कथा संघर्षाची : अनाथांचा बाप केशव धेंडे
अनाथ मुलामुलींसाठी मायेची सावली बनलेल्या केशव धेंडे यांच्याबद्दल...
तुषार कलबुर्गी
“माझा जन्म अठरा विश्वं दारिद्य्र असलेल्या घरी झाला. आई अन्न मागून आणायची. मिळालेलं शिळं अन्न मला गरम करून द्यायची. आपल्यावर वेळ आली ती मुलावर येऊ नये, म्हणून आईने मला साने गुरूजी बालग्राममध्ये दाखल केलं. तिथे मला चांगलं आयुष्य मिळालं. तसंच ते इतर गरीब मुलांनाही मिळावं यासाठी मीही उपेक्षित मुलांसाठी काम करायचं ठरवलं.” 38 वर्षीय केशव धेंडे आपली कहाणी सांगतात. हडपसरच्या ससाणेनगर भागात त्यांनी स्थापन केलेलं ‘निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ' परिसरातल्या वंचित मुलांसाठी काम करतं आहे.
केशवभाऊंचा जन्म पर्वतीजवळ एका पत्र्याच्या घरात झाला. तिघं भाऊ आणि दोन बहिणींमध्ये केशवभाऊ सर्वात लहान. वडील एका ऑफिसात शिपायाचं काम करायचे. आई मुलांना सांभाळायची. केशवभाऊ जन्मले त्या दिवशीच वडिलांचा मृत्यू झाला. पाच मुलांना एकटी आई कशी सांभाळणार? नाईलाजाने आईने दोन मुलींची लहान वयातच लग्न लावून दिली. मोठ्या भावांना रिमांड होममध्ये पाठवून दिलं. त्यावेळी रिमांड होममध्ये गरीब घरातील मुलांना आणि अनाथांना ठेवलं जात असे. एक मुलगा आपल्याजवळ हवा म्हणून आईने छोट्या केशवला स्वतःकडे ठेवलं.
![]() |
मुलांसमवेत केशव धेंडे |
केशवचं दहावीपर्यंतचं शिक्षण या संस्थेतच पूर्ण झालं. त्यानंतर त्याला घराची ओढ लागली. नऊ वर्षांनंतर घराचं चित्र बदललं होतं. केशवभाऊ सांगतात, “रिमांड होममधले माझे भाऊ परत आले होते. मोठ्या भावाने मला घरी ठेवून घेण्यास नकार दिला. आई भोळी असल्यामुळे ती काही करू शकत नव्हती. मधल्या भावाने राहायला जागा दिली आणि अकरावीची कॉलेजची फी भरली. पण त्याचीही परिस्थिती बेताची होती. आणखी किती दिवस त्याच्यावर ओझं व्हायचं? म्हणून मी त्याचं घर सोडलं.”
केशवभाऊ कामाच्या शोधात पुन्हा हडपसरला आले. एका कापड गिरणीमध्ये त्यांना काम मिळालं आणि राहायला जागाही मिळाली. ही गोष्ट दोन वर्षांनंतर दादा गुजर यांना समजली. त्यांनी केशवभाऊंना बोलावून घेतलं आणि संस्थेच्या शाळेमध्येच शिपायाची नोकरी देऊ केली. तिथे ते नंतर टप्प्याटप्प्याने क्लार्क, लॅब टेक्निशयन, ड्रॉईंग टीचर झाले. शाळेतल्या मुलांमध्ये केशवभाऊ रमले. मुलांमध्ये काम करणं त्यांना आवडू लागलं. पुढे त्यांनी एका अनाथ मुलीशीच लग्न केलं.
2000 साली सरकारने ‘सर्व शिक्षा अभियान' सुरू केलं. या अभियानातून वंचित मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं सरकारचं ध्येयं होतं. त्यासाठी स्वयंसेवकांची गरज होती. केशवभाऊंनी हे काम करायचं ठरवलं. त्यासाठी शाळेतील नोकरी सोडली. हडपसर परिसरातील मजुरांची अनेक मुलं शाळेत जात नव्हती. केशवभाऊंनी या मुलांना शाळेत भरती केलं. पण शाळाबाह्य मुलांची संख्या प्रचंड होती. त्यांनी जवळपासच्या शिक्षकांशी सलोखा वाढवला आणि वीस शिक्षकांचा चमू बनवला. या चमूने अगदी थोड्या काळात हडपसर परिसरातील पाचशे मुलांना शाळेत दाखल केलं.
2010ला हे अभियान सरकारकडून थांबवण्यात आलं. केशवभाऊंचं कामही थांबलं. पण मुलांसाठीच काम करायचं, हे त्यांनी मनाशी पक्कं ठरवलेलं. त्यांनी गरीब मुलांसाठी ‘निरंकार बालग्राम' नावाने आश्रम सुरू केला. त्यासाठी एक घर भाड्याने घेतलं. आश्रमात सुरुवातीला बुधवार पेठेत देहविक्री करणाऱ्या महिलांची आणि बांधकाम मजुरांची मुलं होती. केशवभाऊंनी या मुलांना शाळेत घातलं. मुलांचं पालनपोषण करण्यासाठी स्वत: एका दवाखान्यात रात्रपाळीची वॉर्डबॉयची नोकरी धरली. शक्य त्या मुलांची इतर मोठ्या संस्थांमध्ये सोय करून देण्याचं कामही ते करत राहिले. त्यामुळे त्यांच्याकडे नवीन मुलांना घेण्याची सोय झाली. पुढे गरजू मुलांचा ओघ वाढला. पुढे केशवभाऊ निराधार विधवांची मुलं सांभाळू लागले.
हळूहळू केशवभाऊंच्या कामाची दखल माध्यमांतही घेतली गेली. त्यामुळे मदतीसाठी देणगीदार पुढे आले. केशवभाऊ भाड्याच्या फ्लॅटमध्ये ही संस्था चालवतात. दोन फ्लॅटमध्ये मिळून नऊ मुलं आणि नऊ मुलींचा सांभाळ ते करताहेत. त्यांच्या छोट्या होस्टेलमध्ये मुलांमुलींची स्वतंत्र राहण्याची सोय आहे. राहणं, जेवण आणि शिक्षण संस्थेमार्फतच केलं जातं. यासाठी अगदी थोडी फी घेतली जाते. इथे मिळणारं प्रेम आणि मार्गदर्शन या तुलनेत ही फी बरीच कमी आहे. कष्टकऱ्यांच्या पोरांचं भविष्य उज्वल व्हावं, या हेतूने त्यांचं काम सुरू आहे. त्यामुळे केशवभाऊंना विविध संस्थांनी सन्मानित केलंय.
समाजसेवेत रमलेलं कुटुंब
केशवभाऊंच्या पत्नी नलिनीताईही निराधारांच्या आश्रमातच वाढल्या. त्यांनीही केशवभाऊंच्या कार्याला जोड देत वृद्धाश्रमाची स्थापना केली. या जोडप्याची मुलंही उच्चशिक्षण घेताहेत. त्यांचा मुलगा आर्किटेक्चर शिकतो आहे, तर मुलगी बी ए करते. मुलंही आपल्या आई-वडिलांच्या कामात मदत करतात.
अंक - जून 2022
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा