. त्याला मुंबई टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करत त्याने स्वतःला सिद्ध केलं. आज ओंकार महाराष्ट्र क्रिकेट व्हीलचेअर संघाचं नेतृत्व करतो. त्याची टीम विविध राज्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करताना दिसते. ओंकार रौंदाळे सामान्य घरातील मुलगा. तोही काही वर्षांपूर्वी इतरांसारखं चालायचा, धावायचा, खेळायचा. बारावीनंतर त्याने ‘बीएससी इन एमएलटी'(वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान)मध्ये प्रवेश घेतला अन् दोन हजार पगाराची नोकरी करत शिक्षण घेऊ लागला; पण कोरोना महामारी आली आणि सगळंच बंद पडलं. तो वडिलांच्या कामात त्यांना मदत करू लागला. वडिलांसोबत रुग्णांचं कोविड-19चं सॅम्पल घेऊन तो तपासणीचं काम करू लागला. त्यातून चांगली कमाई होऊ ...