कथा संघर्षाची : रॉकस्टार मंगलताई

घरची गरिबी, पायात आलेलं अपंगत्व, आगीत जळालेलं घर अशा नाना अडचणींशी सामना करत मुलींना शिकवणाऱ्या आणि वस्तीच्याही उपयोगी पडणाऱ्या पाटील वस्तीतल्या मंगल यांच्याबद्दल..

श्रुती कुलकर्णी

“आपला जन्म जिथे झाला ती आपली जन्मभूमी तिचं आपण देणं लागतो. आपण आपल्यापुरते या गटारातून बाहेर पडलो तर दलदलीत अडकलेल्या बाकीच्या लोकांना कोण बाहेर काढेल? मला त्यांनाही बाहेर काढायचंय. मी गटारात राहीन, पण त्यांना बाहेर येण्यासाठी मदत करेन.” पाटील इस्टेटच्या गल्ली नंबर 7 मध्ये राहणाऱ्या 45 वर्षांच्या मंगलताई मोठ्या आत्मविश्वासाने बोलत होत्या.   

कचरावेचक म्हणून काम करण्यापासून ‘कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत' (स्वच्छ) या संस्थेच्या बोर्ड मेंबर होण्यापर्यंतचा मंगलताईं जाधव यांचा प्रवास  प्रेरणादायी आहे. मंगलताईंचा जन्म पाटील इस्टेटमध्येच झाला. त्यांचे वडील भंगार वेचण्याचं काम करायचे, तर आई कचरावेचक होती. त्यांच्या आईला त्या काळी महिन्याला दोन रुपये आणि रोजचं जेवण असा कचरा वेचण्याचा मोबदला मिळत असे. वडिलांनी पुढे वस्तीतच दारूचा गुत्ता सुरू केला. शाळकरी मंगलताई वडिलांना मदत करू लागल्या. आठवीनंतर आई-वडिलांनी त्यांचं लग्न लावून दिलं. त्यांचे पती बॉटल सॉर्टिंगचं काम करायचे. सुरुवातीला काही दिवस हडपसरमधल्या एका वस्तीत राहिल्यानंतर मंगलताई आणि त्यांचा नवरा पाटील इस्टेटमध्येच राहायला आले. 

पाटील इस्टेटमध्ये परतल्यानंतर मंगलताईंनी कचरा वेचण्याचं काम धरलं. त्यांची आई आणि आजीही तेच काम करत होत्या. त्या दोघीही ‘स्वच्छ' संस्थेच्या सभासद  असल्याने मंगलताईही या संस्थेशी जोडल्या गेल्या. ही संस्था शहरातील कचरावेचकांना संघटित करून त्यांच्यात आत्मसन्मान जागवण्याचं आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करते. गेल्या. त्यासोबत मंगलताईंनी शहरातील वेगवेगळ्या शोरूम्समध्ये हाऊसकीपिंगचंही काम सुरू केलं. 

पुढे मंगलताईंना दोन मुली झाल्या. त्यानंतर त्यांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली. जातीचा दाखला इ. कागदपत्रं नसल्याने दोन मुली झाल्यानंतर केल्या जाणाऱ्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया योजनेचा मोबदला मिळाला नाही. ससून हॉस्पिटलमध्ये 2011 साली त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली; पण दुसऱ्या प्रसूतीवेळी त्यांना पायात अपंगत्व आलं. त्यामुळे त्यांचं चालणं पूर्ण बंद झालं.

मुली मोठ्या होत होत्या. त्यांचं शिक्षण सुरू झालं होतं. अशा वेळी अंथरुणाला खिळून राहणं परवडणारं नव्हतं. म्हणून मंगलताईंनी वस्तीतच गोळ्या-बिस्किटं विकण्याचं छोटंसं दुकान सुरू केलं. घरखर्चाला मदत होऊ लागली. त्यातून पैसे साठवून मंगलताईंनी पायावर उपचार सुरू केले. 2017 साली पायाची शस्त्रक्रिया झाली. यानंतर मात्र त्यांच्या पायात बळ आलं.

आता आयुष्य सुरळीत चालू झालं असं वाटत असताना पुढच्याच वर्षी पाटील इस्टेटला मोठी आग लागली. त्यात मंगलताईंचं घर, दुकान सगळं जळून खाक झालं.  पुढच्या वर्षी कोविडची साथ सुरू झाली आणि त्यांच्या नवऱ्याची नोकरी  गेली. 

पण अशा वेळी ‘कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत' संस्था मंगलताईंच्या मदतीला धावून आली. त्यांनी ताईंचं दुकान उभं करून दिलं. मंगलताईंनीही हिंमत न हरता दोन्ही मुलींचं शिक्षण निकराने चालू ठेवलं. आता ताईंची एक मुलगी कागद काच संस्थेमध्येच एच.आर. असिस्टंट आहे.

एवढी संकटं आल्यावर कुणीही हातपाय गाळून बसलं असतं. अशा परिस्थितीत आपलं आपलं घर सावरण्याकडे लक्ष दिलं असतं तरी  मंगलताईंना कुणी काही म्हटलं नसतं. पण  त्या आपलं घर, आपला संसार एवढंच बघत बसणाऱ्या नाहीत. स्वतःचा संघर्ष सुरू असतानाच वस्तीतले तंटे, महिलांच्या बाबतीत होणारे गुन्हे यांमध्ये मध्यस्थी करण्याचं काम त्या करत असतात.  

याचं एक उदाहरण म्हणजे वस्तीतील एका मुलीवर बलात्कार झाला. तेव्हा मंगलताईंनी आरोपीला अटक होईपर्यंत पोलिसांच्या मदतीने घटनेचा पाठपुरावा केला. वस्तीतील घरगुती भांडणं सोडवणं, महिलांना मारहाण करणाऱ्या पुरुषांना कधी प्रेमाने, तर कधी धाकाने समजावून सांगणं, वस्तीतल्या तरुण मुलांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी धाक दाखवणं, अशी कामं त्या आपलीच मानतात. त्यामुळे वस्तीतील लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल वचक आहे.

वस्तीतील लहान मुलं मंगलताईंना आत्या, मावशी म्हणतात आणि मंगलताईदेखील त्यांच्यावर तसंच प्रेम करतात. शाळेत जाण्यासाठी टंगळमंगळ करणाऱ्या मुलांना या ना त्या मार्गाने शाळेच्या वाटेला लावण्याचं काम त्यांच्याकडे असतं. मंगलताई सांगतात, “माझ्या किराणा दुकानात लहान मुलं सुपारी घ्यायला आली तर त्यांना मी चांगलं रागवून माघारी पाठवते. या मुलांना कोणत्या सवयी लावायच्या हे आपल्यावरच अवलंबून आहे ना!”

ताईंची ही मेहनत, त्यांच्यातले नेतृत्वगुण, धडपड आणि कामाबद्दलची निष्ठा यामुळे त्या ‘कागद काच' संस्थेच्या बोर्ड मेंबर झाल्या आहेत. 2023मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘स्वच्छ' या संस्थेशी संलग्न महिलांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी व्यासपीठावर मंगलताई पुरस्कार घ्यायला गेल्या. तिथे त्यांची ओळख रॉकस्टार म्हणून करून देण्यात आली.  

अंक - मार्च 2024


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वस्तीतले धडपडे : पुण्यातल्या तृतीयपंथीयांच्या सन्मानासाठी झटणाऱ्या चांदणी गोरे

वस्तीतले धडपडे : विद्यार्थ्यांच्या रूपात स्वत:चं स्वप्न पूर्ण करणारा हनुमंत रेगी