कथा संघर्षाची : ‘अन्नपूर्णा'च्या मदतीने मी सावरले

‘अन्नपूर्णा परिवारा'च्या मदतीने एक महिला छोटी-मोठी कर्जं घेऊन आपल्या कुटुंबाला सावरते त्याची गोष्ट. 

टीम सलाम

पुण्याच्या उत्तमनगरमध्ये राहणाऱ्या भारती सूर्यवंशी यांची ही गोष्ट. भारती यांचे पती अशोक रिक्षा चालवायचे. नवरा-बायको आणि सहा महिन्यांची मुलगी असं कुटुंब होतं. पतीच्या उत्पन्नावरच सूर्यवंशी यांचं कुटुंब चालत होतं. पण काही वर्षांपूर्वी त्यांच्या कुटुंबावर मोठं संकट ओढवलं. अशोक यांचं दुर्धर आजाराने निधन झालं. तेव्हा भारतीताईंची मुलगी अवघी ... होती. अशा दुःखद प्रसंगातून सावरणं सोपं नव्हतं. पण भारतीताईंनी मुलीसाठी दुःख बाजूला सारलं. 

घर चालवण्यासाठी भारतीताई छोटी-मोठी कामं करू लागल्या; पण कामावर असताना बाळाला सांभाळणं कठीण जायचं. तेव्हा ओळखीच्या लोकांनी त्यांना घराबाहेरच सुक्या बोंबिलाचा स्टॉल लावण्याचा सल्ला दिला. हा व्यवसाय करताना बाळाचा सांभाळ करणं शक्य होतं. म्हणून भारतीताईंनी बोंबिलाचा व्यवसाय करण्याचं नक्की केलं; पण त्यासाठी भांडवलाची गरज होती. लग्नानंतर भारतीताईंचा दोन्हीकडच्या परिवाराशी फारसा संबंध नव्हता. त्यामुळे त्यांच्याकडे पैसे मागणं शक्य नव्हतं. पैशांची व्यवस्था कशी करायची या चिंतेत असतानाच वस्तीतल्या मैत्रिणींकडून ‘अन्नपूर्णा परिवारा'च्या कर्जयोजनेबद्दल कळलं. भारतीताई कर्ज मिळवण्यासाठी पाचजणींच्या गटात सामील झाल्या. काही हजारांचं कर्ज घेऊन त्यांनी घराला लागूनच सुक्या बोंबिलाचा स्टॉल थाटला. त्यामुळे घरात रोजचं उत्पन्न सुरू झालं. भारतीताईंचा हळूहळू या धंद्यात जम बसला. वर्षं पुढे सरकली. मुलगी शिवानी शाळेत जाऊ लागली. 

कोविडची लाट आणि त्यामुळे आलेल्या लॉकडाऊनने अनेकांच्या कमाईवर, व्यवसायावर घाला घातला. भारतीताईंच्या बाबतीतही असंच घडलं. कोविडकाळात त्यांना सुक्या बोंबिलाचा धंदा बंद करावा लागला. त्यांच्या कुटुंबावर पुन्हा बेरोजगारीचं संकट ओढवलं. त्या सांगतात, “कोविडमुळे मला व्यवसाय बंद करावा लागला. त्यानंतर मी पुन्हा व्यवसाय सुरू करू शकले नाही. पण ‘अन्नपूर्णा'ने हप्त्यांसाठी इतर धंदेवाईक बँकांसारखा कधीही तगादा लावला नाही.” आता भारतीताई पापड बनवण्याचा करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. शिवाय ‘अन्नपूर्णा'चं कर्जही त्या फेडत आहेत. भारतीताई सांगतात, “आजवर कुटुंबावर अनेक संकटं ओढवली. पण ‘अन्नपूर्णा'ने केलेल्या आर्थिक मदतीमुळे मी आणि माझी मुलगी सुखरूप आहोत.”  


कर्जासोबत आरोग्यविमा आणि शिष्यवृत्ती

अन्नपूर्णाच्या कर्जासोबत आरोग्यविम्याचाही लाभ मिळू शकतो. याचा मला माझ्या आजारपणात फायदा झाला. माझी मुलगी आता नववीत शिकत आहे. तिला ‘अन्नपूर्णा' परिवाराकडून विधवा महिलांच्या पाल्यासाठी असणारी 2500 रुपयांची शिष्यवृत्ती दरवर्षी मिळते. मुलीच्या पुढच्या शिक्षणासाठीही मी ‘अन्नपूर्णा'च्या मदतीवर अवलंबून आहे. 

अंक - सलाम जानेवारी 2024  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वस्तीतले धडपडे : पुण्यातल्या तृतीयपंथीयांच्या सन्मानासाठी झटणाऱ्या चांदणी गोरे

वस्तीतले धडपडे : विद्यार्थ्यांच्या रूपात स्वत:चं स्वप्न पूर्ण करणारा हनुमंत रेगी

कथा संघर्षाची : रॉकस्टार मंगलताई