कथा संघर्षाची : जिद्दी क्रिकेटर ओंकार रौंदाळे
ओंकारने अपघातात एक पाय गमवलेला असतानाही आत्मविश्वास आणि सरावाच्या जोरावर दिव्यांग क्रिकेटविश्वात त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे. त्याच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊ या...
अर्जुन नलवडे
तीन वर्षांपूर्वी झालेल्या कार अपघातात ओंकारने आपला एक पाय गमावला. त्यातून त्याने स्वतःला सावरलं आणि लहानपणीचा आपला क्रिकेटचा छंद जोपासायला सुरुवात केली. तो जिद्दीने प्रॅक्टिस करत राहिला. त्याला मुंबई टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करत त्याने स्वतःला सिद्ध केलं. आज ओंकार महाराष्ट्र क्रिकेट व्हीलचेअर संघाचं नेतृत्व करतो. त्याची टीम विविध राज्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करताना दिसते.
ओंकार रौंदाळे सामान्य घरातील मुलगा. तोही काही वर्षांपूर्वी इतरांसारखं चालायचा, धावायचा, खेळायचा. बारावीनंतर त्याने ‘बीएससी इन एमएलटी'(वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान)मध्ये प्रवेश घेतला अन् दोन हजार पगाराची नोकरी करत शिक्षण घेऊ लागला; पण कोरोना महामारी आली आणि सगळंच बंद पडलं. तो वडिलांच्या कामात त्यांना मदत करू लागला. वडिलांसोबत रुग्णांचं कोविड-19चं सॅम्पल घेऊन तो तपासणीचं काम करू लागला. त्यातून चांगली कमाई होऊ लागली होती. याच वेळी त्याच्या आईलाही कोरोनाची लागण झाली. एकीकडे ‘लॅब'चं काम वाढत होतं, तर दुसरीकडे आईचं आजारपण होतं. आईला दवाखान्यात घेऊन जाणं, तिला दुचाकीवरून दवाखान्यातून घरी आणणं शक्य नव्हतं, आणि लोकांच्या सॅम्पल्स घेण्यासाठीही दूर जावं लागत होतं. यात खूपच धावपळ व्हायची.
ओंकार आणि त्याच्या वडिलांनी विचार केला, की एखादी जुनी चारचाकी घ्यावी. त्यानुसार वडिलांच्या मित्राची चारचाकी विकत घेण्याचं ठरलं. ओंकारने ‘टेस्ट ड्राइव्ह'साठी 2-3 दिवसांसाठी गाडी स्वतःकडे ठेवून घेतली. 27 मे 2021 हा दिवस उजाडला. आपल्या दोन मित्रांना (एक मित्र डॉक्टर होता) घेऊन तो ड्राइव्हसाठी घरातून बाहेर पडला. त्याने नॉर्मल स्पीडने पुणे-मुंबई महामार्गावर गाडी आणली. त्याने गाडीचा वेग वाढवला. गाडी वेगात असतानाच किवळे एक्झिट ब्रिजवर गाडीचा टायर फुटला. ती बाजूच्या सेफ्टी बॅरिअर्सला जाऊन जोरात धडकली. जवळपास 60 मीटरपर्यंत गाडी फरफटत गेली. यात सेफ्टी बॅरिअर्सला लावलेला ॲल्युमिनियचा पत्रा ओंकारच्या मांडीत घुसला. सुदैवाने त्याच्या मित्रांना काही दुखापत झाली नाही. डॉक्टर मित्राने तातडीने बाहेर पडून अँब्युलन्सला फोन केला.
तोपर्यंत अपघाताच्या ठिकाणी पाहणाऱ्यांची गर्दी झाली होती. काहीजण ओंकारला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते; पण डॉक्टर मित्राने विरोध केला. कारण त्याला बाहेर काढलं तर रक्तस्राव जास्त होऊन जीवाला धोका निर्माण होईल अशी भीती होती. ओंकार सांगतो, “त्या वेेळी माझ्या डोळ्यांवर अंधारी येत होती. लहानपणापासून आतापर्यंतचा सगळा प्रवास आठवत होता. माझ्यानंतर आई-बाबांचं काय, हा प्रश्नही डोक्यात येत होता. जमलेले लोकही मी वाचणार नाही असंच बोलत होते. तेव्हा माझ्यात जगण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. तोपर्यंत अँब्युलन्स आली. तिथेच उपचार सुरू झाला. बचाव दल, फायर बिग्रेड, रेस्क्यू टीम आल्या; पण मला बाहेर काढता येईना. शेवटी गाडीचं स्टेअरिंग आणि पत्रा कटरने कापून मला बाहेर काढलं.”
दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ओंकार जागा झाला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं, की आपला एक पाय नाहीये आणि आपल्याला खाटेला बांधून ठेवलंय. त्याने आपला पाय गमावलाय, या गोष्टीचा त्याला मानसिक धक्का बसून त्याने मोठी हालचाल करू नये म्हणून त्याला खाटेला बांधून ठेवलं होतं. ओंकार सांगतो की ‘हॉस्पिटलमध्ये माझा पाय कापला गेल्याचं कळलं तेव्हा मी नॉर्मल होतो. कारण मृत्यूच्या दारातून बाहेर पडलो हेच माझ्यासाठी खूप होतं. आई-बाबांना धक्का बसला होता, पण ते तसं दाखवत नव्हते. या आजारपणातून बाहेर पडण्यासाठी आई, बाबा, मावस भाऊ आणि मैत्रीण वर्षा यांची खूप मदत झाली. वर्षाने तर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच अशा परिस्थितीतही माझ्याशी लग्न केलं.' ओंकारला डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितलं होतं. या काळात त्याने स्वतःच्या भविष्याबाबत खूप विचार केला.
स्वतःची लॅब सुरू करणं हे ओंकारच्या वडिलांचं स्वप्न होतं. ओंकारने अपघातानंतर वर्षभरातच वानवडीत स्वतःची ‘पॅथालॉजी लॅब' सुरू केली आणि वडिलांचं स्वप्न साकार केलं. ओंकारने आता स्वतःच्या स्वप्नांकडे लक्ष द्यायचं ठरवलं. लहानपणापासून क्रिकेटची आवड असल्यामुळे सोशल मीडियावर थोडी शोधाशोध करून माहिती मिळवली. त्यातून व्हीलचेअर क्रिकेटसंबंधी माहिती मिळाली. पुढे तो मुंबईच्या व्हीलचेअर क्रिकेट टीममध्ये सहभागी झाला. त्याने चमकदार कामगिरी केली. त्यातून महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट टीम तयार करण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली. त्याने सोशल मीडियाचा आणि दिव्यांग लोकांच्या व्हॉट्सअप ग्रुपचा आधार घेत संपूर्ण महाराष्ट्रातून 6-7 दिव्यांग खेळाडूंची निवड केली.
आज ओंकार महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट संघाचं नेतृत्व करतोय. त्याच्या टीमने आतापर्यंत छत्तीसगड, मध्य प्रदेश, गोवा अशा राज्यांमधून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. मान्यवरांकडून त्याचा सत्कारही झालेला आहे. त्याच्या संघातील सर्व खेळाडू महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशनचे सभासदही झालेत. ओंकार सांगतो, की ‘आज माझा एक पाय नाही, पण मी साधारण व्यक्तीसारखं सर्व काही करू शकतो. दुचाकी, चारचाकी चालवतो. स्विमिंग करतो, दुर्गभ्रमंती करतो. पायी चालत पंढरीची वारी करतो.' अपघातात एक पाय गमावूनही ओंकारने प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर स्वतःचं आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. ओंकार म्हणतो, “आयुष्यात कितीही मोठा आघात झाला, तरीही खचून न जाता पुन्हा नव्याने कामाला लागलं की जिद्दीने तुमची आणि तुमच्या जवळच्या लोकांची स्वप्नं तुम्ही पूर्ण करू शकता.”
आपण कोणतंही आवडीचं काम करताना सहज म्हणतो, की ‘मी एका पायावर तयार आहे'. पण तीच म्हण ओंकारला तंतोतंत लागू पडते. कारण आज तो कोणतंही काम करण्यासाठी एका पायावर तयार असतो. ओंकारच्या या जिद्दीला खरोखरच सलाम!
अंक - जुलै 2024
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा