कथा संघर्षाची : रॉकस्टार मंगलताई

घरची गरिबी, पायात आलेलं अपंगत्व, आगीत जळालेलं घर अशा नाना अडचणींशी सामना करत मुलींना शिकवणाऱ्या आणि वस्तीच्याही उपयोगी पडणाऱ्या पाटील वस्तीतल्या मंगल यांच्याबद्दल.. श्रुती कुलकर्णी “आपला जन्म जिथे झाला ती आपली जन्मभूमी तिचं आपण देणं लागतो. आपण आपल्यापुरते या गटारातून बाहेर पडलो तर दलदलीत अडकलेल्या बाकीच्या लोकांना कोण बाहेर काढेल? मला त्यांनाही बाहेर काढायचंय. मी गटारात राहीन, पण त्यांना बाहेर येण्यासाठी मदत करेन.” पाटील इस्टेटच्या गल्ली नंबर 7 मध्ये राहणाऱ्या 45 वर्षांच्या मंगलताई मोठ्या आत्मविश्वासाने बोलत होत्या. कचरावेचक म्हणून काम करण्यापासून ‘कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत' (स्वच्छ) या संस्थेच्या बोर्ड मेंबर होण्यापर्यंतचा मंगलताईं जाधव यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. मंगलताईंचा जन्म पाटील इस्टेटमध्येच झाला. त्यांचे वडील भंगार वेचण्याचं काम करायचे, तर आई कचरावेचक होती. त्यांच्या आईला त्या काळी महिन्याला दोन रुपये आणि रोजचं जेवण असा कचरा वेचण्याचा मोबदला मिळत असे. वडिलांनी पुढे वस्तीतच दारूचा गुत्ता सुरू केला. शाळकरी मंगलताई वडिलांना मदत करू लागल्या. आठवीनंतर आई-व...