कथा संघर्षाची : अंध जोडप्याचा डोळस संसार
दृष्टी नसलेल्या नवराबायकोने संसार कसा केला स्वतःचं घर उभं केलं त्याची गोष्ट.
नितीन गांगर्डे
वैशाली आणि सुनील कांबळे हे हडपसर भागातल्या राजीव गांधी वसाहतीत राहणारं जोडपं. लहानपणी आजारपणात घेतलेल्या औषधांच्या विपरीत परिणामांमुळे दोघांचीही दृष्टी गेली. दोघं तरुणपणात एका संस्थेमुळे एकत्र आले. त्यांनी लग्न केलं. स्वतःचा व्यवसाय वाढवला. हडपसर भागात स्वतःचं घर बांधलं. अंध असूनही हे जोडपं स्वावलंबी आयुष्य जगतं आहे.
46 वर्षांच्या वैशालीताईंचा जन्म अहमदनगरमधल्या श्रीरामपूर तालुक्यातला. 10 वर्षांच्या असताना त्या तापाने फणफणल्या होत्या. गावातल्याच एका डॉक्टरने त्यांना औषध म्हणून काही गोळ्या दिल्या; पण त्या गोळ्या भलत्याच होत्या. त्याचा दुष्परिणाम इतका झाला की वैशालीताईंची दृष्टीच गेली. त्या म्हणतात, “गोळ्या घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझे डोळे भाजल्यासारखे झाले. पापण्या डोळ्यांना घट्ट चिकटून गेल्या होत्या. नंतर दुसऱ्या एका डॉक्टराकडे जाऊन इलाज केल्यावर डोळे उघडले केले; पण डोळे उघडल्यावर समोर सगळा अंधार.”
![]() |
अंध दाम्पत्य |
वैशालीताईंना कोणावर ओझं व्हायचं नव्हतं. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. त्या वेळी पुण्यामध्ये ‘अद्वैत परिवार' नावाची संस्था अंध-अपंगांना स्वावलंबनाचे धडे देत होती. ताईंना या संस्थेविषयी समजलं. अठराव्या वर्षी या संस्थेत दाखल झाल्या. इथे आल्यानंतर स्वतःची कामं स्वतः कशी करायची, पैशांचे व्यवहार कसे करायचे हे त्या शिकल्या. अंध-अपंगांना व्यवसायाचा अनुभव मिळावा आणि ते पुढे स्वावलंबी व्हावेत, या हेतूने अद्वैत परिवार दरवर्षी गणेशोत्सवामध्ये दहा दिवस खाद्यपदार्थांचा स्टॉल लावतं. त्या स्टॉलमध्ये वैशालीताईंनी वडापाव आणि भजी कसे तळायचे, गिऱ्हाइकांशी व्यवहार कसा करायचा, पैसे किती आहेत हे स्पर्शाने कसं ओळखायचं वगैरे गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
47 वर्षांच्या सुनील कांबळे यांचा जन्म सोलापूरमधल्या बार्शी तालुक्यातला. एका कंपनीत ते सुपरवायझरची नोकरी करत होते. एकदा ते आजारी पडले. जवळच्या डॉक्टरांकडून औषधं घेतली. वैशालीताईंसोबत घडलं तेच यांच्यासोबतही घडलं. औषधांचा विपरीत परिणाम होऊन सुनीलभाऊंची 75 टक्के दृष्टी गेली. त्यांना सगळंच धूसर दिसू लागलं. डोळ्यांच्या दवाखान्यात दोनदा उपचार घेतले; पण फायदा झाला नाही. ऐन उमेदीच्या काळात त्यांची दृष्टी गेली.
सुनीलभाऊ हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. दृष्टी गेली म्हणून घरच्यांच्या जिवावर जगावं हे त्यांना पटणारं नव्हतं. ते पुण्यात आले आणि अंध व्यक्तींना व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या शाळेत दाखल झाले. पुण्यामध्ये सरकारने अंध व्यक्तींना चालवण्यासाठी एसटीडी फोनबूथ दिले. त्यातला एक फोनबूथ सुनीलभाऊंना मिळाला. या कामातून त्यांना पोटापाण्यापुरते पैसे मिळू लागले.
अद्वैत परिवाराच्या अंध-अपंग मेळाव्यर्चीं वैशालीताई आणि सुनीलभाऊ एकमेकांना भेटले. त्यांची ओळख झाली. काही दिवसांनी त्यांनी लग्न करायचं ठरवलं. आंतरजातीय असल्यामुळे लग्नाला वैशालीताईंच्या घरच्यांचा विरोध होता. ताईंनी हा विरोध झुगारून लग्न केलं.
फोनबूथच्या कमाईतून पैसे मिळत होते; पण दोघांचा संसार चालवण्यासाठी ते अपुरे होते. म्हणून आपणही कमाईत हातभार लावावा, असं वैशालीताईंना वाटू लागलं. त्यांनी बूथच्या बाहेरच वडापाव-भज्यांचा स्टॉल सुरू केला. दिसत नसतानाही वडे तळणं हे जोखमीचं काम; पण गणेशोत्सवातल्या स्टॉलचा अनुभव वैशालीताईंच्या कामी आला.
दरम्यान, सुनीलभाऊंचा फोनबूथचा व्यवसाय कमी होऊ लागला होता. सुनीलभाऊंनी शक्कल लढवली आणि त्याच जागेत छोटं जनरल स्टोअर सुरू केलं. सुनीलभाऊंनी हळूहळू व्यवसाय वाढवला. वैशालीताईंचा वडा पावचा स्टॉलही चांगला चालू लागला. पुढे त्यांना एक मुलगा आणि मुलगी झाली. पैशांची बचत करून, थोडं कर्ज काढून त्यांनी स्वतःची जागा घेतली आणि दोन मजली घर बांधलं. या जोडप्याने मेहनतीने आपला संसार उभा केला.
पण वैशालीताईंसोबत पुन्हा एक दुर्दैवी घटना घडली. कढईच्या वाफेमुळे ताईंच्या डोळ्यांना आणखी त्रास झाला. डॉक्टरांनी त्यांना वडापावचा व्यवसाय बंद करायला सांगितलं; पण त्यांना कामाशिवाय चैन पडेना. त्यांनी घरातच छोटंसं किराणा मालाचं दुकान सुरू केलं. पुन्हा नवीन व्यवसाय. वैशालीताई पन्नाशीतल्या आहेत. 95 टक्के दृष्टी गेली आहे, तरीही कोणाच्या मदतीशिवाय त्या सगळी कामं करतात. दुकानातली कोणती वस्तू कुठे ठेवलीये हेही त्यांना पाठ आहे. सुनीलभाऊंना फक्त धूसर सावल्या दिसतात, पण तेही आपलं जनरल स्टोअर समर्थपणे सांभाळतायत.
जन्मतः असलेली चांगली दृष्टी अचानकपणे जाणं हे मोठं दुःख; पण या दुःखावर मात करत या जोडप्याने यशस्वीपणे संसाराचा गाडा हाकला. कधी कोणाच्या मदतीवर ते विसंबून राहिले नाहीत. कितीही अडचणी आल्या तरी आव्हानांना सामोरं जात कसं जगायचं हे या जोडप्याकडे पाहून शिकता येईल.
माझे आई-वडील अंध असूनही त्यांनी आम्हाला कोणत्या गोष्टींची उणीव भासू दिली नाही. त्यांनी आयुष्यात इतकी कामं केली आहेत की ते अंध आहेत असं कधी वाटलंच नाही. मला माझ्या आई-वडिलांचा अभिमान वाटतो.
- निकिता कांबळे, मुलगी
अंक - ऑगस्ट 2022
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा