वस्तीतले धडपडे : जनता वसाहतीच्या ताई संध्या बोम्माना

स्वतःचं काम सांभाळत वस्तीतले प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणाऱ्या संध्याताईंची ही गोष्ट..

अप्सरा आगा

कष्टकरी माणूस स्वतःच्या आयुष्यातल्या रोजच्या समस्यांशीच इतका झुंजत असतो की, इतरांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला त्याला वेळच नसतो. पण अशातही काही धडपडे  असतात, जे स्वतःचं घर चालवत आपल्याबरोबरच आपल्या आजूबाजूच्या लोकांचं जगणं सुकर व्हावं यासाठी झटत असतात. याचं उदाहरण म्हणजे संध्या बोम्माना. अठ्ठेचाळीस वर्षांच्या संध्याताई पुण्याच्या जनता वसाहतमध्ये राहतात. पती, मुलगा आणि मुलगी असं त्यांचं कुटुंब. त्या ब्युटी पार्लरमध्ये नोकरी करत घरी स्वतःचंही ब्युटी पार्लर चालवतात. शिवाय घरचं काम असतंच. पण त्यातूनही वेळ काढत त्या वस्तीतल्या समस्या सोडवण्यासाठी धडपडत असतात. महिलांच्या छेडछाडीचं प्रकरण असो, वस्तीतल्या पाण्याची समस्या असो, ड्रेनेजचा प्रश्‍न असो,  वस्तीतले लोक हक्काने संध्याताईंकडे येतात.  

हातावर पोट असणाऱ्या कुटुंबात संध्याताईंचा जन्म झाला. आई धुणी-भांडी करायची तर, वडिलांचं सायकल दुरुस्तीचं छोटं दुकान होतं. संध्याताई पाच वर्षांच्या असतानाच त्यांचं कुटुंब दत्तवाडीहून जनता वसाहतमध्ये आलं. तीन बहिणी आणि एक भाऊ यांच्यात संध्याताई सर्वात थोरल्या. त्यामुळे आईवडील कामाला गेल्यावर भावंडांना सांभाळायची जबाबदारी त्यांच्यावरच यायची. यामुळेच ताईंना कमी वयात जाण आली. आपल्या मुलीला घर सांभाळता येतं, तिला अजून किती दिवस घरी ठेवायचं असा विचार करून आईवडिलांनी सोळाव्या वर्षीच संध्याताईचं लग्न लावून दिलं. 

संध्याताईंचे पती जनता वसाहतमध्येच राहाणारे. एका मेडिकलमध्ये काम करायचे. त्यांच्या अल्पशा कमाईतूनच घर चालत असे. घर चालवण्यासाठी आपणही हातभार लावला पाहिजे, असं संध्याताईंना वाटायचं. शिक्षण कमी झालं असलं तरी काहीतरी करण्याची उर्मी त्यांच्यात होती. ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मैत्रिणीने ताईंना या कोर्सबद्दल सुचवलं. ताईंनी सहा महिन्यात हा कोर्स पूर्ण केला आणि एका ब्युटी पार्लरमध्ये नोकरीही सुरू केली. नोकरीतून मिळणारा पैसा कमी असल्यामुळे ताईं घरीच पार्लरही चालवू लागल्या. नोकरी, व्यवसाय आणि घर अशा तिन्ही डगरी सांभाळण्याची कसरत त्यांनी सुरू केली. 

ब्युटी पार्लरमुळे वस्तीतल्या मुलींची आणि महिलांची संध्याताईंच्या घरी येजा असायची. त्यांच्याशी गप्पा व्हायच्या. त्या आपल्या व्यथा ताईंना सांगायच्या. घरातला तंटा, वस्तीतल्या मुलांनी काढलेली छेड, घरगुती हिंसाचार असं बरंच काही. एकदा वस्तीतली मुलं छेड काढतात म्हणून एक मुलगी हुंदके देत आपलं मन संध्याताईंपुढे हलकं करत होती. ताईंना संताप अनावर झाला आणि त्या मुलांना त्यांनी थेट पोलीस चौकी दाखवली. त्यांच्या या धडाकेबाज स्वभावामुळे वस्तीत ताईंचा दरारा निर्माण झाला. तेव्हापासून आसपासच्या महिला आपले प्रश्न हक्काने ताईंना सांगू लागल्या.

महिलांच्या प्रश्नांसोबतच वस्तीतल्या पाण्याच्या, ड्रेनेजच्या, लाईटच्या समस्यांकडेही संध्याताईंनी लक्ष घालायला सुरुवात केली. साधारण वीस वर्षांपूर्वी जनता  वसाहतीमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई होती. पाण्यासाठी महिलांना दोन ते तीन किलोमीटर पायी चालत जावं लागायचं. ताईंनी या प्रश्नासाठी तत्कालीन नगरसेवकांकडे पाठपुरावा सुरू केला. तरीही दाद मिळेना, तेव्हा ताईंनी महिलांना एकत्र करून पालिकेवर मोर्चा काढला. काही दिवसांतच पालिकेने जनता वसाहतीमध्ये पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव मंजूर केला. तेव्हापासून वस्तीतल्या प्रश्नांसाठी नगरसेवकांकडे आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणं ताईंचं काम बनलं. आजही तो कार्यक्रम सुरूच आहे. 

वस्तीतल्या महिलांचे प्रश्न सोडवण्यापुरतंच आपलं काम मर्यदित राहू नये असं संध्याताईंना वाटत होतं. महिला आर्थिकदृष्ट्‌या सक्षम आणि स्वावलंबी झाल्या पाहिजेत म्हणून ताईंनी वस्तीतल्या महिलांना अगदी माफक दारात ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण सुरू केलं. ज्यांची आर्थिक परिस्थिती अगदीच बिकट असेल अशांना ताईंनी मोफत प्रशिक्षण दिलं. यासोबत ताईंनी महिलांसाठी बचतगट सुरू केला. वस्तीतल्या महिलांना बचतगटाचा दुहेरी फायदा झाला. छोट्यामोठा उद्योगांसाठी महिलांना कर्ज मिळू लागलं आणि महिलांची बचतही होऊ लागली. 

संध्याताईंनी आपल्या कामातून अनेक महिला जोडल्या. आपल्या कामाला संस्थात्मक स्वरूप आलं पाहिजे यासाठी ताईंच्या ‘भरारी प्रतिष्ठान' नावाची संघटना स्थापना केली. जनता वसाहतीमध्ये या संघटनेच्या आज जवळपास शंभर महिला सदस्य आहेत.  

सामाजिक कामांसोबत संध्याताईंनी कौटुंबिक जबाबदारी अगदी समर्थपणे पेलली आहे. आपल्या मुलाला इंजिनिअरींगचं शिक्षण दिलं, तर मुलगी पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे. ‘तुम्ही राजकारणात का नाही उतरत?' हा प्रश्न विचारल्यावर संध्याताई म्हणतात, “राजकारणात उतरल्यावर शत्रू तयार होतात. मला कोणाचंही शत्रुत्व न पत्करता लोकांसाठी काम करायचं आहे.” आपण जगता जगता चार लोकांचं भलं केलं पाहिजे, हा विचार संध्याताईंसारखेच लोक पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जात आहेत.      

चौकट - जनता वसाहतीबाहेरील सामाजिक संस्थांना तिथे उपक्रम राबवायचे असतील तर ते आधी संध्याताईंशी संपर्क साधतात. कोविडकाळात बऱ्याच सामाजिक संस्थांची धान्याची मदत संध्याताईंच्या मदतीनेच जनता वसाहतमध्ये पोहोचली. ही मदत ताईंनी आणि त्यांच्या सहकारी महिलांनी लोकांच्या घरोघरी जाऊन पोस्त केली. शिवाय ताईंनी वृद्धाश्रमात, अनाथाश्रमात, तसंच देहविक्री करणाऱ्या महिलांपर्यंत मदत पोहोचवली.

माझी आई अष्टपैलू आहे. घराची जबाबदारी पेलते. नोकरी करते आणि ते करता करता लोकांच्या समस्यांसाठी वेळ काढते. अशा स्त्रिया फार कमी बघायला मिळतात. मला माझ्या आईचा अभिमान वाटतो.

- हृषिकेश बोम्माना

अंक - एप्रिल 2022


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वस्तीतले धडपडे : पुण्यातल्या तृतीयपंथीयांच्या सन्मानासाठी झटणाऱ्या चांदणी गोरे

वस्तीतले धडपडे : विद्यार्थ्यांच्या रूपात स्वत:चं स्वप्न पूर्ण करणारा हनुमंत रेगी

कथा संघर्षाची : रॉकस्टार मंगलताई