वस्तीतले धडपडे : विद्यार्थ्यांच्या रूपात स्वत:चं स्वप्न पूर्ण करणारा हनुमंत रेगी
वडारवाडीतला एक तरूण स्केटिंगसारख्या महागड्या समजल्या जाणाऱ्या खेळात नॅशनल चॅम्पियनशिप खेळतो. तेवढ्यावरच न थांबता पुढील पिढी तयार करण्यासाठी धडपडत राहतो. संकटावर मात करत यश मिळवणाऱ्या 'स्केटिंग कोच'ची कहाणी
मयूर पटारे
स्केटींग हा खेळ तसा अनेकांसाठी अपरिचित. पण पुण्यातील एक तरुण हा खेळ शिकतो. त्यात विशेष कामगिरी करतो. स्केटींगमध्ये नॅशनल चॅम्पियनशिप खेळतो आणि एवढ्यावरच न थांबता पुढील पिढी तयार करण्यासाठीही धडपडत राहतो. संकटावर मात करत ध्येयशील राहणाऱ्या ‘स्केटींग कोच' ची कहाणी.
हनुमंत रेगी हा पुण्यातील वडारवाडीमध्ये राहणारा हरहुन्नरी तरुण. वडारवाडीत पांडुरंग पोलिस चौकीजवळ हनुमंतचा जन्म झाला. आई, वडील, तीन भाऊ आणि पाच बहिणी असा हनुमंतचा परिवार. वडील मजुरी करतात. आई गृहिणी. दोघंही निरक्षर. घरची परिस्थिती हलाखीची. तीन वेळा स्कॉलरशिप मिळवून त्याने दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे त्यानेफ्रँकफीन कॉलेजमधून एव्हिएशनचा कोर्स केला. मॉडर्न कॉलेजमधून बी. ए. पूर्ण केलं. शिक्षण चालू असताना वर्तमानपत्र टाकणं, दूध टाकणं, पुढे सिमकार्डची बंटिंग करणं, तसेच कोविडच्या काळात मित्रांच्या मदतीने रस्त्यावर कपडे विकणं अशी अनेक कामंही त्याने केली. शाळेत असताना काही वर्षं हनुमंत कबड्डी खेळायचा. खेळाडू म्हणुन कळंब रणसम्राट कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनमधून बीपीएडचं शिक्षणही त्याने पूर्ण केलं.
स्केटिंग शिकावं ही गोष्ट त्याच्या ध्यानीमनीही नव्हती. परंतु कबड्डीसाठी चांगला कोच मिळाला नाही आणि स्केटिंगबद्दलचं कुतूहलही मनात होतं. त्यामुळे त्याने 2014 साली स्केटिंग शिकायला सुरुवात केली. अवघ्या वर्षभरात तो स्केटिंगच्या इनलाइन हॉकी या सांघिक क्रीडाप्रकारात डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप खेळला. पूर्णवेळ स्केटिंग शिकायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला घरातून थोडा विरोधही झाला. परंतु हनुमंतचे मामा मल्लेश साखरे आणि कोच अशोक गुंजाळ सर यांनी त्यांना समजावून सांगितलं. घरातील विरोध मावळला. ‘स्केटिंग हा सर्वसामान्यांचा खेळ नाही असा समज आहे. त्याची किट विकत घेणं खर्चिक असतं. परंतु जिद्द आणि सचोटी असेल तर सर्वसामान्य घरातील मुलंदेखील हा खेळ खेळू शकतात', असं हनुमंत सांगतो.
2016 साली त्याची नाशिक इथे होणाऱ्या स्टेट लेव्हल स्केटिंग चॅम्पियनशिपसाठी निवड झाली. हनुमंतच्या आयुष्यातील ती पहिली चॅम्पियनशिप. त्यात त्याला गोल्ड मेडल मिळालं. पुढे सलग दोन वर्षं स्टेट चॅम्पियनशिपमध्ये त्याला ब्राँझ आणि सिल्व्हर मेडल्स मिळाली. 2018 सालची स्टेट चॅम्पियनशिप खेळल्यानंतर त्याची नॅशनलसाठी निवड झाली. 2018मध्ये विशाखापट्टणम इथे झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये तो महाराष्ट्र संघाकडून खेळला. 2019मध्ये दुसऱ्यांदा नॅशनल चॅम्पियनशिप खेळल्यानंतर त्याची इंडिया गेम्सच्या निवड प्रक्रियेसाठी निवड झाली. (इथे निवड झालेल्या खेळाडूंना एशियन व इंटरनॅशनल खेळांमध्ये भारतीय संघाकडून खेळता येतं.)
