वस्तीतले धडपडे : तरुण आणि धडपडी शिक्षिका प्राजक्ता लोंढे
स्वतः वस्तीत राहून उच्च शिक्षण घेतलेल्या आणि आता वस्तीतल्या मुलांना शिकवण्यासाठी धडपडणाऱ्या तरुण शिक्षिकेची गोष्ट..
टीम सलाम
प्राजक्ता अभ्यासात कमालीची हुशार. शिक्षण घेताना तिला अनेक अडचणी आल्या, तरी तिने शिक्षण थांबवलं नाही. मात्र, अडचणींमुळे शिक्षण सोडावं लागल्याची अनेक उदाहरणं ती लहानपणापासून बघत आली होती. या मुलांना चांगले शिक्षक मिळाले तर ती मुलं शिक्षण पूर्ण करू शकतील असं प्राजक्ताला नेहमी वाटायचं. म्हणून तिनेही शिक्षक होण्याचं स्वप्न पाहिलं. गेल्या तीन वर्षांपासून प्राजक्ता भारतीय समाजसेवा केंद्र आणि स्वरूपवर्धिनी या संस्थांमार्फत राजेवाडी वस्तीतल्या मुलांना शिकवण्याचं काम करते आहे. आठवी ते दहावीच्या 20 मुलांना ती विज्ञान आणि इंग्रजी शिकवते, तर 40 मुलांचा मूलभूत साक्षरतेचा वर्ग घेते.
प्राजक्ताचा जन्म राजेवाडीतला. वडील संजय लोंढे ‘शांताबाईफेम' गायक-गीतकार. आई गृहिणी असली तरी ग्रॅज्युएट. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसली तरी आईने आपल्या मुलांना शिकवण्यासाठी नेहमीच खटपटी केल्या. प्राजक्ता दहावीपर्यंत चांगल्या गुणांनी पास होत राहिली. अकरावी-बारावी शिकत असताना ती वस्तीतल्या शाळकरी मुलांनाही शिकवू लागली. प्राजक्ता सांगते, “मला लहानपणापासूनच चांगले शिक्षक भेटले. त्यांच्याकडे पाहून मला नेहमीच शिक्षक व्हावंसं वाटायचं. वस्तील्या मुलांच्या घरी शिक्षणाची पार्श्वभूमी असतेच असं नाही. त्यामुळे त्यांना शाळेबाहेरही कुणी तरी शिकवण्याची खूप गरज असते. म्हणूनच अकरावी-बारावीच असतानाच मी एका संस्थेमार्फत वस्त्यांमध्ये मराठी-इंग्रजी शिकवणी वर्ग घेऊ लागले.”
प्राजक्ताचे काका-काकू नितीन लोंढे आणि सुवर्णा लोंढे पेशाने प्राध्यापक. त्यांनी प्राजक्ताची ऊर्मी पाहून तिला डी.एड. करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ती डी.एड.ला प्रवेश मिळवून चांगल्या गुणांनी पास झाली. पुढे ती एका प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीला लागली. तिथे वर्गशिक्षिका झाली. पुढे वस्तीपातळीवर शैक्षणिक काम करणाऱ्या अनेक संस्थांमध्ये शिक्षिका म्हणून काम करू लागली. नंतर तिने आपलं पदवीचंही शिक्षण पूर्ण केलं.
प्राजक्ताला डी.एड.नंतर बी.एड.चं शिक्षण घ्यायचं होतं. ती म्हणते,“दोन संस्थांमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होते. नकळतपणे घराची जबाबदारी माझ्यावर आली. नोकरी सोडून शिक्षण कसं घेणार? पण पुढे वेळ काढून मी बी.एड.चं शिक्षण घेणार आहे.” तुला शिकवण्याच्या कामात पुरेसे पैसे मिळतात का, असा प्रश्न विचारल्यावर प्राजक्ता म्हणते, “मी पैशांसाठी शिक्षक बनले नाही. गरजू विद्यार्थ्यांना शिकवण्यातूनच मला समाधान मिळतं.”
मी पदवीधर आहे. मला नोकरी करण्याची इच्छा होती; पण लवकर लग्न लावून दिल्यामुळे संसाराच्या जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडल्या. माझी वेळ निघून गेली होती. आपल्या मुलींच्या बाबतीत असं होऊ द्यायचं नाही, असं मी ठरवलंं होतं. आज माझ्या मुली उच्चशिक्षित होऊन स्वतःच्या पायावर उभ्या आहेत याचा मला अभिमान वाटतो.
- सुनीता लोंढे, प्राजक्ताची आई
अंक - जानेवारी 2024
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा