वस्तीतले धडपडे : आयुष्याच्या मंचावर संघर्ष करणारा कलाकार कुमार जाधव

कुटुंबामध्ये नाटक-सिनेमांचा कसलाही वारसा नसताना कुमारने लिखाण आणि अभिनयाची कला अंगिकारली. रोजगाराचा प्रश्न उभा राहिला तरीही त्याने आपल्या अंगातला कलाकार मरू दिला नाही. अप्सरा आगा कष्टकरी आईबाप राबतात. त्यातून मुलाला कसंबसं शिकवतात. मुलगा वयात आल्यावर तोही कष्ट करायला सुरु करतो. पिढ्यानपिढ्या हे चक्र सुरुच राहतं. यामध्ये कोणी खेळाची, कलेची आवड जोपासू लागला, त्यामध्ये करिअर करू इच्छित असला तर,'गप गुमान अभ्यास कर. काम कर.' ही वाक्यं घरच्यांकडून हमखास ऐकवली जातात. या परंपरेला फाट्यावर मारत कुमार जाधव या तरुणाने नाटक लिहिण्याची आणि अभिनयाची कला अंगिकारली. नाटक हे त्याचं रोजगाराचं साधन नसलं तरी काम सांभाळून उरलेला वेळ तो नाटकासाठी देतो. या क्षेत्रात एक ना एक दिवस मी चमकेन, असा त्याला विश्वास वाटतो. कुमार पुण्याच्या गंज पेठेमध्ये लहानाचा मोठा झाला. आई-वडील मंदिराबाहेर फुलांचे हार विकायचे. त्यांना मदत म्हणून कुमारपण गजरे विकायचा. तेव्हा तो जेमतेम नऊ वर्षांचा होता. शाळेवरून आला की त्याच्या वाटेचे विकायचे गजरे आईने तयार करून ठेवलेले असायचे. या कामामुळे तो अभ्यासात लक्ष द्यायचा नाही, म्ह...