वस्तीतले धडपडे : जनता वसाहतीच्या ताई संध्या बोम्माना
स्वतःचं काम सांभाळत वस्तीतले प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणाऱ्या संध्याताईंची ही गोष्ट.. अप्सरा आगा कष्टकरी माणूस स्वतःच्या आयुष्यातल्या रोजच्या समस्यांशीच इतका झुंजत असतो की, इतरांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला त्याला वेळच नसतो. पण अशातही काही धडपडे असतात, जे स्वतःचं घर चालवत आपल्याबरोबरच आपल्या आजूबाजूच्या लोकांचं जगणं सुकर व्हावं यासाठी झटत असतात. याचं उदाहरण म्हणजे संध्या बोम्माना. अठ्ठेचाळीस वर्षांच्या संध्याताई पुण्याच्या जनता वसाहतमध्ये राहतात. पती, मुलगा आणि मुलगी असं त्यांचं कुटुंब. त्या ब्युटी पार्लरमध्ये नोकरी करत घरी स्वतःचंही ब्युटी पार्लर चालवतात. शिवाय घरचं काम असतंच. पण त्यातूनही वेळ काढत त्या वस्तीतल्या समस्या सोडवण्यासाठी धडपडत असतात. महिलांच्या छेडछाडीचं प्रकरण असो, वस्तीतल्या पाण्याची समस्या असो, ड्रेनेजचा प्रश्न असो, वस्तीतले लोक हक्काने संध्याताईंकडे येतात. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबात संध्याताईंचा जन्म झाला. आई धुणी-भांडी करायची तर, वडिलांचं सायकल दुरुस्तीचं छोटं दुकान होतं. संध्याताई पाच वर्षांच्या असतानाच त्यांचं कुटुंब दत्तवाडीहून जनता वसाहतमध...