वस्तीतले धडपडे : वस्तीतल्या लोकांसाठी धडपडणारा तरुण कलीम शेख

वस्तीतल्या लोकांच्या मदतीसाठी दिवसरात्र धडपडणाऱ्या कलीम शेखची गोष्ट

तुषार कलबुर्गी

शाळेतल्या शिक्षणासोबतच मुलांना कधी कधी जादा शिकवणीचीही गरज भासते. परंतु या शिकवण्या सगळ्यांच्या खिशाला परवडणाऱ्या नसतात. जनता वसाहतीमध्ये कलीम शेख हे शिक्षक पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची अगदी कमी पैशात शिकवणी घेतात. कलीम सरांची ओळख इथेच संपत नाही. बऱ्याचदा वस्तीतल्या लोकांना त्यांच्यासाठीच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती नसते. ती मिळाली तरी त्यासाठी लागणारी कागदपत्रं जवळ नसतात. या दोन्ही गोष्टींसाठी कलीम शेख गरजूंना मदत करतात. 

कलीम शेख मूळचे तुळजापूरचे. त्यांचे वडील शेळ्या राखण्याचं काम करायचे. घरची परिस्थिती बेताची. कलीमभाईही लहानपणापासून दुसऱ्याच्या शेतात राबायला जायचे. पण ते शिक्षणात हुशार होते. सातवीपर्यंत वर्गात त्यांचा पहिला नंबर असायचा. ते नववी-दहावीत असतानाच पहिली ते सातवीची मुलं त्यांच्याकडे शिकवणीसाठी येत. शेख सरांच्या शिकवण्यांची सुरुवात अशी लहानपणीच झाली. पुढे बारावीनंतर शिक्षणासाठी त्यांनी गाव सोडलं. ते मुंबईतील काजूपाडा इथे आले. त्यांनी तिथेही शिकवण्या घ्यायला सुरुवात केली. मुलांना शिकवणं त्यांना आवडूही लागलं. पुढे कॉलेज शिक्षणासाठी ते मुंबईत आले. राहण्या-खाण्याचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी सुरुवातीला डाटा एन्ट्री ऑपरेटरची नोकरी धरली, पण त्यात ते रमले नाहीत. मग एका कॉलेजमध्ये त्यांनी तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी धरली. 

शेख सरांना सरकारी अधिकारी व्हायचं होतं. मुंबईमध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्याला आले. त्यांची मोठी बहीण जनता वसाहतमध्ये राहत असल्याने  ते तिथेे राहायला आले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केरू लागले. पण अचानक कोविडने सगळं जग थांबलं. सरकारी पदभरतीची खात्री राहिली नाही. पैसे न कमावता अभ्यास करत राहणं शेख सरांना परवडणारं नव्हतं. त्यांनी स्पर्धा परीक्षेचा नाद सोडून दिला. 

त्यांनी पुन्हा एकदा शिकवण्या घेण्याचा मार्ग निवडला. शेख सरांना आसपासच्या परिस्थितीचीही जाणीव होती. आपल्याला पोट भरायचं असलं तरी वस्तीतल्या पालकांना काय परवडेल, याचा विचार करूनच त्यांनी फी आकारायचं ठरवलं. विशेषतः  एकल आणि निराधार महिलांच्या मुलांना त्यांनी माफक दरात शिकवायला सुरुवात केली. दरम्यान त्यांनी डी.एड.चं शिक्षणही पूर्ण केलं.

जनता वसाहतीतील गल्ली नंबर 31मध्ये एस.के. क्लासेस या नावाने ही शिकवणी चालते. साधारण 60 विद्यार्थी येथे शिकवणीसाठी येतात. या कामात त्यांना काजल मॅडम व सैफान सर हे दोन शिक्षक मदत करतात. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन टप्यांत शिकवणी घेतली जाते. पहिली ते बारावीच्या प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र बॅच असते. 

वस्तीपातळीवरील गरजूंसाठी अनेक सरकारी योजना जाहीर होतात; पण त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही हे लक्षात आल्यावर सरांनी जनता वसाहतीतील लोकांना योजनांची माहिती देण्याचं काम हाती घेतलं. त्याचबरोबर  लोकांना आधार-पॅनकार्डसारखी कागदपत्रं काढून देण्याचं कामही सुरू केलं. त्यासाठी ते अगदी माफक शुल्क आकारतात. अशा या धडपड्या शेख सरांना वस्तीतले लोक खुप मानतात.

अंक - मे 2024

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वस्तीतले धडपडे : पुण्यातल्या तृतीयपंथीयांच्या सन्मानासाठी झटणाऱ्या चांदणी गोरे

वस्तीतले धडपडे : विद्यार्थ्यांच्या रूपात स्वत:चं स्वप्न पूर्ण करणारा हनुमंत रेगी

कथा संघर्षाची : रॉकस्टार मंगलताई