वस्तीतले धडपडे : शूर आणि ऑलराउंडर तन्वी

वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी शौर्य पुरस्कार मिळालेल्या धडपड्या तन्वीची कहाणी नितीन गांगर्डे पुण्यातल्या दत्तवाडीत राहणाऱ्या अठरा वर्षांच्या तन्वी ओव्हाळला सारे धडपडी हुशार मुलगी म्हणून ओळखतात. अवघ्या सातव्या वर्षी तिला राष्ट्रपतींच्या हस्ते ‘शौर्य पुरस्कार' मिळाला आहे. तन्वी चांगली चित्रं काढते, ती कथक नृत्यांगना आहे, ब्लॅकबेल्ट कराटे खेळाडू आहे; शिवाय ती मुलींना कराटे प्रशिक्षणही देते. छोट्या घरातली मुलगी काय करू शकते, असा प्रश्न पडत असेल तर तन्वीकडे पहा. तन्वीचा जन्म दत्तवाडीतला. वडील इस्त्रीचं दुकान चालवतात, तर आई घर सांभाळते. तन्वी जेमतेम सात वर्षांची होती तेव्हा एक दुर्घटना घडली. झालं असं, की तन्वी आणि तिची चार वर्षांची बहीण निर्मिती घराजवळ खेळत होत्या. आई-वडील आपापल्या कामात होते. घराशेजारी नवीन इमारतीचं बांधकाम सुरू होतं. बांधकामासाठी पाण्याची सोय म्हणून तिथेच एक चार-पाच फुटांचा मोठा खड्डा खोदून त्यात पाणी साठवलं होतं. खेळताना निर्मितीचा पाय घसरला आणि ती खड्ड्यात पडली. निर्मितीला पाण्यातून बाहेर काढायला आसपास कोणीच नव्हतं. स्वतःला पोहता येत नसतानाही बहिणाला वाच...