कथा संघर्षाची : संघर्ष लॉर्ड रिंकू सिंगचा!
सिलिंडर डिलिव्हरी करणाऱ्या बापाच्या मुलाने जगभरातल्या क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. क्रिकेट खेळण्यासाठी सतत मार खावा लागलेल्या रिंकूने स्वतःला कसं घडवलं त्याची ही गोष्ट...
2023च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सला जिंकण्यासाठी गुजरात टायटन्स संघाविरुद्ध 5 चेंडूंत 28 धावांची आवश्यकता होती. स्ट्राइकवर होता रिंकू सिंग. फारसा प्रसिद्ध नसणाऱ्या रिंकूने पाच चेंडूंवर पाच षट्कार लावून संपूर्ण क्रिकेटविश्वाला धक्का दिला. तेव्हापासून रिंकू भारतातल्या कोट्यवधी लोकांना माहीत झाला. त्याचं नाव अलिगढ इथल्या एका स्टेडियमला देण्यात आलं. पुढे त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड करण्यात आली. त्याची कामगिरी सगळ्यांनी बघितलीच; पण ज्या परिस्थितीत त्याने हे यश मिळवलं ते पाहणंही महत्त्वाचं आहे.
रिंकूचा जन्म उत्तर प्रदेशातल्या अलिगढ जिल्ह्यातला. त्याचे वडील खानचंद्र सिंग हे एलपीजी सिलिंडर डिलिव्हरीचं काम करायचे, आजही करतात. रिंकूची आई वीणादेवी सिंग गृहिणी. गॅसच्या गोडाऊनशेजारी असलेल्या दोन खोल्यांमध्ये त्यांचा संसार होता. खानचंद्र आणि वीणादेवी यांना एकूण 5 मुलं. रिंकू त्यात तिसरा. रिंकूला शाळेमध्ये, अभ्यासात रस नव्हता. अभ्यासाचा प्रचंड कंटाळा असणाऱ्या या मुलाला क्रिकेट या खेळाची जाम आवड होती. दिवसातले किमान तीन ते चार तास क्रिकेट खेळणं त्याच्याकडून अजिबात चुकत नव्हतं. या गोष्टीचा त्याच्या वडिलांना फार राग यायचा. वडील रिंकूला फटकवायचे. पुढे इयत्ता नववीत असताना रिंकू नापास झाला, त्याचं कारणही क्रिकेट.
रिंकूच्या वडिलांची कमाई जेमतेम पाच ते सहा हजार रुपये होती. एवढ्यात घर चालवणं त्यांच्यासाठी कठीण होतं. म्हणून रिंकूच्या दोन मोठ्या भावांनी काम करायला सुरुवात केली. एक भाऊ रिक्षा चालवू लागला, तर दुसरा कोचिंग सेंटरमध्ये शिकवणी घेऊ लागला. रिंकूनेही काम करण्याचा विचार केला; पण शिक्षण नसल्याने त्याला चांगलं काम मिळत नव्हतं. शेवटी मोठ्या भावाच्या कोचिंग सेंटरला त्याला झाडू मारण्याचं आणि फरशी पुसण्याचं काम मिळालं. मात्र, हे काम करून आपण घरच्या अडचणी दूर करू शकत नाही असं रिंकूला वाटलं. त्याने आपली अडचण आईला बोलून दाखवली आणि कामाला जायला नकार दिला.
रिंकू पुन्हा क्रिकेटकडे वळला. गल्ली क्रिकेटमध्ये रिंकू चांगलाच प्रसिद्ध झाला. अशाच एका गल्ली क्रिकेटच्या स्पर्धेत रिंकूला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार म्हणून रिंकूला नवी कोरी मोटरसायकल मिळाली. हे पाहून रिंकूच्या वडिलांना भलताच आनंद झाला. ‘तुझी इच्छा आहे ना क्रिकेट खेळायची, बिनधास्त खेळत राहा' असं म्हणत त्यांनी रिंकूला क्रिकेटसाठी पाठिंबा दिला. शिवाय, त्याचा खेळ पाहून त्याला काही प्रशिक्षकांनी व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला.
पुढे वयाच्या पंधराव्या वर्षी रिंकूची उत्तर प्रदेशच्या 16 वर्षांखालील क्रिकेट संघात निवड झाली. स्थानिक स्पर्धांमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या रिंकूला आता खेळभत्ता म्हणून काही पैसे मिळू लागले. वडिलांवर 5 लाखांचं कर्ज झालं होतं. त्याला मिळणाऱ्या पैशांतून रिंकू वडिलांचं कर्ज फेडू लागला. पुढे त्याची उत्तर प्रदेशच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघातही निवड झाली. मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करत रिंकू पुढे चालला होता. सईद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. 2016च्या रणजी स्पर्धेत रिंकूने सहाशेहून अधिक धावा करत आपण देशासाठी क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज आहोत हे दाखवून दिलं.
2017च्या आयपीएल हंगामासाठी त्याला किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाने 10 लाख रुपयांत खरेदी केलं. मात्र, संपूर्ण स्पर्धेत त्याला एकही सामना खेळायची संधी मिळाली नाही. पुढच्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने त्याला 80 लाख रुपयांना करारबद्ध केलं; पण त्याही वर्षी त्याला फार संधी मिळाल्या नाहीत. 2018-19च्या रणजी हंगामात मात्र 953 धावा करून अनेकांना त्याने चकित केलं. तीन वर्षं रणजी स्पर्धांमध्ये 40 सामन्यांत 2875 धावा करून रिंकूने पुन्हा स्वतःला सिद्ध केलं. पुढे कोलकाता नाइट रायडर्स संघानेही रिंकूसोबतचा करार वाढवला. तो आता गरिबीचे दिवस मागे सारून पुढे आला. त्याने वडिलांचं कर्ज फेडून स्वतःचं नवीन घर घेतलं.
![]() |
रिंकू सिंग आणि त्याचे आई-वडील |
2022 आणि 2023च्या आयपीएल स्पर्धांमध्ये रिंकूने अनेकदा धडाकेबाज खेळ्या केल्या. पण 5 चेंडूंत 30 धावा करून त्याने आयपीलमधले अनेक विक्रम मोडले आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. या कामगिरीमुळे रिंकूला आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. अलिगढमधून भारताच्या क्रिकेट संघात स्थान पटकावणारा रिंकू पहिलाच खेळाडू ठरला. या मालिकेत दुसऱ्याच सामन्यात त्याने 21 चेंडूंत 38 धावा करून भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात त्याने सामनावीर पुरस्कारही पटकावला. परिस्थितीची जाण असलेल्या रिंकूने आपल्या कमाईतले 50 लाख रुपये अलिगढच्या क्रिकेटपटूंसाठी होस्टेल बांधायला दिले आहेत. या होस्टेलमध्ये चांगल्या सुविधा देऊन होतकरू खेळाडूंना घडवण्याची त्याची इच्छा आहे. क्रिकेट खेळताना स्वतःला ज्या अडचणी आल्या त्या इतर खेळाडूंना येऊ नयेत असं रिंकूला वाटतं.
भारतीय क्रिकेट संघात स्थान पटकावण्यासाठी त्याला किती वाट बघावी लागेल सांगता येत नाही, पण रिंकूमुळे अनेक गरीब घरच्या धडपड्या तरुणांना प्रेरणा मिळाली आहे. त्याचं यश भारतातल्या वंचित आणि कष्टकरी वर्गातल्या मुला-मुलींना नवी उमेद देईल एवढं मात्र नक्की!
अंक - जानेवारी 2024
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा