वस्तीतले धडपडे : संधीच्या शोधातला हरहुन्नरी गायक वसंत सगट

प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला गायनात सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या गायकाची गोष्ट..

योगेश जगताप

“मला गायचंय. गात रहायचंय. लोकांनी मला माझ्या आवाजाने ओळखलं पाहिजे.” हे शब्द दत्तवाडीत राहणाऱ्या 34 वर्षीय वसंत सगट यांचे. ते उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवतात. पण त्यातून वेळ मिळेल तसा ऑर्केस्ट्रामध्ये गातात, गायनाचा रियाज करतात. ते म्हणतात, “माझी परिस्थिती कशीही असली तरी मी गाणं सोडणार नाही.”   

वसंतभाऊंचे वडील 50 वर्षांपूर्वी कामाच्या शोधानिमित्त पुण्यात आले आणि इथेच स्थायिक झाले. वसंतभाऊंचा जन्म दत्तवाडीतला. त्यांचे वडील भंगार वेचायचे, तर आई घरकाम करायची. आई आणि मामा पोटापाण्याचं सांभाळत देवदेवतांची गाणी गात. घरातील शुभकार्यासाठी, गावातील जत्रा-यात्रांसाठी देवांच्या गाण्यांना चांगली मागणी होती. आई आणि मामांची गाणी ऐकून वसंतभाऊंनासुद्धा गाण्याची आवड लागली. पाचवी-सहावीत असल्यापासूनच ते आई आणि मामासोबत गाणी गात.  

परिस्थितीमुळे वसंतभाऊंनी नववीमध्ये शाळा सोडून दिली आणि एका कंपनीत ऑफिसबॉयचं काम पकडलं. नंतर त्यांनी पोटासाठी अनेक छोटीमोठी कामं केली. पण कामाच्या रगाड्यात गाण्याचा छंद काही सोडला नाही. कामात असताना किंवा मोकळ्या वेळेत ते गुणगुणायचे, रियाज करायचे. आपण गाण्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यायला हवं, असं त्यांना वाटायचं. पण पैसे नव्हते आणि वेळही. 

काही वर्षांनी वसंतभाऊंचे आतेभाऊ सोमनाथ आणि नवनाथ यांनी उस्मानाबादला ऑर्केस्ट्रा ग्रुप सुरू केला. त्यामध्ये त्यांनी वसंतभाऊंना गाणी गायची संधी दिली. वसंतभाऊ काम सांभाळून ऑर्केस्ट्रामध्ये गाऊ लागले. आता वसंतभाऊंना व्यासपीठ मिळालं होतं.  

पुढे वसंतभाऊंचं लग्न झाल्यानंतर त्यांनी पोटापाण्यासाठी रिक्षा चालवायला सुरुवात केली. किशोर कुमार, महंमद रफी, कुमार सानू, मोहम्मद अझीझ वगैरे यांची गाणी गात त्यांचा पॅसेंजरसोबत प्रवास सुरू असायचा. एकदा एका पॅसेंजरने त्यांचा आवाज ऐकला आणि एका गाण्याच्या स्पर्धेची माहिती दिली. वसंतभाऊ स्पर्धेत सहभागी झाले. प्रेक्षकांनी त्यांच्या गाण्यांची वाहवा केली. ‘तुझा आवाज मोहम्मद अझीझसारखा आहे' अशा काहीजणांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर त्यांनी मोहम्मद अझीझ यांची गाणी गायला सुरुवात केली. अझीझ यांची गाणी ते इतके चांगली गाऊ लागले की, 2018मध्ये अजीज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्लीमध्ये एक कार्यक्रम घेण्यात आला होता; यामध्ये त्यांना  ‘व्हॉईस ऑफ मोहम्मद अझीझ' या पुरस्काराने गौरवण्यात आलं. 

वसंतभाऊंना गायनामुळे ओळख मिळू लागली. स्टेजशोसाठी कामं मिळू लागली. एकप्रकारे करियरला सुरुवात झाली होती.  पण 2020 मध्ये कोविड आला आणि गाण्यांचे सगळे नियोजित कार्यक्रम रद्द झाले. त्यामुळे आता वसंतभाऊंना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागतेय. पण ते निराश झालेले नाहीत. ते म्हणतात, “कितीही अडथळे आले तरी एक ना एक दिवस गायनात नक्की नाव कमावणार! ”

अंक - एप्रिल 2022  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वस्तीतले धडपडे : पुण्यातल्या तृतीयपंथीयांच्या सन्मानासाठी झटणाऱ्या चांदणी गोरे

वस्तीतले धडपडे : विद्यार्थ्यांच्या रूपात स्वत:चं स्वप्न पूर्ण करणारा हनुमंत रेगी

कथा संघर्षाची : रॉकस्टार मंगलताई