वस्तीतले धडपडे : जिथे कामाची संधी तिथे मंदाताई
आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या कुटुंबला आणि वस्तीलाही झाला पाहिजे, या विचाराने सतत धडपडणाऱ्या मंदाताईंची गोष्ट
श्रुती कुलकर्णी
वारज्यातल्या रामनगरमध्ये राहणाऱ्या मंदाकिनी दहिरे आज वस्तीत ‘मॅडम' म्हणून ओळखल्या जातात. एवढा आदर त्यांना मिळतो तो त्यांच्या शिक्षणाबाबतच्या आस्थेमुळे.
मंदा दहिरे मूळच्या बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या. तिथे त्यांनी बीएपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांचे वडील शिवणकाम करायचे. अंगणवाडी सेविका असलेल्या आईचं मंदाताईंच्या लहानपणीच निधन झालं होतं. घरची परिस्थिती यथातथाच. शिवाय घरकामाची जबाबदारी. पण सगळं सांभाळत त्यांनी शिक्षण सुरू ठेवलं. बीए झाल्यानंतर पुढे आणखी शिकावं, नोकरी करावी असं त्यांना वाटायचं. पण घरच्यांनी लगेचच लग्न लावून दिलं. मग त्या नवऱ्यासोबत रोजगारासाठी पुण्यात आल्या. तिथून पुढे खरा संघर्ष सुरू झाला. ‘या संघर्षाबद्दल बोलायलाच नको. ते आठवलं तरी अंगावर काटा येतो,' असं मंदाताई म्हणतात.
1995मध्ये पुण्यातल्या रामनगर वस्तीत राहायला आल्यावर पत्र्याची एक छोटीशी शेड हेच मंदाताईंंचं घर बनलं. त्यांचे पती पेंटिंगचं काम करायचे. त्यावरच सुरुवातीला घरखर्च भागवावा लागे. आपल्या शिक्षणाचा उपयोग होत नसल्याची खंत मंदाताईंना सतावू लागली. त्यामुळे त्यांची घुसमट होऊ लागली.
याच दरम्यान एका मैत्रिणीमुळे स्वारगेट भागातील ‘सेवाधाम' संस्थेशी त्यांची ओळख झाली. सेवाधाम संस्था रामनगरच्या वस्तीतील गरोदर महिलांसाठी काम करत होती. मंदाताई या संस्थेचं काम करू लागल्या. वस्तीत फिरून गरोदर महिलांना आहारविषयक सल्ले आणि औषधोपचारांची माहिती देऊ लागल्या. पुढे एका दवाखान्यात त्यांनी नर्सचं कामही केलं. (प्रशिक्षण?) त्यातून थोडेफार पैसे मिळू लागले आणि आपल्या शिक्षणाचा उपयोग झाल्याचं समाधानही.
दरम्यान, ताईंना दोन मुली झाल्या. मुलींना चांगलं शिक्षण तर द्यायचंच, पण त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं असं मंदाताईंनी स्वतःशी ठरवलं. दोघीही अभ्यासात हुशार. मोठ्या मुलीची निवड विद्यानिकेतन शाळेत झाली आणि तिचं सातवीपर्यंतचं संपूर्ण शिक्षण मोफत झालं. दोन्ही मुलींना दहावी-बारावीपर्यंत स्कॉलरशिप्स मिळत गेल्याने शिक्षणखर्चात हातभार लागत गेला. मुलीही समजुतदार असल्याने त्यांनी पार्ट टाइम जॉब सुरू करून शिक्षण सुरू ठेवलं.
पण घरचे खर्च वाढतच होते. महागाई वाढली होती. त्यामुळे घरात कायमच पैशांची तंगी असायची. शिवाय मंदाताईंची काम करण्याची इच्छा त्यांना शांत बसू देत नव्हती. पाच वर्षांपूर्वी त्यांना ‘दीपक फाउंडेशन'बद्दल समजलं. ही संस्था प्रामुख्याने वस्तीतल्या कामगारांची शाळाबाह्य मुलं शोधून त्यांना पुन्हा शाळेची गोडी लावण्याचं काम करते. मंदाताईंना हे काम आवडलं. त्यांनी या संस्थेसोबत काम करायला सुरुवात केली. मंदाताई स्वतः वस्तीमध्ये गल्लोगल्ली जाऊन शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे करतात. या मुलांनी पुन्हा शाळेत जावं यासाठी प्रयत्न करतात.
त्याचबरोबर दीपक फाउंडेशनसोबत काम करणाऱ्या ‘विवेक विद्या फाउंडेशन'च्या माध्यमातूनही मंदाताई शिक्षिकेचं काम करतात. शनिवार-रविवारी वस्तीतील मुलांना गोळा करून त्यांची शिकवणी घेणं, त्यांच्याकडून वर्कबुक्स सोडवून घेणं, त्यांना वाचनाची गोडी लावणं अशी कामं त्यांच्याकडे असतात. सरकारचा ‘नागरवस्ती अभ्यासिका' हा उपक्रमदेखील ताई वस्तीत राबवतात. सातवी-आठवीच्या मुलांकडून अभ्यास करून घेतात, त्यांना आलेल्या समस्या सोडवतात.
शिक्षण क्षेत्रातील कामाबरोबरच ‘सेवा आरोग्य फाउंडेशन'च्या माध्यमातून मंदाताई महिलांच्या आरोग्यासाठीही काम करतात. या फाउंडेशनकडून वस्तीत आठवड्यातून दोनदा ओपीडी चालवली जाते. त्यासाठी महिलांचा सर्व्हे करण्याचं काम ताई करतात. त्याचबरोबर महिला बचत गटांमध्ये निवासी समुदाय स्वयंसेवक म्हणूनही त्या काम करतात.
केवळ आपल्याच नव्हेच, तर वस्तीतल्या इतर मुलीही स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात आणि त्यांची 18 वर्षांच्या आत लग्नं होऊ नयेत यासाठीही मंदाताई प्रयत्न करत असतात. वस्तीतील अनेक बालविवाह रोखून त्या मुलींना पुन्हा शाळेत पाठवण्याचं कामही त्यांनी केलं आहे. आज मंदाताईंची मोठी मुलगी कॉस्ट अकाउंटंट असून एका मोठ्या फर्ममध्ये चांगल्या पदावर काम करते आहे. (वाचा जानेवारीच्या अंकात) त्यांची लहान मुलगी पदवीचं शिक्षण घेते आहे.
ही वेगवेगळी कामं करून, मुलींना स्वतःच्या पायावर उभं करून मंदाताईंनी घरची आर्थिक स्थिती सुधारण्यामध्ये मोठा वाटा उचलला आहे; पण एवढ्यावरच समाधान मानून त्या शांत बसलेल्या नाहीत. त्या आता एम. ए.चं शिक्षण घेत आहेत. त्यांचं सुरुवातीचं पत्र्याचं छोटंसं घर आता सिमेंटच्या पक्क्या घरात बदललं. तसंच शिक्षणाच्या आधारामुळे मंदाताईंच्या आयुष्याची घडीही आता पक्की बसली आहे.
अंक - मार्च 2024
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा