वस्तीतले धडपडे : शूर आणि ऑलराउंडर तन्वी
वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी शौर्य पुरस्कार मिळालेल्या धडपड्या तन्वीची कहाणी
नितीन गांगर्डे
पुण्यातल्या दत्तवाडीत राहणाऱ्या अठरा वर्षांच्या तन्वी ओव्हाळला सारे धडपडी हुशार मुलगी म्हणून ओळखतात. अवघ्या सातव्या वर्षी तिला राष्ट्रपतींच्या हस्ते ‘शौर्य पुरस्कार' मिळाला आहे. तन्वी चांगली चित्रं काढते, ती कथक नृत्यांगना आहे, ब्लॅकबेल्ट कराटे खेळाडू आहे; शिवाय ती मुलींना कराटे प्रशिक्षणही देते. छोट्या घरातली मुलगी काय करू शकते, असा प्रश्न पडत असेल तर तन्वीकडे पहा.
तन्वीचा जन्म दत्तवाडीतला. वडील इस्त्रीचं दुकान चालवतात, तर आई घर सांभाळते. तन्वी जेमतेम सात वर्षांची होती तेव्हा एक दुर्घटना घडली. झालं असं, की तन्वी आणि तिची चार वर्षांची बहीण निर्मिती घराजवळ खेळत होत्या. आई-वडील आपापल्या कामात होते. घराशेजारी नवीन इमारतीचं बांधकाम सुरू होतं. बांधकामासाठी पाण्याची सोय म्हणून तिथेच एक चार-पाच फुटांचा मोठा खड्डा खोदून त्यात पाणी साठवलं होतं. खेळताना निर्मितीचा पाय घसरला आणि ती खड्ड्यात पडली. निर्मितीला पाण्यातून बाहेर काढायला आसपास कोणीच नव्हतं. स्वतःला पोहता येत नसतानाही बहिणाला वाचवायला तन्वीने पाण्यात उडी टाकली. निर्मितीला बाहेर काढण्याची ती धडपड करू लागली. सुरुवातीला गटांगळ्या खाल्ल्या, पण कशीबशी हात-पाय मारत तन्वी निर्मितीला घेऊन कडेला आली; पण दोघींनाही बाहेर पडता येईना. तन्वी निर्मितीला बाहेर काढायचा प्रयत्न करायची, पण पाय सटकून दोघी पुन्हा गटांगळ्या खायच्या. जवळजवळ पाऊण तास असंच सुरू होतं. शेवटी तिने ढकलत ढकलत निर्मितीला बाहेर काढलं. घरच्यांना हे कळलं तेव्हा ते सुन्न झाले. तन्वीने स्वतःचा जीव धोक्यात घालून बहिणीचा जीव वाचवला हे ऐकून ते हरखून गेले.
बघता बघता ही बातमी सगळीकडे पसरली. तिच्या धाडसाचं शेजाऱ्यांकडून, शाळेतून खूप कौतुक झालं. पत्रकारांनी तिच्या धाडसाच्या बातम्या केल्या. त्या वर्षी राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी तिची निवड झाली. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तिचा सत्कार केला. ओव्हाळ कुटुंबीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट होती.
या शौर्यासाठी तन्वीला बारावीपर्यंत मोफत शिक्षण किंवा घर यापैकी एक गोष्ट सरकारकडून मिळणार होती. त्यांचं घर जेमतेम दहा बाय दहाचं असूनही सरकारकडून घर घेण्यापेक्षा आई-वडिलांनी तन्वीच्या शिक्षणालाच पसंती दिली. तिचे वडील सांगतात, “मला माझ्या मुलीला घर-बंगला देऊन मोठं करायचं नव्हतं, तर शिक्षणाने मोठं करायचं होतं.”
तन्वी लहानपणापासूनच उत्साही असल्यामुळे ती कथक शिकली, चित्रकला शिकली. तिने काढलेलं एक चित्र बालगंधर्व रंगमंदिर इथे झालेल्या एका चित्रप्रदर्शनात लावलं होतं. ती शाळेतच कराटे शिकली. त्यामध्ये तिला गोडी वाटू लागल्याने तिने ऑरेंज, ग्रीन असं करत त्यात ‘ब्लॅक बेल्ट'पर्यंत मजल मारली. ती आता जनता वसाहतीतील मुलींना कराटे शिकवते. हे सगळं करताना तिने अभ्यासात खडं पडू दिलेला नाही.
तन्वी म्हणते, “मला पोलिस अधिकारी व्हायचंय.” तशी ती होईलच. पण आतापर्यंत तिने दाखवलेली धडपडही तिच्या वयाच्या मुलींना प्रेरणा देणारी ठरेल.
अंक - ऑगस्ट 2022
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा