कथा संघर्षाची : मी स्वत:शीच पैज खेळते...
भारतात दर पाचव्या मिनिटांला एक बाई नवऱ्याचा मार खाते. ही कुचंबणा झुगारता येते. लक्ष्मी वाल्हेकरांनी हे दाखवून दिलंय...
प्रशांत खुंटे
![]() |
लक्ष्मी वाल्हेकर |
तुला वाटलं असंल मी खचंल. मी रडंल. तुझा वंश तर मिटला. ल्योक वारला. पण मी माझ्या लेकींना कमी पडू देणार नाही. लक्ष्मीताईंचा छोटासा मुलगा वारला. त्या दिवशी त्यांनी नवर्याला हे सुनावलं. आपण सोसलं ते मुलींच्या वाट्याला येवू नये. असं त्यांना वाटतं. ‘मी तीस वर्षांची होईल तोवर माझ्या पायावर उभी राहिलेली असेल!' घर सोडताना त्यांनी नवर्याला दिलेलं हे वचन खरं करून दाखवलंय. त्यांनी तिशी ओलांडली. आज त्या खंबीरपणे जगताहेत.
लक्ष्मी वाल्हेकरांनी तमाम कष्ट सोसले. स्वत:च्या हिमतीवर मुलीचं लग्न केलं. दुसर्या मुलीच्या शिक्षणासाठी त्या झटताहेत. पैशांची चणचण असतेच. पण हरहून्नरी लक्ष्मीताई नवनव्या रोजगार संधी शोधतात. त्या आठवीपर्यंतच शिकल्यात. आय.टी. कंपनीत त्या झाडलोट करत. तिथे लोक आपसात इंग्रजी बोलत. कानांवर पडलेले ते शब्द यांनी टिपले. त्यांचे अर्थ लावले. त्यामुळे त्या कामापुरतं इंग्लिशही बोलू लागल्या. अल्पशिक्षित असलेल्या लक्ष्मीताई आज कोविड हॉस्पीटलध्ये सुपरवायजर आहेत. त्यांनी काँप्युटर शिकण्याचाही प्रयत्न केला. एका कंपनीत त्यांना काँप्युटरवरचं काम मिळेल अशी आशा आहे. त्यासाठी त्यांनी एम.एस.सी.आय.टी. कोर्स लावला. पण त्या कोविड हॉस्पिटलमध्ये काम करतात हे ट्रेनिंग सेंटरला समजलं. त्यामुळे त्यांनी यांना ‘येवू नका' म्हणून सांगितलं. कष्ट-अपमान लक्ष्मीताईंना नवा नाही. ‘हरायचं नाही!' हे जणू त्यांचं घोषवाक्यच. बालपणातच ते मनात रूजलं असावं.
नावदेव खाडे रेल्वे स्टेशनला गोदीत सिमेंटच्या गोण्या उतरवत. या हमालीतून त्यांना आजार जडला. सिमेंटची धुळ नाकातोंडातून जावून फुफ्फुसं निकामी झाली. मग त्यांनी हातगाडीवर भंगारचा धंदा सुरू केला. त्यांची पत्नी अक्काबाईही भंगार वेचायची. नामदेव-अक्काबाईची धाकटी मुलगी लक्ष्मी. या दांपत्यानं कसंबसं दोन मुलींची लग्नं लावलेली. पैकी एक मुलगी एकदा माहेराला आली. अचानक तिची तब्येत बिघडली. त्याच दिवशी ती वारली. या धक्क्यानं नामदेवराव खचले. त्यांचा दमा बळावला. काम होईनासं झालं नि औषधांचा खर्च वाढला. मग गरीब मायबापाला लक्ष्मी आधार देवू लागली. मी मिसरीच्या पुड्या भरायचे. हजार पुड्या भरल्यावर वीस रूपये मिळायचे. लक्ष्मीताई सांगतात, शाळा सुटली. मी घरातली सगळी कामं मन लावून करायचे. म्हणून मला लगेच स्थळ आलं. तेव्हा माझं वय चौदा होतं. नवरामुलगा मंडप बांधायचं काम करायचा. दिवसाला पाचशे रूपये हजेरी मिळवायचा. नवरा कधीकधी ड्रींक करायचा. पण बोलायला गोड होता. त्यामुळे मी संसारात रमले. लक्ष्मीताई सांगतात.
लग्नानंतर पहिल्या सालात लक्ष्मीताईंना मुलगी झाली. त्या म्हणतात, मला दुसरीही मुलगीच झाली. त्या टेन्शनध्ये नवर्याची दारू वाढली. पण दोन मुलींच्या पाठिवर मुलगा झाला. तरी त्यांची दारू सुटंना. मग हे व्यसनच म्हणायचं ना? तीन अपत्य झालेली. नवर्याची कमाई दारूत जात होती. लक्ष्मीताईंनाच संसाराची जबाबदारी घेणं भाग होतं. मला एका कंपनीत हाऊसकिपिंगचं का मिळालं. साडेतीन हजार रूपये पगार. त्यात कसं भागणार? पोरांना शाळेत सुकडी मिळायची. ती शिजवून पोरांना द्यायचे. उपाशीच कामाला जायचे. कंपनीत चहा-बिस्किटं मिळायची. त्यावर मी दिवस काढले. अशातच एकदा त्यांचा मुलगा आजारी पडला. त्याचा ताप मेंदूत गेला. सतरा दिवस तो बेशुद्ध होता. मुलगा नंतर बरा झाला. पण या आजारपणामुळे सात-आठ हजारांचं कर्ज झालं. ते फेडण्यासाठी त्यांनी गावी उसतोड कामगार म्हणून जायचा निर्णय घेतला. एक वर्ष हे काम करून कर्ज फेडलं. मग पुन्हा पुण्यातील कंपनीत झाडलोटीचं का मिळालं.
लक्ष्मीताईंना ठेकेदारानं कंत्राटी कामगार म्हणून नेमलेलं. नोकरी टिकायची खात्री नव्हती. ‘गरजवंत जास्त-संधी कमी' अशी गत. सोबतच्या बायका नेहमी भांडणं काढत. ‘भांडकुदळ ठरवली की हिला काढतील. मग आपल्या माणसाला इथं नोकरी मिळेल' असा त्यांचा होरा असे. पण लक्ष्मीताईंनी अशा तंट्यात भाग घेतला नाही. कसंही करून नोकरी टिकवणे हेच त्यांचं ध्येय्य होतं. त्या पदराला पिन लावून टापटिप येत. आपण नीटनेटकं राहिलो तर नवी नोकरी मिळेल अशी त्यांना आशा होती. अशात शेजारणी माझ्याद्दल कुजबुजायला लागल्या त्या सांगतात, ही चालत जातीया व्हय? जात आसंल कुणाच्यातरी फटफटीवर बसून. असलं बोलणं नवर्याच्या कानांवर पडू लागलं. मग मी घरी आले की नवरा शिव्या देवू लागला. मारहाण करू लागला. एकदा तर रस्त्यात पाठलाग करत आला. सगळ्यांदेखत रस्त्यातच त्यांनी मला मारलं. नवरा आपली कमाई लॉटरी व दारूवर खर्च करत होता. ‘त्यानं घरखर्चाला हातभार लावला नाही तरी चालेल. फक्त पोरांना सांभाळावं!' इतकीच लक्ष्मीताईंची अपेक्षा. पण नवर्याच्या डोक्यावर संशयाचं भूत बसलेलं. त्रास वाढतच गेला. मी भांडी घासायला बसले की तो भांड्यांवर मुतायचा. लक्ष्मीताई सांगतात, मग मी वेगळी झाले. वेगळं राहू लागल्यावरही पतीराज हक्कानं येत. यांच्याकडे राहत. पैसे घेत. नवं कर्ज करून निघून जात. अशी कित्येक कर्ज लक्ष्मीताईं फेडत राहिल्या.
