कथा संघर्षाची : बॉक्सर आयकॉन रेखा यळगुंदे
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नॉकआऊट पंच मारणं हे रेखाचं स्वप्न आहे. उद्या कदाचित तिचं हे स्वप्नं साकार होईलही. पण आज रेखा कित्येक मुला-मुलींसाठी आयकॉन आहे. योगेश जगताप महंमदवाडीत राहणारी रेखा यळगुंदे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंग खेळणं हे तिचं एक स्वप्नं आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलं-मुली अशी स्वप्नं क्वचितच पाहतात. कारण तशी स्वप्नं दाखवणारंही आसपास कुणी नसतं. रेखालाही सुरूवातीला कोणाचं मार्गदर्शन नव्हतं. पण आपला कल लक्षात आला की स्वप्नंही सापडतातच. तिच्या स्वप्नाचंही असंच आहे. रेखाच्या वडिलांची पान-सिगरेटची टपरी होती. आर्थिक परिस्थिती बेताची. त्यामुळे ‘मुलं शिकली तरच पुढे त्यांना भविष्य आहे' असं वडिलांना वाटायचं. म्हणून रेखाने अभ्यास करावा, खेळण्यात वेळ घालवू नये अशी त्यांची अपेक्षा होती. ती नियमित शाळेत जायची. पण तिचं मन रमायचं शाळेतल्या मैदानावर. तिला खो खो किंवा कबड्डीत जास्त मजा यायची. घरी आल्यावरही ती पुन्हा शेजारच्या मुलांमुलींसोबत खेळायची. सतत खेळायचंच वेड असल्याने तिच्यावर घरचे रागवायचे. पण तिचं मन वारंवार मैदानावरच जायचं. रेखा यळगुंदे रेखा सातवीत होती तेव्हाची घटना. शाळेती...