वस्तीतले धडपडे : आयुष्याच्या मंचावर संघर्ष करणारा कलाकार कुमार जाधव
कुटुंबामध्ये नाटक-सिनेमांचा कसलाही वारसा नसताना कुमारने लिखाण आणि अभिनयाची कला अंगिकारली. रोजगाराचा प्रश्न उभा राहिला तरीही त्याने आपल्या अंगातला कलाकार मरू दिला नाही.
अप्सरा आगा
कष्टकरी आईबाप राबतात. त्यातून मुलाला कसंबसं शिकवतात. मुलगा वयात आल्यावर तोही कष्ट करायला सुरु करतो. पिढ्यानपिढ्या हे चक्र सुरुच राहतं. यामध्ये कोणी खेळाची, कलेची आवड जोपासू लागला, त्यामध्ये करिअर करू इच्छित असला तर,'गप गुमान अभ्यास कर. काम कर.' ही वाक्यं घरच्यांकडून हमखास ऐकवली जातात. या परंपरेला फाट्यावर मारत कुमार जाधव या तरुणाने नाटक लिहिण्याची आणि अभिनयाची कला अंगिकारली. नाटक हे त्याचं रोजगाराचं साधन नसलं तरी काम सांभाळून उरलेला वेळ तो नाटकासाठी देतो. या क्षेत्रात एक ना एक दिवस मी चमकेन, असा त्याला विश्वास वाटतो.
कुमार पुण्याच्या गंज पेठेमध्ये लहानाचा मोठा झाला. आई-वडील मंदिराबाहेर फुलांचे हार विकायचे. त्यांना मदत म्हणून कुमारपण गजरे विकायचा. तेव्हा तो जेमतेम नऊ वर्षांचा होता. शाळेवरून आला की त्याच्या वाटेचे विकायचे गजरे आईने तयार करून ठेवलेले असायचे. या कामामुळे तो अभ्यासात लक्ष द्यायचा नाही, म्हणून वडिलांनी त्याला गजरा विकायला पाठवणं बंद केलं.
वस्तीतलं मंडळ गणेशोत्सव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी नाटक, आर्केस्ट्रा, मिमिक्री वगैरेचं आयोजन करायचं. या कार्यक्रमाला कुमार न चुकता हजेरी लावायचा. कार्यक्रम बघून आपणही असंच काहीतरी केलं पाहिजे असं कुमारला वाटायचं. सहावीला असताना त्याने वस्तीतल्या मुलांना गोळा करून एक नाटक बसवलं. विषय होता महापुरुषांची जयंती. आंबेडकर जयंतीच्यावेळी ते लोकांपुढे सादर केलं. लोंकांनी त्या नाटकाचं कौतुक केलं. कुमारचा आत्मविश्वास वाढला. त्याने शाळेच्या नाटकांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. पहिल्याच वर्षी त्याला उत्कृष्ट अभिनयाचं पाहिलं बक्षीस मिळालं.
दहावीपर्यंत कुमार अभिनेता होण्याचं स्वप्न रंगवत होता. दहावी पास झाल्यानंतर मात्र परिस्थितीने त्याचे खाड्कन डोळे उघडले. अकरावीच्या शिक्षणाचा खर्च त्याच्या घरचे करू शकत नव्हते. म्हणून कुमारने सिम कार्ड विकणं, लग्नात वाढप्याचं काम करणं वगैरे छोटीमोठी कामं सुरु केली. आणि दहावीनंतरच्या शिक्षणाचा खर्च स्वतः उचलू लागला. कामामुळे नाटकासाठी तो वेळच देऊ शकत नव्हता. आपल्या स्वप्नाचा चक्काचूर तो उघड्या डोळ्यांनी बघत होता.
तीन-चार वर्षे गेली. त्यांनतर कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एक नाटक सादर झालं. ते इतकं दमदार होतं की कुमारचं नाटकप्रेम पुन्हा उफाळून आलं. त्या नाटकामध्ये दमदार अभिनय केलेल्या ज्ञानेश भिलारेशी त्याची ओळख झाली. ज्ञानेश उत्तम अभिनयासोबतच नाटक लिहित होता. हळूहळू दोघांची गट्टी जमली. ज्ञानेशकडून कुमारने नाटक लिहायचे धडे घेतले. कुमार हळूहळू नाटक लिहू लागला.
वयाच्या एकोणिसाव्या वर्षी कुमारने शेतकऱ्याच्या आयुष्यावर 'मोहर' नावाचं पाहिलं नाटक लिहलं. हे नाटक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सादर झालं. अनेक स्पर्धांमध्ये त्या नाटकाला उत्कृष्ट नाटकाचं पारितोषिक मिळालं. त्यानंतर कुमारने अनेक नाटकं लिहिली. 'वास इस दास' हे त्याने लिहिलेलं आणि अभिनय केलेलं पाहिलं व्यावसायिक नाटक. या नाटकाची त्याने एक आठवण सांगितली, 'अप्पर इंदिरानगर चाळीत महाशिवरात्रीमध्ये 'वास इस दास' हे नाटक सादर केलं. एका आजीने नाटक संपल्यावर मला बोलवून एक्कावन्न रुपये हातात दिले. त्या आजींना माझा अभिनय खूप आवडला होता.'
कुमारचा लेखनासोबतच अभिनयातही चांगला जम बसला. त्याने दहिहंडी, निर्वाण, सावळबाधा, घोरपडेच्या बैलाला घो आणि झेड ब्रिज या व्यावसायिक नाटकांमध्ये मुख्य भूमिका केल्या. त्याने अभिनयासाठी अनेक पुरस्कार पटकावले. निर्वाण या नाटकातील अभिनयासाठी कुमारला राज्यशासनाचा उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला. हा त्याच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण होता.कुमारने पदवी झाल्यानंतर दोन वर्षे पूर्ण वेळ नाटकासाठी दिला. पण पूर्णवेळ काम करता येईल इतके पैसे त्याला मिळत नव्हते. शो चालले तरच पैसे मिळायचे. म्हणून शेवटी नाईलाजाने एका बँकेत नोकरीला सुरुवात केली. त्या नोकरीतून घर चालेल इतके पैसे मिळू लागले. काही दिवसांनी कुमार लग्नाच्या बेडीत अडकला.
सध्या कुमार, त्याची पत्नी, एक मुलगा, आई, आणि भाऊ असे मिळून राहतात. कुमारचा भाऊ फायनान्स कंपनीत कामाला आहे. दोघा भावांच्या कमाईमुळेच घरी चूल पेटते. काम सोडून पुन्हा नाटकाकडे वळावं अशी घरची परिस्थिती नाही. पण कुमार परिस्थितीपुढे हतबल झालेला नाही. तो काम करून दिवसातले तीन तास लिखाणासाठी आणि अभिनयाच्या सरावासाठी देतो. नाटकाचे प्रयोग असेल तर कामाची वेळ अड्जस्ट करून जातो. काही झालं तरी आपली कला शेवटपर्यंत मरू द्यायची नाही असा निश्चय त्याने केला आहे.
कुमारला नाटकातील अभिनयाच्या जोरावर एका मराठी सिनेमामध्ये छोटासा रोल मिळाला होता. त्याने कौतुकाने त्याच्या घरी सांगितलं होतं. पण त्या सिनेमामध्ये तो अस्पष्ट आणि कमी वेळ दिसला. त्यामुळे तो दुखावला. पण त्याच क्षणी त्याने सिनेमामध्ये चांगला रोल मिळवूनच दम सोडायचा, असा विडा उचलला आहे.
अंक - फेब्रुवारी 2022
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा