कथा संघर्षाची : 50 वर्षं जुनी जय भोलेनाथ कुल्फी

दत्तवाडी ते मंडई अशा मोठ्या पट्ट्यात बबनरावांची कुल्फी इतकी प्रसिद्ध, की ‘कुल्फी घ्या कुल्फी' असं त्यांना ओरडण्याची गरजच राहिलेली नाही. 

टीम सलाम

काजू-बदाम असलेली चविष्ट कुल्फी विकण्यासाठी आपली गाडी घेऊन घंटी वाजवत फिरणारा; पांढरा शर्ट, पायजमा आणि पांढरी टोपी घातलेला एक म्हातारा माणूस सदाशिव पेठ, नवी पेठ, दांडेकर पूल, दत्तवाडी वगैरे परिसरात राहणाऱ्यांच्या चांगल्या ओळखीचा आहे. त्यांचं नाव आहे बबन शिळीमकर; पण जय भोलेनाथ कुल्फीवाले ही त्यांची लोकांमधली ओळख. गेल्या 50हून अधिक वर्षांपासून ते कुल्फीचा व्यवसाय करत आहेत. त्यांनी घंटी वाजवली की लहान-थोर सगळेच त्यांच्या कुल्फीकडे ओढले जातात. 

वयाच्या अवघ्या सोळा-सतराव्या वर्षी बबनरावांनी ट्रकवर क्लीनर म्हणून काम सुरू केलं. त्या वेळी त्यांच्या आई-वडिलांच्या कानावर अपघाताच्या बातम्या यायच्या. म्हणून त्यांनी बबनरावांना ते काम सोडायला लावलं. पण कमावणं तर भागच होतं. मग बबनरावांनी भाजीपाला विकला, सरबत आणि बर्फाच्या गोळ्यांची गाडी लावली; पण त्यांचं बस्तान बसत नव्हतं. एकदा बबनरावांच्या कुल्फी विकणाऱ्या एका मित्राने त्यांना कुल्फीच्या व्यवसायाची कल्पना दिली आणि कुल्फी कशी बनवायची हे शिकवलं. बबनरावांना हा व्यवसाय सोपा वाटला. त्यांनी कुल्फीचा व्यवसाय सुरू केला. त्यातच हळूहळू जम बसवला.  

जय भोलेनाथ कल्फीचे
मालक बबनराव 

बबनराव रोज सकाळी सहा वाजता उठून खवा भाजतात, दूध उकळवतात, खव्याचं आणि दुधाचं मिश्रण तयार करतात, बाजारातून बर्फ आणतात आणि त्यानंतर नळ्यांमध्ये कुल्फीचं मिश्रण भरतात. दुपारी बारा वाजेपर्यंत कुल्फी तयार झालेली असते. त्यानंतर जेवून ते घराबाहेर पडतात. दत्तवाडी, पानमळा, दांडेकर पूल, नवी पेठ, सदाशिव पेठ असं करत ते मंडईला पोचतात. तिथून मागे फिरत बाजीराव रस्ता, सारसबाग, दांडेकर पूल या परिसरातून रात्री साडेआठला घरी. गेल्या पन्नास वर्षांपासून बबनरावांचा हाच दिनक्रम आहे.  

बबनरावांना भेटायला गेलो तेव्हा सत्तरीतले एक आजोबा कुल्फी खात होते. ते म्हणाले, “35 ते 40 वर्षं झाली यांच्याकडे काजू-बदामवाली कुल्फी खातो. मस्त असते. शिवाय आजवर कधीही त्याचा त्रास झालेला नाही.” बबनराव सांगतात, “जे गिऱ्हाईक माझ्याकडे 30-40 वर्षांपूर्वी यायचे, आज त्यांची नातवंडं माझ्याकडे कुल्फी खायला येतात. काही जुनी गिऱ्हाइकं ‘चार आण्याची कुल्फी' मागतात. कुल्फी 10 रुपयांचीच; पण ते लोक त्यांच्या तरुणपणी चारआण्याला ती कुल्फी घ्यायचे म्हणून त्याचं नावच तसं पडलं.”

बबनरावांना दिवसाकाठी साताठशे, तर कधी हजार रुपये मिळतात. या व्यवसायाच्या जोरावर त्यांनी आपलं घर चालवलं, मुलांना शिकवलं, त्यांची हौसमौज केली, लग्नं लावली. 69 वर्षांच्या बबनरावांना विचारलं, “थकल्यासारखं वाटत नाही का?” त्यावर ते म्हणतात, “थकलो नाही. पण कंटाळा आल्यावर एखाद-दोन दिवस सुट्टी घेतो आणि आराम करतो. या धंद्यात कष्ट आहेत, पण कुणाचं बंधन नाही. वाटलंच तर मी कधीही सुटी घेऊ शकतो.” पावसाळ्याचे काही महिने कुल्फीचा व्यवसाय ठप्प असतो. तेव्हा बबनराव त्याच हातगाडीवर उकडलेल्या आणि भाजलेल्या शेंगा विकतात. पावसाळा संपला की पुन्हा कुल्फीचा व्यवसाय सुरू. 

-  अंक - मार्च 2023


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वस्तीतले धडपडे : पुण्यातल्या तृतीयपंथीयांच्या सन्मानासाठी झटणाऱ्या चांदणी गोरे

वस्तीतले धडपडे : विद्यार्थ्यांच्या रूपात स्वत:चं स्वप्न पूर्ण करणारा हनुमंत रेगी

कथा संघर्षाची : रॉकस्टार मंगलताई