कथा संघर्षाची : संघर्ष लॉर्ड रिंकू सिंगचा!
सिलिंडर डिलिव्हरी करणाऱ्या बापाच्या मुलाने जगभरातल्या क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. क्रिकेट खेळण्यासाठी सतत मार खावा लागलेल्या रिंकूने स्वतःला कसं घडवलं त्याची ही गोष्ट... टीम सलाम 2023च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सला जिंकण्यासाठी गुजरात टायटन्स संघाविरुद्ध 5 चेंडूंत 28 धावांची आवश्यकता होती. स्ट्राइकवर होता रिंकू सिंग. फारसा प्रसिद्ध नसणाऱ्या रिंकूने पाच चेंडूंवर पाच षट्कार लावून संपूर्ण क्रिकेटविश्वाला धक्का दिला. तेव्हापासून रिंकू भारतातल्या कोट्यवधी लोकांना माहीत झाला. त्याचं नाव अलिगढ इथल्या एका स्टेडियमला देण्यात आलं. पुढे त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड करण्यात आली. त्याची कामगिरी सगळ्यांनी बघितलीच; पण ज्या परिस्थितीत त्याने हे यश मिळवलं ते पाहणंही महत्त्वाचं आहे. रिंकूचा जन्म उत्तर प्रदेशातल्या अलिगढ जिल्ह्यातला. त्याचे वडील खानचंद्र सिंग हे एलपीजी सिलिंडर डिलिव्हरीचं काम करायचे, आजही करतात. रिंकूची आई वीणादेवी सिंग गृहिणी. गॅसच्या गोडाऊनशेजारी असलेल्या दोन खोल्यांमध्ये त्यांचा संसार होता. खानचंद्र आणि वीणादेवी यांना एकूण 5 मुलं. रिंकू त्यात तिसरा. रिंकूला श...