कथा संघर्षाची : तेजस इंदापूरकर; सिनेस्वप्नाचा पाठलाग

आपण या वस्तीमध्ये जन्मलो आणि इथेच आपली माती होणार, असं वाटत असेल तर थोडं थांबा. तेजस इंदापूरकर या तरुणाच्या स्वप्नांची झेप पहा...

अप्सरा आगा

पुण्याच्या दांडेकर पुलाजवळील वस्तीत जन्मलेला नि वाढलेला तेजस इंदापूरकर. हा मुलगा सध्या मुंबईत टिव्ही वाहिन्यांवरील मालिकांचा असिस्टंट डायरेक्टर आहे. पण त्याचं स्वप्नं केवळ कॅमेऱ्यामागे राहण्याचं नाही. त्याला पडद्यावर यायचंय. आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तो जीवतोड मेहनत घेतोय.

तेजस छोटा होता तेव्हापासून घरात गरिबी होती. तेजसची आई घरोघरी जाऊन जुने कपडे गोळा करायची. ते शिवून विकायची. वडील घरातच लोकांचे कपडे इस्त्री करून देत. या दोघांच्या मेहनतीतून कसंबसं निभत होतं. त्यातच तेजसच्या वडिलांना दारूचं व्यसन लागलं. पाठोपाठ कसल्याशा आजाराने त्यांचे डोळेही अधू झाले. काम जवळपास थांबलंच. त्यामुळे तेजसच्या आईवर घराची सगळी जबाबदारी आली. त्यामुळे त्यांनी डबल काम सुरू केलं. दिवसा एका ऑफिसमध्ये मोलकरणीचं काम करायचं आणि कामावरून आल्यावर कपड्यांना इस्त्री करायची.

अशा कठीण परिस्थितीत तेजस मोठा होत होता. शिकत होता. तो साने गुरुजी संस्थेच्या रावसाहेब पटवर्धन शाळेत जात होता. पण शिक्षणात त्याचं कधी लक्ष लागलं नाही. त्यामुळे तेजसच्या आईला, मीनाताईंना त्याची खूप काळजी वाटायची.” पण तेजस दहावी पास झाला, कॉलेजात जाऊ लागला. तेव्हा कुठे मीनाताईंचा जीव भांड्यात पडला.

तेजस इंदापूरकर
पटवर्धन शाळेत निळू फुले कला अकादमी आहे. या कला अकादमीमुळे तेजसला नाटकात-पथनाट्यात काम करण्याची संधी मिळाली होती. त्याचं मन या नाटकांमध्ये रमायचं. ‘पण नाटकं करून पोट भरता येईल का?’ या आईच्या प्रश्नावर तेजसकडे उत्तर नसे. मग तो पुन्हा अभ्यासात लक्ष घाले. पण घरात वडलांचं व्यसन, आईच्या चेहऱ्यावर सततची काळजी, अशा वातावरणात तेजस बारावीत नापास झाला. त्यानंतर मात्र त्याने शिक्षण थांबवलं.

पुढे काय करायचं हे कळत नसतानाच अचानक त्याचं आयुष्य बदलवणारी घटना घडली. एक दिवस तेजसला त्याच्या शाळेसमोर एक पोस्टर दिसलं. या पोस्टरमध्ये तेजसला आपलं ध्येय सापडलं.

हे पोस्टर होतं ॲक्टिंगच्या वर्कशॉपचं. तेजसला ॲक्टिंग करण्यात रस होताच. त्यामुळे त्याला या वर्कशॉपबद्दल उत्सुकता वाटली. पण त्यासाठी नावनोंदणी करायला पैसे भरावे लागणार होते. ते पैसे कसे उभे करायचे, हा मोठा प्रश्‍न होता. पण इच्छा असल्याने त्याने कामं शोधायला सुरुवात केली. शेवटी एका चहा कंपनीत त्याला मार्केटिंगचं काम मिळालं. दोन महिने तिथे काम करून त्याने पैसे उभे केले आणि वर्कशॉपमध्ये प्रवेश घेतला. या कार्यशाळेमुळे तेजसने ॲक्टिंगचं करियर अधिक मनावर घेतलं.

वर्कशॉप संपल्यावर त्याने त्याच्या वस्तीतल्या ॲक्टिंगची आवड असणाऱ्या मुलांना एकत्र करून एक ग्रुप बनवला. तो नाटकं लिहू लागला. बसवू लागला. या नाटकांचे थिएटरमध्ये शो लावणं पैशाअभावी शक्य नव्हतं. त्यामुळे तेजसने त्यावर मार्ग शोधला. त्याने पथनाट्य म्हणजे रस्त्यावर सादर करण्याची नाटकं बसवायला सुरुवात केली. नाटकांच्या तुलनेत पथनाट्यं बसवायला खर्च अगदीच कमी यायचा. लोकांना पथनाट्य आवडलं तर थोडेफार पैसेही मिळायचे. त्यातून पुढच्या नाटकाचा खर्च निघायचा. असं चक्र आठ-नऊ वर्षं सुरू होतं. या काळात तेजसला नाटक बसवण्याचा, मुलांसोबत काम करण्याचा, लोकांना काय आवडतं-काय नाही या सगळ्याचा अनुभव मिळाला. आणि त्यातूनच त्याच्यासाठी संधीचं नवं दार उघडलं.

दिल्लीच्या सुप्रसिद्ध ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मध्ये शिकलेले अभिनेते गिरीश परदेशी यांनी तेजसचं काम पाहिलं होतं. त्यांनी त्याला एका हिंदी नाटकात संधी दिली. पुढे त्याने परदेशी सरांसोबत अनेक नाटकांमध्ये कामं केली. महाराष्ट्रभर दौरे केले. या काळात त्याने खूप शिकून घेतलं. त्याच्या या मेहनतीमुळेच त्याला ‘प्रवास' या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बाळूमामा' या मालिकेतही त्याला छोटासा रोल मिळाला.

तेजस इंदापूरकर आणि अभिनेते अशोक सराफ
 त्याची कामं पाहून प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या ‘कोठारे व्हिजन' या कंपनीत त्याला नोकरीची संधी मिळाली. लॉकडाउन काळात त्याने ही संधी स्वीकारली. तेजस सध्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?' या मालिकेसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करतो आहे. सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत तो काम करतो. मुख्य दिग्दर्शक व कलाकार सेटवर येण्यापूर्वीची सगळी तयारी तो करतो. कोणता सिन शूट होणार आहे, मागील सिनमध्ये मेकअप कसा होता, कोणते संवाद कलाकारांनी म्हणायचेत या सगळ्याची जबाबदारी तेजस निभावतो. एकदा सेटवर गेला की दोन घास खाण्यापुरतीच काय ती विश्रांती त्याला मिळते. पण या धावपळीच्या आयुष्यातही तो ॲक्टर बनण्याचं स्वप्नं उराशी बाळगून आहे. तो म्हणतो, ‘दिग्दर्शकांना अनेकांची टीम सांभाळावी लागते. माझ्यात ते मटेरियल नाही. मी नट आहे. मला जे उत्तम जमतं ते मी करीन. मी ॲक्टर होईनच.”

तेजसच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. मीनाताई अजूनही कामं करतात. पण आता त्यांना मुलाची आधीसारखी चिंता वाटत नाही. दांडेकर पुलाजवळच्या वस्तीत राहून त्याची आई आपल्या लेकराचं स्वप्न पूर्ण होण्याची वाट पाहतेय.

अंक - सप्टेंबर 2021

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वस्तीतले धडपडे : पुण्यातल्या तृतीयपंथीयांच्या सन्मानासाठी झटणाऱ्या चांदणी गोरे

वस्तीतले धडपडे : विद्यार्थ्यांच्या रूपात स्वत:चं स्वप्न पूर्ण करणारा हनुमंत रेगी

कथा संघर्षाची : रॉकस्टार मंगलताई