वस्तीतले धडपडे : वस्तीतल्या लोकांसाठी धडपडणारा तरुण कलीम शेख

वस्तीतल्या लोकांच्या मदतीसाठी दिवसरात्र धडपडणाऱ्या कलीम शेखची गोष्ट तुषार कलबुर्गी शाळेतल्या शिक्षणासोबतच मुलांना कधी कधी जादा शिकवणीचीही गरज भासते. परंतु या शिकवण्या सगळ्यांच्या खिशाला परवडणाऱ्या नसतात. जनता वसाहतीमध्ये कलीम शेख हे शिक्षक पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची अगदी कमी पैशात शिकवणी घेतात. कलीम सरांची ओळख इथेच संपत नाही. बऱ्याचदा वस्तीतल्या लोकांना त्यांच्यासाठीच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती नसते. ती मिळाली तरी त्यासाठी लागणारी कागदपत्रं जवळ नसतात. या दोन्ही गोष्टींसाठी कलीम शेख गरजूंना मदत करतात. कलीम शेख मूळचे तुळजापूरचे. त्यांचे वडील शेळ्या राखण्याचं काम करायचे. घरची परिस्थिती बेताची. कलीमभाईही लहानपणापासून दुसऱ्याच्या शेतात राबायला जायचे. पण ते शिक्षणात हुशार होते. सातवीपर्यंत वर्गात त्यांचा पहिला नंबर असायचा. ते नववी-दहावीत असतानाच पहिली ते सातवीची मुलं त्यांच्याकडे शिकवणीसाठी येत. शेख सरांच्या शिकवण्यांची सुरुवात अशी लहानपणीच झाली. पुढे बारावीनंतर शिक्षणासाठी त्यांनी गाव सोडलं. ते मुंबईतील काजूपाडा इथे आले. त्यांनी तिथेही शिकवण्या घ्यायला सुरुवात केली. मुलांना...