कथा संघर्षाची : पावसाळ्यात पडणारं घर उभं केलं ‘अन्नपूर्णा'ने
‘अन्नपूर्णा'च्या साथीने उभं राहिलं वंदनाताईंचं घर
टीम सलाम
दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या वंदना सचिन जगताप या अन्नपूर्णा परिवाराच्या अनेक वर्षांपासूनच्या सदस्य. दोन मुलं, सासू-सासरे, पती आणि त्या असं हे कुटुंब पत्र्याच्या घरात राहायचं. 38 वर्षांच्या वंदनाताईंचे पती बांधकाम साइटवर सुपरवायजर म्हणून काम करतात. गृहकर्जासाठी त्या दोन वर्षं वेगवेगळ्या बँकांचे उंबरे झिजवत होत्या, पण त्यासाठी लागणारी कागदपत्रं आणि सरकारी नोकरीमध्ये असणारे दोन जामीनदार मिळणं अवघड जात होतं. शिवाय व्याजदरही खूप जास्त होता. पण ‘अन्नपूर्णा' संस्थेच्या सभासद असल्यामुळे वंदनाताईंना घराच्या डागडुजीसाठी सहजपणे कर्ज मिळालं.
“पूर्वी आमचं पत्र्याचं घर होतं. पावसाळ्यात घराजवळच्या नाल्याला पूर आला की घराच्या दोन भिंती दरवर्षी कोसळायच्या. पावसाळ्यात घरी राहणंही कठीण व्हायचं. माणसाने जायचं तरी कुठे? पडलेल्या भिंती दरवर्षी पुन्हा बांधाव्या लागायच्या. ‘अन्नपूर्णा'ने गृहकर्ज दिल्यामुळे पक्कं घर बांधलं आणि आमची अडचण कायमची दूर झाली,” असं वंदनाताई सांगतात.
वस्तीपातळीवर राहणाऱ्या आणि कमी उत्पन्न गटातील महिलांसाठी ‘अन्नपूर्णा' नेहमीच वेगवेगळ्या योजना आणत असतं. अन्नपूर्णा परिवारासोबत जोडलं गेल्यामुळे महिलांना दरमहा बचतीचं महत्त्वही समजतं. संस्थेतील महिला सहकारी विविध योजनांची आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची व्यवस्थित माहिती देतात. त्यामुळेच अन्नपूर्णा ही आमच्यासारख्या कष्टकरी महिलांसाठी सगळ्यात भरवशाची पाठराखीण आहे असं वंदनाताईंना वाटतं.
सासरे वारले तेव्हादेखील वंदनाताईंना ‘अन्नपूर्णा'मुळेच तातडीची मदत मिळू शकली.. कुटुंबातलं कुणी आजारी असेल तर रुग्णालयात दाखल करण्यासाठीच्या, तसंच रुग्णालयात मिळणाऱ्या विविध सवलतींसाठीच्या कागदपत्रांविषयी ‘अन्नपूर्णा'कडून सगळी माहिती मिळते. ‘अन्नपूर्णा'च्या बचत योजनेचा हप्ता घ्यायला येणाऱ्या सुजाता मॅडम, रेखा मॅडम नेहमी सहकार्य करतात. शिवाय अन्नपूर्णाकडून हप्त्यासाठी कधीही तगादा लावला जात नाही, असं वंदनाताई सांगतात.
वंदनाताईंच्या मुलांच्या जन्मापासून त्यांच्या कुटुंबाला आरोग्यविम्याचा लाभ मिळत आहे. वैद्यकीय खर्चात ‘अन्नपूर्णा आरोग्यविम्या'चा मोठा आधार आहे. त्यामुळेच इतर गरजू महिलादेखील ‘अन्नपूर्णा' संस्थेशी जोडल्या जाव्यात असं वंदनाताईंना वाटतं.
अंक - मार्च 2024
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा