कथा संघर्षाची : अंध जोडप्याचा डोळस संसार
दृष्टी नसलेल्या नवराबायकोने संसार कसा केला स्वतःचं घर उभं केलं त्याची गोष्ट. नितीन गांगर्डे वैशाली आणि सुनील कांबळे हे हडपसर भागातल्या राजीव गांधी वसाहतीत राहणारं जोडपं. लहानपणी आजारपणात घेतलेल्या औषधांच्या विपरीत परिणामांमुळे दोघांचीही दृष्टी गेली. दोघं तरुणपणात एका संस्थेमुळे एकत्र आले. त्यांनी लग्न केलं. स्वतःचा व्यवसाय वाढवला. हडपसर भागात स्वतःचं घर बांधलं. अंध असूनही हे जोडपं स्वावलंबी आयुष्य जगतं आहे. 46 वर्षांच्या वैशालीताईंचा जन्म अहमदनगरमधल्या श्रीरामपूर तालुक्यातला. 10 वर्षांच्या असताना त्या तापाने फणफणल्या होत्या. गावातल्याच एका डॉक्टरने त्यांना औषध म्हणून काही गोळ्या दिल्या; पण त्या गोळ्या भलत्याच होत्या. त्याचा दुष्परिणाम इतका झाला की वैशालीताईंची दृष्टीच गेली. त्या म्हणतात, “गोळ्या घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझे डोळे भाजल्यासारखे झाले. पापण्या डोळ्यांना घट्ट चिकटून गेल्या होत्या. नंतर दुसऱ्या एका डॉक्टराकडे जाऊन इलाज केल्यावर डोळे उघडले केले; पण डोळे उघडल्यावर समोर सगळा अंधार.” अंध दाम्पत्य वैशालीताईंना अंधुक अंधुक दिसायला लागलं. पुस्तक डोळ्यांच्या अगदी जवळ घेत...