एका बाजुला स्केटींगमध्ये यश मिळत असतानाच दुसरीकडे 2020 मध्ये अपघातात त्याचं घर जळालं. त्यातच त्याची भारतीय संघाकडून खेळण्याची संधी हुकली. एक तर घर जळाल्यामुळे रस्त्यावर यायची वेळ आलेली, त्यात पुढे दोनच दिवसांत कोरोना टाळेबंदी सुरू झाली. काय करावं हे हनुमंतला समजत नव्हतं. खेळणं बंद झालं तेव्हा आयुष्यच संपलं की काय असं हनुमंतला वाटत होतं. तरी या सर्व गोष्टींवर मात करत लॉकडाऊननंतरही तो स्टेट चॅम्पियनशिप खेळला. परंतु आर्थिक अडचणींमुळे त्याला पुढे खेळता आलं नाही. त्याचं स्केटिंगचं स्वप्न इथेच थांबलं, पण हनुमंत खचला नाही तर खंबीर होऊन उभा आहे. तो सध्या ‘विटकर ग्रुप ऑफ स्कूल'मध्ये खेळाचा शिक्षक म्हणून काम करतो. तसेच ‘चॅम्पियन्स स्केटिंग क्लब'च्या माध्यमातून मुलांना स्केटिंगही शिकवतो. आणि हे सर्व करत असताना आपल्या आसपासच्या परिसरात कुणी आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठीही धडपड करतो. त्यासाठी आपल्या पगारातील दहा टक्के रक्कम बाजूला काढून ठेवतो.
“छोट्या वस्तीतील मुलं बिघडलेली असतात असं सर्वांना वाटतं. पण त्यांना कुणी आधार दिला, मार्गदर्शन केलं तर तीही पुढे जाऊन चांगलं आयुष्य जगू शकतात. एवढंच नव्हे तर इतरांनाही आधार देऊ शकतात. आर्थिक अडचणींमुळे आयुष्यात मी स्वतःला जिथे पाहत होतो तिथे पोहोचू शकलो नाही. मला नॅशनलपर्यंत जाऊन थांबावं लागलं. परंतु माझ्या विद्यार्थ्यांना मी नक्कीच त्याही पुढे पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. माझं अपूर्ण राहिलेलं स्वप्न मी या मुलांच्या रूपात पाहतो. त्यांनी एशियन, वर्ल्ड, ऑलिंपिकपर्यंत खेळावं अशी माझी इच्छा आहे.” हनुमंत म्हणतो. एवढी संकटे येऊनही त्यांना निडर होऊन भिडणाऱ्या हनुमंतच्या जिद्दीला सलाम.
स्केटिंग म्हणजे काय?
बर्फावरून किंवा जमिनीवरून स्केट्सच्या मदतीने घसरत जाण्याला स्केटिंग म्हणतात. स्केट्स म्हणजे तळाशी ब्लेड किंवा चाकं लावलेले बुट. या बुटांचा बर्फावरून किंवा जमिनीवरून घसरत जाण्यासाठी वापर केला जातो. स्केटिंगचे तीन मुख्य प्रकार आहेत. आइस, रोलर आणि कलात्मक स्केट्स. स्केटिंगचा सर्वांत जुना प्रकार म्हणजे आइस स्केटिंग. आइस हॉकी हा एक सांघिक खेळ आहे ज्यासाठी स्केटिंग आवश्यक असतं. रोलर स्केट्समध्ये ब्लेडऐवजी चाकं वापरली जातात. रोलर डान्सिंग, फिगर स्केटिंग आणि स्पीड स्केटिंग हे प्रकार गुळगुळीत जमिनीवर खेळले जातात.
अंक - मे 2024
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा