वस्तीतले धडपडे : संधीच्या शोधातला हरहुन्नरी गायक वसंत सगट
प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला गायनात सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या गायकाची गोष्ट.. योगेश जगताप “मला गायचंय. गात रहायचंय. लोकांनी मला माझ्या आवाजाने ओळखलं पाहिजे.” हे शब्द दत्तवाडीत राहणाऱ्या 34 वर्षीय वसंत सगट यांचे. ते उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवतात. पण त्यातून वेळ मिळेल तसा ऑर्केस्ट्रामध्ये गातात, गायनाचा रियाज करतात. ते म्हणतात, “माझी परिस्थिती कशीही असली तरी मी गाणं सोडणार नाही.” वसंतभाऊंचे वडील 50 वर्षांपूर्वी कामाच्या शोधानिमित्त पुण्यात आले आणि इथेच स्थायिक झाले. वसंतभाऊंचा जन्म दत्तवाडीतला. त्यांचे वडील भंगार वेचायचे, तर आई घरकाम करायची. आई आणि मामा पोटापाण्याचं सांभाळत देवदेवतांची गाणी गात. घरातील शुभकार्यासाठी, गावातील जत्रा-यात्रांसाठी देवांच्या गाण्यांना चांगली मागणी होती. आई आणि मामांची गाणी ऐकून वसंतभाऊंनासुद्धा गाण्याची आवड लागली. पाचवी-सहावीत असल्यापासूनच ते आई आणि मामासोबत गाणी गात. परिस्थितीमुळे वसंतभाऊंनी नववीमध्ये शाळा सोडून दिली आणि एका कंपनीत ऑफिसबॉयचं काम पकडलं. नंतर त्यांनी पोटासाठी अनेक छोटीमोठी कामं केली. पण कामाच्या रगाड्यात गाण्याचा छंद क...