अन्नपूर्णाच्या सोबतीने सावरला संसार

छोटी-मोठी कर्जं घेऊन एका महिलेने पतीच्या निधनानंतर आपल्या कुटुंबाला सावरलं, व्यवसाय उभारला त्याची गोष्ट. 

ही गोष्ट आहे जया पांडुरंग वांजळे या खंबीर महिलेची. तरुणपणात आलेल्या संकटांना खंबीरपणे तोंड देत जयाताई स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. एकटीने स्वतःचं घर चालवलं. सायकलवरून पाणी पोचवण्यापासून त्यांनी कामाला सुरुवात केली. आज 48 वर्षांच्या जयाताई दोन व्यवसाय यशस्वीपणे चालवतात. त्यांच्याकडे स्वतःचे दोन टेम्पो आहेत. 

जयाताई पुण्यातल्या माळवाडी परिसरात राहतात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन मुलं. त्यांचं कुटुंब खाऊन-पिऊन सुखी होतं. पती कामावर जायचे आणि जयाताई घर सांभाळायच्या. पण सगळं व्यवस्थित सुरू असताना त्यांच्या पतीचं अपघातात

जया वांजळे

निधन झालं. तेव्हा जयाताई फक्त 24 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावरच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी येऊन पडली. पण जयाताई खचल्या नाहीत. घर चालवण्यासाठी त्यांनी शिवण्यातल्या औद्योगिक वसाहतीमधल्या कंपन्यांना पिण्याचं पाणी पुरवण्याचं काम सुरू केलं. घरापासून कंपन्या बऱ्याच लांब होत्या. म्हणून जयाताई सायकल शिकल्या. ऊन-वारा-पाऊस कशाचीही पर्वा न करता जयाताई कंपन्यांना पाणी पोचवायच्या. यावर घर कसंबसं चालू लागलं, पण मुलांच्या शिक्षणासाठी पैसे पुरणं अवघड होतं. त्याच वेळी जयाताईंना ‘अन्नपूर्णा' संस्था देत असलेल्या कर्जाबद्दल कळलं. त्यांनी ‘अन्नपूर्णा'कडून 7 हजारांचं पहिलं कर्ज घेतलं. त्यातून मुलांच्या शाळेची फी भरली. कर्जाचे हप्ते वेळच्या वेळी भरल्यामुळे जयाताईंना पुढेही कर्जं मिळत गेली. त्यातून त्यांनी पाण्याचा व्यवसाय वाढवला.
त्यासाठी त्यांनी धाडस करून स्वतःचा टेम्पो घेतला. त्या व्यवसायातून जयाताईंच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली. काही वर्षांनी त्यांच्या दोन्ही मुलींची लग्नं झाली.  

जयाताईंनी पुढे ‘अन्नपूर्णा'च्या छोट्या व्यवसायिकांसाठी असणाऱ्या कर्जयोजनेतून 1 लाख 70 हजार रुपयांचं कर्ज घेतलं. त्यातून त्यांनी आणखी एक टेम्पो घेतला. आता त्या मिनरल वॉटरदेखील पुरवू लागल्या. वॉटर सप्लायर म्हणून जयाताईंनी आता चांगला जम बसवला आहे. या कामात त्यांचा मुलगादेखील त्यांना मदत करतो. मुलाने भाजीविक्रीचा व्यवसायही सुरू केला. वांजळे कुटुंबाने आपलं जुनं घर पाडून स्वतःचं घर बांधलं. पतीच्या निधनानंतर स्वतःला निराधार न मानता एका महिलेने हिमतीने आपला संसार सावरला. 

जयाताई सांगतात, “मी आजवर अनेक कर्जं घेतली पण कधीही कर्जाचा हप्ता थकवला नाही. त्याचा फायदा नवीन कर्ज मिळण्यासाठी झाला. कर्ज घेऊन मी माझा व्यवसाय वाढवू शकते, असा विश्वास होता. त्या विश्वासाला ‘अन्नपूर्णा' परिवाराची साथ लाभली म्हणून मी स्वतःच्या पायावर उभं राहू शकले.” 

‘अन्नपूर्णा परिवार'च्या सोबतीने गेल्या 25 वर्षांमध्ये अनेक महिला लघुउद्योजिका आणि गृहउद्योजिका झाल्या. स्वतःचा छोटामोठा करणाऱ्या आणि करू इच्छिणाऱ्या महिलांकरता भांडवलाची व्यवस्था करण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या पाठीशी अन्नपूर्णा परिवार ठामपणे उभी आहे. 

- डॉ. मेधा पुरव सामंत, अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक, अन्नपूर्णा परिवार   

अंक - मार्च 2023 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वस्तीतले धडपडे : पुण्यातल्या तृतीयपंथीयांच्या सन्मानासाठी झटणाऱ्या चांदणी गोरे

वस्तीतले धडपडे : विद्यार्थ्यांच्या रूपात स्वत:चं स्वप्न पूर्ण करणारा हनुमंत रेगी

कथा संघर्षाची : रॉकस्टार मंगलताई