कथा संघर्षाची : प्रायव्हेट रोडचा शिंदेशाही गायक प्रल्हाद शिंदे

एकीकडे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वॉर्डबॉयचं काम करत दुसरीकडे गायनाचा छंद जोपासणारे ताडीवाला रोड वस्तीतले प्रल्हाद शिंदे. गण-गवळण, भीमगीत, बुद्धगीत, स्मृतिगीत, शोकगीत.. अशा अनेक हिंदी-मराठी गाण्यांवर आपल्या आवाजाचा ठसा उमटवणाऱ्या प्रल्हाद शिंदे यांच्याविषयी..

अर्जुन नलवडे

 ‘आग लावली पाण्याला..', ‘गाई कोकिळा गाणे..', ‘तुझा फोन आल्यावर मनाला वाटतं बरं..' अशी एकापेक्षा एक सरस गाणी ऐकणाऱ्यांना खिळवून ठेवतात. ही गायली आहेत प्रायव्हेट रोड वस्तीत राहणाऱ्या प्रल्हाद शिंदे यांनी. पहाडी आवाजाचा गायक म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

त्यांचा जन्म ताडीवाला रोड वस्तीमध्ये 14 फेब्रुवारी 1965ला झाला. त्यांचे आई-वडील रेल्वेत मालधक्क्यावर काम करायचे. घरची आर्थिक स्थिती बेताचीच होती. तरी ते बारावीपर्यंत शिकले. त्यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती. शाळेतील पुस्तकांपेक्षा गाण्यांच्या पुस्तकात ते जास्त रमायचे. रस्त्यावर गाणाऱ्या गायकांची गाणी ऐकण्यात मग्न होऊन जायचे. त्यांच्या गाण्याला घरातील लोकांचा विरोध झाला, पण त्यांनी गाणं काही सोडलं नाही. 

शिंदे सांगतात, “पूर्वी रस्त्यांवर गायनाचे कार्यक्रम व्हायचे. शाळेत जाताना असे कार्यक्रम दिसले की मी तासन्‌तास तिथेच गाणी ऐकत उभा राहायचो. या कार्यक्रमांच्या शेवटी गाण्याची पुस्तकं मिळायची. ती पुस्तकं विकत घ्यायचो आणि गाण्याचा सराव करत बसायचो. गाणी तोंडपाठ करायचो. सतत गुणगुणत राहायचो. घरातील भांडी वाजवत गाणी म्हणायचो. माझ्या वडिलांना ते आवडायचं नाही. त्यांना वाटायचं, की मी शिकावं, चांगली नोकरी करावी; पण मला गाण्याशिवाय दुसरं काही सुचायचं नाही.” 

आजूबाजूला गाणं आणि गायन यांचं कसलंच वातावरण नव्हतं. तरीही त्यांनी गायनाचा प्रवास सुरूच ठेवला. 1984पासून शहरापासून गावखेड्यांपर्यंत विविध ठिकाणी त्यांनी गायनाचे कार्यक्रम केले. एका बाजुला गाणं आणि दुसऱ्या बाजुला काहीतरी छोटी मोठी नोकरी असं चालु होतं. दरम्यान त्यांचं लग्न झालं. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा झाला. घरची जबाबदारी वाढली तशी त्यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मेडिकल विभागात वॉर्डबॉय म्हणून नोकरी धरली. प्रल्हाद शिंदे यांनी नोकरी लागण्यापूर्वी आणि नोकरीनंतरही गायनाचा छंद मात्र जाणीवपूर्वक जोपासला. 

शिंदे सांगतात, “लोकसंगीत आणि भक्तिगीतांमध्ये गायक प्रल्हाद शिंदे यांचं नाव आदराने घेतलं जातं. आताचे प्रसिद्ध गायक आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांचे ते वडील होते. सुदैवाने माझंही नाव प्रल्हाद शिंदेच. प्रल्हाद शिंदे यांनाच मग मी गुरूस्थानी मानलं आणि गायनाची वाटचाल सुरू ठेवली.” 

एकदा त्यांना आकाशवाणीतून ‘गण' सादर करण्यासाठी आमंत्रण आलं. त्याप्रमाणे ते तिथे जाऊन गायले. पण तो ‘गण' ऐकण्यासाठी त्यांच्या घरात रेडिओ कुठे होता! मग दुसऱ्याच्या घरात जाऊन त्यांच्या रेडिओवर त्यांनी तो गण ऐकला. शिंदे सांगतात, “आमच्यासारख्या गायकांना आजही पुरेसं मानधन दिलं जात नाही. जे मिळतं त्यातच भागवावं लागतं. केवळ गायनावर घर चालू शकत नाही. त्यामुळे इतर छोटी-मोठी कामं करावी लागतात. त्यातूनच उदरनिर्वाह करत स्वतःचा छंद जोपासावा लागतो.”

भीमगीत आणि बुद्धगीतांचा कार्यक्रम असला की प्रल्हाद शिंदेंना आमंत्रण ठरलेलं असतं. त्यातूनच त्यांची गायकी लोकांना हळूहळू माहीत होऊ लागली. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचे गायनाचे कार्यक्रम होऊ लागले. ते सांगतात, “माझ्या गायनप्रवासात गीतकार सुनील सकट आणि हरिनंद रोकडे यांची मोलाची साथ मिळाली. त्यांनी लिहिलेली ‘आग लागली पाण्याला..' सारखी माझी गाणी सोशल मीडियावर चांगली चालली. त्यातून माझी वेगळी ओळख मला निर्माण करता आली.” 

त्यांनी आतापर्यंत हजारहून जास्त गाणी गायली आहेत. इतकंच नाहीतर त्यांनी 500 हून जास्त गाण्याचे कार्यक्रम केले आहेत. त्यांना अनेक मानसन्मान, पुरस्कार मिळाले आहेत. उषा चव्हाण, ज्योती चांदेकर, मोहन धारिया, ना. सं. इनामदार... यांसारख्या दिग्गजांनीही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. वयाच्या 58व्या वर्षी शिंदे वॉर्डबॉयच्या नोकरीतून निवृत्त झाले. त्यांचं गाणं मात्र सुरूच आहे. आजही प्रायव्हेट रोड वस्तीतील घरात ते गाण्याचा रियाज करत असतात. ते सांगतात, “आता नोकरीतून मोकळा झालो आहे. आता फक्त गायन करायचं. भीमगीत आणि बुद्धगीतांतून त्या महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं.”

अंक - सप्टेंबर 2024

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वस्तीतले धडपडे : पुण्यातल्या तृतीयपंथीयांच्या सन्मानासाठी झटणाऱ्या चांदणी गोरे

वस्तीतले धडपडे : विद्यार्थ्यांच्या रूपात स्वत:चं स्वप्न पूर्ण करणारा हनुमंत रेगी

कथा संघर्षाची : रॉकस्टार मंगलताई