कथा संघर्षाची : अनाथांचा बाप केशव धेंडे
अनाथ मुलामुलींसाठी मायेची सावली बनलेल्या केशव धेंडे यांच्याबद्दल... तुषार कलबुर्गी “माझा जन्म अठरा विश्वं दारिद्य्र असलेल्या घरी झाला. आई अन्न मागून आणायची. मिळालेलं शिळं अन्न मला गरम करून द्यायची. आपल्यावर वेळ आली ती मुलावर येऊ नये, म्हणून आईने मला साने गुरूजी बालग्राममध्ये दाखल केलं. तिथे मला चांगलं आयुष्य मिळालं. तसंच ते इतर गरीब मुलांनाही मिळावं यासाठी मीही उपेक्षित मुलांसाठी काम करायचं ठरवलं.” 38 वर्षीय केशव धेंडे आपली कहाणी सांगतात. हडपसरच्या ससाणेनगर भागात त्यांनी स्थापन केलेलं ‘निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ' परिसरातल्या वंचित मुलांसाठी काम करतं आहे. केशवभाऊंचा जन्म पर्वतीजवळ एका पत्र्याच्या घरात झाला. तिघं भाऊ आणि दोन बहिणींमध्ये केशवभाऊ सर्वात लहान. वडील एका ऑफिसात शिपायाचं काम करायचे. आई मुलांना सांभाळायची. केशवभाऊ जन्मले त्या दिवशीच वडिलांचा मृत्यू झाला. पाच मुलांना एकटी आई कशी सांभाळणार? नाईलाजाने आईने दोन मुलींची लहान वयातच लग्न लावून दिली. मोठ्या भावांना रिमांड होममध्ये पाठवून दिलं. त्यावेळी रिमांड होममध्ये गरीब घरातील मुलांना आणि अनाथांना ठेवलं जात असे. एक मुलगा आपल्य...