कथा संघर्षाची : बॉक्सर आयकॉन रेखा यळगुंदे

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नॉकआऊट पंच मारणं हे रेखाचं स्वप्न आहे. उद्या कदाचित तिचं हे स्वप्नं साकार होईलही. पण आज रेखा कित्येक मुला-मुलींसाठी आयकॉन आहे.

योगेश जगताप

महंमदवाडीत राहणारी रेखा यळगुंदे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंग खेळणं हे तिचं एक स्वप्नं आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलं-मुली अशी स्वप्नं क्वचितच पाहतात. कारण तशी स्वप्नं दाखवणारंही आसपास कुणी नसतं. रेखालाही सुरूवातीला कोणाचं मार्गदर्शन नव्हतं. पण आपला कल लक्षात आला की स्वप्नंही सापडतातच. तिच्या स्वप्नाचंही असंच आहे.

रेखाच्या वडिलांची पान-सिगरेटची टपरी होती. आर्थिक परिस्थिती बेताची. त्यामुळे ‘मुलं शिकली तरच पुढे त्यांना भविष्य आहे' असं वडिलांना वाटायचं. म्हणून रेखाने अभ्यास करावा, खेळण्यात वेळ घालवू नये अशी त्यांची अपेक्षा होती. ती नियमित शाळेत जायची. पण तिचं मन रमायचं शाळेतल्या मैदानावर. तिला खो खो किंवा कबड्डीत जास्त मजा यायची. घरी आल्यावरही ती पुन्हा शेजारच्या मुलांमुलींसोबत खेळायची. सतत खेळायचंच वेड असल्याने तिच्यावर घरचे रागवायचे. पण तिचं मन वारंवार मैदानावरच जायचं.

रेखा यळगुंदे

रेखा सातवीत होती तेव्हाची घटना. शाळेतील मैदानावर तेव्हा नुकतेच कराटे वर्ग सुरू झाले होते. आपणही या कराटे क्लासला जावं असं तिला वाटत होतं. पण त्या क्लासची फी देणं घरच्यांना शक्य नाही, याचीही तिला जाणीव होती. पण मनातली इच्छा कराटे खेळणाऱ्या मुलांप्रमाणे उसळत होती. करणार काय? ती  नेहमी मैदानावरचा कराटेचा सराव दूरूनच बघत बसायची. सरावावरून तिचं लक्ष हटत नव्हतं. एकदा क्लासच्या सरांनी तिला हटकलं. तेव्हा ‘आपण चोरून कराटे क्लास बघतोय' याची जाणीव झाली. रेखा गडबडली. तिने सरांना सांगितलं, मला कराटे आवडतं. पण मी फी नाही भरू शकत. म्हणून फक्त पाहते. रेखाचं हे उत्तर ऐकून सरांनी तिला विनामोबदला कराटे क्लासला यायची मुभा दिली. रेखाच्या आवडीचं रूपांतर करिअरमध्ये करणारा हा एक टर्निंग पॉईंट होता.

खो खो, कबड्डीतून रेखा कराटेकडे वळली. त्यासोबतच ती किकबॉक्सिंग खेळू लागली. नवं ध्येय रेखाला खुणावू लागलं. तासंतास ती कराटे व किकबॉक्सिंगचा सराव करण्यातच घालवू लागली. खेळांमधूनही करिअर घडू शकतं, अभ्यास फक्त एका वर्गातून दुसऱ्या वर्गात पास होण्यापुरताच केला तरी चालेल हे तिने ओळखलं. आपल्या आवडीच्या क्षेत्रातच अधिक लक्ष घातलं तर यशाची शक्यता जास्त असते. हे तिला जाणवलं होतं. त्यामुळे घरच्यांची नाराजी सहन करूनही ती खेळात राहिली.

वयाच्या तेराव्या वर्षी रेखाने किकबॉक्सिंग शिकायला सुरूवात केली. सोळाव्या वर्षी देहरादूनमधील शाळास्तरीय राष्ट्रीय स्पर्धेत तिनं पहिलं सुवर्ण पदक मिळवलं. हे यश पाहून तिचे वडिल सुखावले. आपल्या मुलीला पुस्तकी शिक्षणापेक्षा खेळात गती आहे, त्यामध्ये ती नाव कमावू शकते असा आत्मविश्वास वडिलांनी आला.

शाळास्तरावर रेखाने किकबॉक्सिंगमध्ये चमकदार कामगिरी केली. पण विद्यापीठ स्तरावर किकबॉक्सिंगचा समावेश नव्हता, म्हणून मग तिने बॉक्सिंगकडे मोर्चा वळवला. भवानी पेठेतल्या वस्ताद लहुजी साळवे क्रीडा संकुलात ती बॉक्सिंगचा सराव करू लागली.

महाविद्यालयीन स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धांत रेखाने उत्तम यश मिळवलं. त्यामुळे विद्यापीठ स्तरावर तिची निवड झाली. या स्पर्धेत तिने सुवर्ण पदक मिळवलं. मग राष्ट्रीय स्पर्धेतही तिची निवड झाली. चंडीगढ आणि हरियाणात पार पडलेल्या नॅशनल गेम्समध्ये तिने सुवर्ण आणि रौप्य पदकं पटकावली. कात्रजजवळच्या एका वस्तीत जन्मलेल्या तिने राष्ट्रीय स्पर्धेत पदकं मिळवून फारच मोठा पल्ला गाठला होता. त्यामुळे वस्तीतल्या नागरिकांनी रेखाची मिरवणूक काढली. आपल्या वस्तीला आपला अभिमान वाटावा यासारखा सन्मान नाही. तो तिला मिळाला.

सहसा लग्नानंतर मुलींना खेळामध्ये करिअर करणे अवघड बनतं. म्हणून रेखाने खेळांची आवड असलेलाच जोडीदार निवडला. अभिजित चोरमले यांच्यासोबत तिचा विवाह झाला. अभिजित जिम इन्स्ट्रक्टर आहेत. तिने करियरकडेच लक्ष द्यावं असंच अभिजितला वाटतं. त्यामुळे ‘लग्न झालं म्हणजे करिअर सपतं' या समजुतीला छेद देत रेखा आपलं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

अलीकडील ऑलिम्पिक स्पर्धांत मेरी कॉम आणि नंतर लव्हलीना बोर्गोहेन या मुलींनी भारताला बॉक्सिंगमध्ये पदकं मिळवून दिलीत. या खेळाडूही गरीब कुटुंबातल्याच. परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर या मुली भारतीय तरूणांच्या आदर्श ठरल्या आहेत. संधी मिळाली तर कदाचित रेखाही उद्याची आयकॉन ठरेल.

रेखामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूचे गुण आहेत. मेहनतीला ती आजिबात कमी पडत नाही. दररोज सरावासाठी ती न चुकता हजर राहते. स्वतःसोबत इतर खेळाडूंचाही सराव ती घेते. ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्नं ती खरं करेल याची मला खात्री आहे. 

- विजय गुजर, बॉक्सिंग प्रशिक्षक

अंक - फेब्रुवारी 2022


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वस्तीतले धडपडे : पुण्यातल्या तृतीयपंथीयांच्या सन्मानासाठी झटणाऱ्या चांदणी गोरे

वस्तीतले धडपडे : विद्यार्थ्यांच्या रूपात स्वत:चं स्वप्न पूर्ण करणारा हनुमंत रेगी

कथा संघर्षाची : रॉकस्टार मंगलताई