कथा संघर्षाची : दांडेकरपूल वस्तीतला आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अभिनव धामणसकर
दांडेकरपूल वस्तीतल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अभिनव धामणसकर गोष्ट
राहुल शेळके
तुमच्यात तुमची स्वप्नं पूर्ण करण्याची जिद्द असेल तर कोणतंही ध्येय गाठणं अशक्य नसतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे फुटबॉलपटू अभिनव धामणसकर. कष्टकरी कुटुंबात जन्मलेली मुलं फुटबॉलसारख्या खेळामध्ये राहून नाव कमावणं ही गोष्ट अवघड आहे. त्याचं कारण आर्थिक परिस्थिती, त्यात पालकांची खेळांच्या बाबतीत असलेली उदासीनता. त्यामुळे अनेक मुलं-मुली खेळामध्ये करियर करण्याचा विचार करत नाहीत. पण या सर्व मर्यादा अभिनवने ओलांडल्या आणि अवघ्या सतराव्या वर्षी भारतीय फुटबॉल संघाचं प्रतिनिधित्व केलं.
21 वर्षीय अभिनव दांडेकरपूल वस्तीतल्या कोकणे आळीत राहणारा तरुण. त्याचे वडील इलेक्ट्रिशियनची कामं करतात, तर त्याची आई धुण्या-भांड्यांची कामं करते. घरात तो, त्याचा लहान भाऊ, आई-वडील आणि आजी असं पाचजणांचं छोटं कुटुंब. अभिनवला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. त्याला फुटबॉल हा खेळ जास्त आवडायचा.
टिळक रस्त्यावरच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेला फुटबॉलचा मोठा इतिहास आहे. शाळेतले अनेक विद्यार्थी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर खेळलेले आहेत. या शाळेत शिकत असतानाच अभिनवला फुटबॉलची गोडी लागली. अभिनव सांगतो, “आमचे पी.टी.चे शिक्षक जयंत देशपांडे यांच्यामुळे मी फुटबॉलकडे ओढला गेलो आणि शाळेच्या संघात दाखल झालो. मी त्यांच्याकडूनच खेळातील कौशल्यं आणि बारकावे शिकलो.”
![]() |
फूटबाॅलपटू अभिनव धामणसकर |
अभिनव सांगतो, “सुरुवातीला घरचे माझ्या फुटबॉल खेळण्याला विरोध करत होते. फुटबॉल खेळताना हात-पाय मोडेल, काही बरंवाईट होईल अशी घरच्यांना भीती होती. या भीतीमुळे घरचे मला फुटबॉल खेळू देत नव्हते. पण मी घरच्यांची अनेकदा समजूत काढली, उपाशी राहिलो तेव्हा कुठे घरच्यांनी माझ्या खेळण्याला परवानगी दिली.”
अभिनव नववीत होता तेव्हा जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत त्यांच्या संघाने मुंबई-नाशिकच्या मातब्बर संघांना हरवलं. त्या वेळी तो संघाचा कर्णधार होता. शिवाय या स्पर्धेत त्याला सर्वोत्कृष्ट खेळाडूचं बक्षीसही मिळालं. याच्या जोरावर त्याची राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली. अभिनवचा आत्मविश्वास आणखी वाढला. पुढे दहावीत असताना त्याने राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूची चार बक्षिसं पटकावली. दहावीनंतर पुढे त्याने महाविद्यालयात प्रवेश घेतला.
अभिनवच्या कामगिरीचा आलेख हळूहळू उंचावत होता. फुटबॉलमध्ये चांगल्या खेळाडूला चांगल्या क्लबकडून खेळण्याची संधी मिळत असते. मात्र, त्यासाठी पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागते. पण चांगल्या क्लबमध्ये दाखल होण्याची अभिनवची आर्थिक परिस्थिती नव्हती. मात्र, त्याची कौशल्यं आणि मेहनत करण्याची तयारी पाहून त्याचा मित्र विराज जोशीने त्याच्या क्लबची दीड वर्षाची फी भरली.
अभिनवला फुटबॉलचं कमालीचं वेड होतं, पण आपल्या घरच्या परिस्थितीची जाणीवही त्याला होती. पदवीचं शिक्षण घेत असतानाच त्याने कामाला जायला सुरुवात केली. एका शाळेमध्ये त्याला क्रीडा प्रशिक्षकाची नोकरी मिळाली. त्यासोबतच लहान मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण देण्यासाठी तो एका क्लबला जाऊ लागला. अभिनव सकाळी 7 ते दुपारी दोनपर्यंत क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम करायचा, त्यानंतर दुपारी येऊन पुन्हा 5.30 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत बावधनला फुटबॉलचं प्रशिक्षण देण्यासाठी जायचा, त्यानंतर संध्याकाळी दोन तास स्वतःच्या सरावासाठी द्यायचा. असा त्याचा धकाधकीचा दिनक्रम होता, आजही आहे.
अभिनव राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर सातत्याने चांगली कामगिरी करत होता. या जोरावर त्याची 17 वर्षांखालील नेपाळ विरुद्ध भारत मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली. त्यासाठी अभिनवला नेपाळला जावं लागणार होतं; पण त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. तेव्हा अभिनवचे नातेवाईक आणि त्याचे मित्र मदतीला धावून आले. अभिनवला नेपाळला जाण्यासाठी 17 वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघात खेळण्याची संधी मिळाली. त्याचं सोनं करत त्याने त्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.
अभिनव सांगतो, “17 वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघाकडून खेळणं हा माझ्या आयुष्यातला सर्वांत मोठा क्षण होता. पुढे भारताच्या मुख्य संघाकडून खेळण्याचं माझं स्वप्न आहे.” तो पुढे सांगतो,“माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप मेहनत घेतो आहे. मला फुटबॉलच्या सरावावर आणि फिटनेसवर पूर्ण लक्ष केंद्रित करता यावं यासाठी मी प्रायोजकांच्या शोधात आहे.” अभिनवला अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. पण खडतर परिस्थितीत त्याची आजवरची कामगिरी खेळात करियर करू इच्छिणाऱ्या तरुणांना दिशादर्शक ठरेल.
आम्हाला अभिनवचा खूप अभिमान वाटतो. कारण तो शिक्षण घेतोय, घरच्या जबाबदाऱ्याही पार पाडतोय आणि सरावासाठीदेखील मेहनत घेतोय. तो फुटबॉलमध्ये इतकी प्रगती करेल असं वाटलं नव्हतं. कारण आमच्या कुटुंबात आजवर कोणीच खेळामध्ये करियर केलेलं नाही. पण माझ्या मुलाने नेपाळला जाऊन भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या सामन्यांना जातो तेव्हा त्याचा खेळ पाहून आम्हाला खूप आनंद होतो. त्याने फुटबॉलमध्येच करियर करून मोठं व्हावं आणि आपलं नाव कमवावं हीच आमची इच्छा आहे.
- सुषमा धामणसकर, अभिनवची आई
अंक - सप्टेंबर 2023
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा