कथा संघर्षाची : सावित्रीबाईंचा जागर मांडणारी उषा कांबळे

घरातून शिक्षणाची अजिबात पार्श्वभूमी नसताना जिद्दीने शिकणाऱ्या आणि सावित्रीबाई फुले यांचा विचार देशापरदेशांत पोचवणाऱ्या उषाची कहाणी.

अर्जुन नलवडे

नगरच्या जामखेडमधील झिक्री हे उषाचं गाव. उषाने ‘होय, मी सावित्री बोलतेय...' या एकपात्री प्रयोगातून झिक्रीपासून थायलंडपर्यंतचा प्रवास केलाय; पण तिचा हा प्रवास सोपा नव्हता. ती भावनिक होऊन त्याविषयी सांगते, “घरात गरिबी पाचवीलाच पुजलेली. त्यात आम्ही चार भावंडं. तीन बहिणी आणि एक भाऊ. मीच त्यांच्यात थोरली. मी चौथीत असताना आमच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. त्यानंतर चार वर्षांनी आईनेही दुसरं लग्न केलं. दोघांनीही आपापला वेगळा संसार मांडला. त्यामुळे आमची जबाबदारी आजीवर आली. मानसिक तणावातून पुढे भावाने आत्महत्या करून जीवन संपवलं. आजीने शेतात काम करून, उसनंपासनं आणून आम्हा तिघींना सांभाळलं.”

घरी अशी परिस्थिती असतानाही उषाने जिद्द सोडली नाही. शिकण्यात रस असल्यामुळे गावात बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यावर ती तालुक्याच्या गावी गेली. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे सेल्समनचं काम करत तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यात चांगले मार्क्स मिळाले; पण पुढे काय हा प्रश्‍न होताच. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘कमवा व शिका' योजनेतून काम करत शिकता येतं, असं कॉलेजमधल्या एका मित्राकडून उषाला समजलं. उषा एमए राज्यशास्त्र करण्यासाठी पुण्यात दाखल झाली. कमवा व शिका योजनेतून तासाला 30 रुपये, 3 तासांचे 90 रुपये, असे महिन्याचे 2700 रुपये मिळू लागले. त्यातून खानावळीपुरते पैसे ठेवून उरलेले पैसे उषा आजीला पाठवायची.

कमवा व शिका योजनेमार्फत विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यातही उषा भाग घ्यायची. एकदा सावित्रीबाई फुल्यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाईंच्या मूळ गावी, नायगाव इथे एक कार्यक्रम होता. त्यात उषाने छोटंसं भाषण केलं. त्या कार्यक्रमाला नेस वाडिया कॉमर्स कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. वृषाली रणधीर आल्या होत्या. डॉ. रणधीर म्हणजे ‘होय, मी सावित्री बोलतेय...' हे एकपात्री नाटक करणाऱ्या कलाकार. अनेक वर्षांपासून त्या या नाटकाचे प्रयोग करत आल्या आहेत. हे नाटक पुढे सुरू राहावं यासाठी त्यांना नवा चेहरा हवा होता. उषाच्या त्या छोट्या भाषणाने डॉ. रणधीर यांना जणू तो चेहरा सापडला. उषाची वक्तृत्वशैली, शब्दफेक, धाडस, अभिनय याने त्या प्रभावित झाल्या. त्यांनी उषाला ‘सावित्री' म्हणून निवडलं.

उषा सांगते, “रणधीर मॅडमनी ‘तुला जमू शकतं' असा आत्मविश्वास दिला. सुरुवातीला मी त्यांचे कार्यक्रम पाहिले. त्या कशा बोलतात, वाक्यातील चढ-उतार कसा असतो याचा अभ्यास केला. नाटक सादर करण्याची पहिली संधी मला मालेगावात मिळाली. तेव्हा मी 24 वर्षांची होते. स्टेजवर पाय थरथरत होते, घसा कोरडा पडला होता; पण हे सगळं थोड्या वेळापुरतंच. नाटकाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत गेला, आणि मग मी न घाबरता नाटक सादर करत गेले. आतापर्यंत या नाटकाचे 350हून अधिक प्रयोग मी केले आहेत.”

या नाटकाच्या माध्यमातून सावित्रीबाईंचा जागर करत उषा कुठे कुठे फिरली. छोट्या गावखेडी, पाडे आणि झोपडवस्त्यांपासून गुजरात, कर्नाटक ते अगदी थायलंडपर्यंत. विविध चळवळी, संघटना, राजकीय पक्षांतील मोठमोठे नेते यांनी आजवर उषाला सढळ हाताने मदत केली आहे. पत्रकार उत्तम कांबळे, लेखक आ. ह. साळुंखे, सुखदेव थोरात, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ यांसारख्या मान्यवरांनी उषाच्या कामाचं कौतुक करून तिचा सन्मान केला आहे. या प्रयोगांतून उषाला थोडंफार मानधन मिळतं. त्यातले काही पैसे ती आजही आजीला पाठवते. उरलेल्या पैशांतून स्वतःचा खर्च भागवते. ‘या कामातून मिळणारे पैसे ही दुय्यम बाब आहे. सावित्रीबाईंचा विचार सर्वत्र पोहोचवण्यात माझा खारीचा वाटा आहे याचा अभिमान वाटतो', असं उषा सांगते. झोपडपट्टी किंवा दलित वस्तीत, बुद्धविहारांमध्ये नाटक सादरीकरणासाठी ती मानधनाची अपेक्षा करत नाही. लोकांकडून होणारा सन्मान हीच कामाची पावती आहे, असं तिला वाटतं.

“थायलंडच्या भूमीत नाटक सादर करताना वाटलं, ज्या सावित्रीबाईंनी आम्हा मुलींना शिक्षण मिळावं म्हणून दगड-शेण-मातीचा मारा सहन केला, त्यांच्यामुळेच मी आज परदेशात पोहोचू शकले. त्यांच्या विचारांचा, कार्याचा जागर मांडू शकले. माझी आजी मला स्टेजवर बघते तेव्हा तिच्या डोळ्यांत पाणी असतं. ती मला कौतुकाने जवळ घेते आणि गालावरून हात फिरवते. ‘पोरीने माझ्या कष्टाचं चीज केलं', असं म्हणते.”

आपण ज्या वस्तीतून आलो त्या लोकांसाठी काही तरी करता यावं यासाठी उषा नेहमी धडपडत असते. बार्टी आणि समाजकल्याण विभागातर्फे ती ‘समतादूत' म्हणून वाड्यावस्त्या, झोपडपट्ट्या, महाविद्यालयांमध्ये जाऊन काम करते. राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण (एमए) पूर्ण करून सध्या प्राध्यापक होण्यासाठीच्या सेट-नेट परीक्षांची तयारी ती करत आहे. उषासमोर सावित्रीबाई फुले यांचा आदर्श आहे. आपणही शिक्षक होऊन विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे असं तिला वाटतं. उषाच्या या धडपडीला सलाम आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा!

अंक - मे 2024

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वस्तीतले धडपडे : पुण्यातल्या तृतीयपंथीयांच्या सन्मानासाठी झटणाऱ्या चांदणी गोरे

वस्तीतले धडपडे : विद्यार्थ्यांच्या रूपात स्वत:चं स्वप्न पूर्ण करणारा हनुमंत रेगी

कथा संघर्षाची : रॉकस्टार मंगलताई