वस्तीतले धडपडे : तरुण आणि धडपडी शिक्षिका प्राजक्ता लोंढे

स्वतः वस्तीत राहून उच्च शिक्षण घेतलेल्या आणि आता वस्तीतल्या मुलांना शिकवण्यासाठी धडपडणाऱ्या तरुण शिक्षिकेची गोष्ट.. टीम सलाम प्राजक्ता अभ्यासात कमालीची हुशार. शिक्षण घेताना तिला अनेक अडचणी आल्या, तरी तिने शिक्षण थांबवलं नाही. मात्र, अडचणींमुळे शिक्षण सोडावं लागल्याची अनेक उदाहरणं ती लहानपणापासून बघत आली होती. या मुलांना चांगले शिक्षक मिळाले तर ती मुलं शिक्षण पूर्ण करू शकतील असं प्राजक्ताला नेहमी वाटायचं. म्हणून तिनेही शिक्षक होण्याचं स्वप्न पाहिलं. गेल्या तीन वर्षांपासून प्राजक्ता भारतीय समाजसेवा केंद्र आणि स्वरूपवर्धिनी या संस्थांमार्फत राजेवाडी वस्तीतल्या मुलांना शिकवण्याचं काम करते आहे. आठवी ते दहावीच्या 20 मुलांना ती विज्ञान आणि इंग्रजी शिकवते, तर 40 मुलांचा मूलभूत साक्षरतेचा वर्ग घेते. प्राजक्ताचा जन्म राजेवाडीतला. वडील संजय लोंढे ‘शांताबाईफेम' गायक-गीतकार. आई गृहिणी असली तरी ग्रॅज्युएट. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसली तरी आईने आपल्या मुलांना शिकवण्यासाठी नेहमीच खटपटी केल्या. प्राजक्ता दहावीपर्यंत चांगल्या गुणांनी पास होत राहिली. अकरावी-बारावी शिकत असताना ती वस्तीतल्या शाळ...