लक्ष्मीतांनी मिळेल ते काम इमानदारीनं केलं. पण काही लोकांना गरीबांची इमानदारीही कळत नाही. याचा एक अनुभव त्या सांगतात. मी एका ठिकाणी बाळ सांभाळायला जायचे. ते पोरगं मतिंद होतं. माझ्या लेकराइतकीच मी त्या बाळाला माया लावली. माझा खाडा झाला, तर त्या पोराचं डायपरही कुणी बदलत नव्हतं. मी त्या बाळाचं हागणं-मुतणं काढलं. लय जीव लावला. इतकं प्रेम देवूनही लक्ष्मीताईंना मात्र गरजेच्या वेळी त्या श्रींमतांची साथ मिळाली नाही. त्या सांगतात, एकदा माझी मुलगी आजारी होती. दवाखान्यात पाच हजार भरायचे होते. मी मालकांना पैसे मागितले. त्यांनी नकार दिला. ती लोकं रोज पार्टी करायचे. व्हाटसप स्टेटसला पार्टीचे फोटो लावायचे. त्या पार्ट्यांना सहज हजारो रूपये उडवत असतील. पण माझ्या लेकरासाठी त्यांनी थोडे पैसे उधारीनं दिले नाहीत. या अनुभवानंतर त्यांनी घरकामांची लाईन सोडली. सिक्युरिटी गार्डचं काम मिळवलं.
कोरोना साथ आल्यानंतर लक्ष्मीताईं कोविड वॉर्डात नोकरी करू लागल्या. त्या म्हणतात, रोगाला भिवून कसं चालंल. भिलं तर जगायचं कसं? त्या जंबो हॉस्पिटलध्ये बाऊन्सर म्हणून काम करू लागल्या. सुरूवातीच्या काळात रोज चार-पाच कोविड रूग्ण मरत. मृतांच्या नातेवाईकांना सावरणं, प्रेतांना रूग्णवाहिकेपर्यंत नेईपर्यंतची व्यवस्था पाहणं ही कामं लक्ष्मीताईंनी धीटाईनं केलीच. शिवाय कोविड वॉर्डातील चोरी पकडण्यातही महत्त्वाची भूमिका निभावली.
अशा खंबीर लक्ष्मीताई एकेकाळी गुमान नवर्याची मारहाण सहन करत होत्या. त्या जुलमाला त्यांनी ठोकर दिली. त्यांच्या एकुलत्या मुलाचा अचानक मृत्यू झाला. हे मूल वारलं तेव्हाही बाप त्याच्या जवळ नव्हता. त्यामुळे या मुलाच्या पार्थिवासमोर लक्ष्मीताईंनी शपथ घेतलेली. ‘मुलगा गेला. पण मी मुलींना कमी पडू देणार नाही!' ही शपथ त्यांनी खरी केलीय. सध्या त्या भाड्याच्या खोलीत राहतात. कसाबसा खर्चांचा मेळ घालतात. पण भीशीध्ये थोडी थोडी रक्कम बाजूला टाकतात. 2017 मध्ये त्यांच्या मुलीचा अपघात झाला. आईवर ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. अशा आकस्मिक खर्चांचा सामना त्या करत राहतात. पण हल्ली त्यांचा नवरा इतरांना सांगतो, माझी बायकापोरं सोन्यासारखी आहेत. दारूनं माझा घात केला. नवर्याची दारू सोडण्याची इच्छा नाही. त्यामुळे लक्ष्मीताई स्वत:च्या हिमतीवरच खंबीर वाटचाल करताहेत. त्या म्हणतात, मी मलाच चॅलेंज देते. स्वत:शी पैंज खेळते.
‘काँप्युटर शिकले तर एका कंपनीत चांगली नोकरी मिळेल.' या आशेवर लक्ष्मीताई भविष्याची स्वप्नं रंगवताहेत. ही बाई तत्त्वाची आहे. शिव्या, टोमणे, संशय, बळजबरीचा लैंगिक संबंध, पैशांची मागणी अशा प्रकारची हिंसा अनेक महिला सहन करतात. लक्ष्मीताई या सगळ्या प्रकारांना पुरून उरल्यात. अशा अनेक लक्ष्मीताई आपल्या अवतीभवती आहेत. त्या दिसल्या तर त्यांना आदराने तुम्ही सलाम कराल ना? अशा अनेकिंनी नियतीशी पैंज लावलीय. त्यांना हरू न देणं हे आपलंही कर्तव्य आहेच!
नमुना अंक - जानेवारी 2021
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा