अन्नपूर्णाच्या सोबतीने सावरला संसार
छोटी-मोठी कर्जं घेऊन एका महिलेने पतीच्या निधनानंतर आपल्या कुटुंबाला सावरलं, व्यवसाय उभारला त्याची गोष्ट. ही गोष्ट आहे जया पांडुरंग वांजळे या खंबीर महिलेची. तरुणपणात आलेल्या संकटांना खंबीरपणे तोंड देत जयाताई स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. एकटीने स्वतःचं घर चालवलं. सायकलवरून पाणी पोचवण्यापासून त्यांनी कामाला सुरुवात केली. आज 48 वर्षांच्या जयाताई दोन व्यवसाय यशस्वीपणे चालवतात. त्यांच्याकडे स्वतःचे दोन टेम्पो आहेत. जयाताई पुण्यातल्या माळवाडी परिसरात राहतात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन मुलं. त्यांचं कुटुंब खाऊन-पिऊन सुखी होतं. पती कामावर जायचे आणि जयाताई घर सांभाळायच्या. पण सगळं व्यवस्थित सुरू असताना त्यांच्या पतीचं अपघातात जया वांजळे निधन झालं. तेव्हा जयाताई फक्त 24 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावरच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी येऊन पडली. पण जयाताई खचल्या नाहीत. घर चालवण्यासाठी त्यांनी शिवण्यातल्या औद्योगिक वसाहतीमधल्या कंपन्यांना पिण्याचं पाणी पुरवण्याचं काम सुरू केलं. घरापासून कंपन्या बऱ्याच लांब होत्या. म्हणून जयाताई सायकल शिकल्या. ऊन-वारा-पाऊस कशाचीही पर्वा न...