कथा संघर्षाची : पन्नाशीला येऊन ठेपलेलं प्रसिद्ध ‘सोनल पॅटिस'

पुण्यातल्या पूर्वेकडच्या पेठांमध्ये राहणाऱ्या खवय्यांना पॅटिस खाण्याची इच्छा झाल्यावर त्यांच्या डोळ्यांसमोर पहिलं नाव ‘सोनल पॅटिस'चं येत असावं.

तुषार कलबुर्गी 

कस्तुरे चौकातून महात्मा फुले पेठेकडे जाताना डाव्या बाजूला, चौकापासून हाकेच्या अंतरावर फक्त पॅटिसखाण्यासाठी झालेली तुंबळ गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. पावपॅटिस खाण्यासाठी इतकी गर्दी खेचणारं सोनल पॅटिस हे एकमेव ठिकाण असावं. सायकलवरच्या कष्टकऱ्यांपासून ते चारचाकीतल्या श्रीमंतांपर्यंत सर्व प्रकारचे लोक इथे आवर्जून जिभेचे चोचले पुरवायला येतात. इथे दिवसभरात हजारांहून अधिक पॅटिस खपतात. या दुकानात आलेला एक ग्राहक म्हणतो, “मी या भागात आलो तर एक तरी पॅटिस खाऊनच जातो. यांच्या पॅटीसचे दर 15 पैसे होते तेव्हापासून मी यांचं पॅटिस खातोय.” विशेष म्हणजे सोनल पॅटीसचं यशस्वी पन्नासावं वर्ष सुरू आहे. कसबा पेठ ते फुले पेठ या पट्ट्यामध्ये जेवढा परिसर येतो त्यामध्ये सोनल स्नॅक्स अगदी फेमस आहे. 

65 वर्षीय सुरेश अनंत सूर्यवंशी आणि त्यांचे मोठे बंधू 69 वर्षीय रमेश सूर्यवंशी यांनी 1974 साली पॅटिसचा व्यवसाय सुरू केला. त्यांचं बालपण कस्तुरे चौकाजवळच गेलं. वडील अनंतराव पेशाने न्हावी होते. वडील त्यांच्या भावांसोबत एक सलूनचं दुकान चालवायचे; पण या व्यवसायातून म्हणावी तितकी कमाई होत नव्हती. रोजचा खर्च निघणंही मुश्किल होतं. रमेश यांनी पाचवीत, तर सुरेश यांनी नववीत शाळा सोडून दिली होती. त्यामुळे पोटापाण्यासाठी त्यांना काम करणं भाग होतं. 

रमेश हे एका उदबत्तीच्या कारखान्यात कामाला लागले, तर सुरेश यांनाही त्यांच्या पारंपरिक व्यवसायात जायचं नव्हतं. खायचे पदार्थ विकण्यात त्यांना रस होता. ते सुरुवातीला नारायण पेठेतल्या भानुविलास थिएटरच्या बाहेर वेफर्स, पॉपकॉर्न इत्यादी पदार्थ पाकिटात भरून विकू लागले. त्या थिएटरच्या बाहेरच एक वडापाव-भजीचं दुकान होतं, त्या दुकानात लोक गर्दी करायचे. त्यामुळे सुरेश यांचं लक्ष त्या दुकानाकडे, वडापाव-भजी कसे बनवतात याकडे असायचं. आपणही असाच व्यवसाय करावा असं त्यांना तीव्रतेने वाटू लागलं. 

अखेर 1974 साली सुरेश यांनी धाडस करून कस्तुरे चौकाजवळ वडापाव आणि पॅटीसची हातगाडी सुरू केली. सुरेश सूर्यवंशी सांगतात, “आम्ही न्हावी समाजाचे. त्यामुळे हातगाडी सुरू करताना माझी आई म्हणाली होती, ‘आपल्या समाजामध्ये कोणी खाद्यविक्रीचं काम केलेलं नाही, भांडण-तंटे होतील, आजूबाजूचे गुंड-मवाली लोक फुकट खाऊन जातील. हा धंदा तू करू नको.' पण तरीही मी न घाबरता वडापाव-पॅटीसची  हातगाडी सुरू केली. आई म्हणाली होती तसे पुढे भांडणतंटे झाले, अनेक मवाली लोक फुकट खाऊन जाऊ लागले. पण नंतर आम्हीही जशास तसं उत्तर देऊ लागलो. हळूहळू हा प्रकार कमी झाला.'

“सुरुवातीला फक्त सहा पॅटिस बनवायचो. त्यातले दोन ते तीनच पॅटिसखपायचे. बाकीचे आम्ही घरीच खायचो. हळूहळू भवानी पेठेतल्या व्यापाऱ्यांना आमचं पॅटिस आवडू लागलं. त्या वेळी पुण्यामध्ये पॅटिस स्लाइस ब्रेडपासून तयार व्हायचं; पण आम्ही पावापासून पॅटिस तयार करत होतो. पुण्यात पावापासून पॅटिसबनवण्याची पद्धत आम्हीच सुरू केली. आजही बहुतांश पॅटिस स्लाइस ब्रेडपासून बनवलेलेच मिळतात,” असं सुरेश सूर्यवंशी सांगतात. 

हळूहळू 10, 20, 30 असं करत पॅटिसचा खप वाढू लागला. त्यामुळे सुरेश यांचे मोठे बंधू रमेशदेखील या व्यवसायला हातभार लावू लागले. सकाळी ऊदबत्तीच्या कारखान्यात कामाला जाऊन संध्याकाळी पॅटिसच्या गाडीवर ते थांबायचे. 1980च्या सुमारास सोनल स्नॅक्सचं पॅटिस प्रसिद्ध झालं, तसं रमेशही नोकरी सोडून पूर्णवेळ धंद्यात उतरले. 1990 साली सोनल पॅटिस हातगाडीवरून दुकानात शिफ्ट झालं. त्यांनी कस्तुरे चौकातच एक दुकान भाड्याने घेतलं. तेव्हापासून व्यवसायाची आणखी भरभराट झाली. अतिशय गरिबीत दिवस काढणारं सूर्यवंशी कुटुंबीय या व्यवसायामुळे स्थिरस्थावर झालं.

पुढे रमेश आणि सुरेश यांची मुलं शिकून मोठी झाली. रमेश यांचा मोठा मुलगा अतुल फायनान्स कंपनीमध्ये, तर दुसरा मुलगा अविनाश एका कंपनीत सेल्समध्ये काम करत होते; पण दोघंही आपापल्या कामांमध्ये समाधानी नव्हते. म्हणून तेही पूर्ण तयारीनिशी या व्यवसायात उतरले. ते आल्यामुळे व्यवसाय आणखी वाढला. पुढे सुरेश यांची मुलगी गायत्री याच व्यवसायात उतरली. गायत्री यांनी बेकरी आणि फुड प्रोसेसिंगचा कोर्स केला आणि सोनल नावाने कोंढव्यामध्ये बेकरी उत्पादनांचा आणि पॅटिसचा व्यवसाय सुरू केला. कोंढव्यातलं दुकानही अल्पावधीतच स्थिरस्थावर झालं. आता सध्या सुरेश आणि त्यांचे पुतणे अतुल आणि अविनाश तिघं मिळून कस्तुरे चौकातलं दुकान सांभाळतात, तर गायत्री कोंढव्यातलं दुकान सांभाळते. सुरेश यांचे मोठे बंधू रमेश वयोमानानुसार थकलेले असल्यामुळे आता ते दुकानात येत नाहीत. 

“गेल्या पाच दशकांपासून लोक तुमच्याकडे आवडीने पॅटिस खायला येतात. तुमच्या पॅटिसचं वेगळेपण काय आहे?” हा प्रश्न विचारल्यावर सुरेश सूर्यवंशी सांगतात, “आम्ही कच्चा माल निवडकच वापरतो. पावाची क्वालिटी चांगली असते. चिंचेची चटणी आम्ही विशिष्ट चिंच वापरून बनवतो. बटाटा इंदोरी आणि तळेगावचा वापरतो.  शिवाय पिठाच्या मिश्रणाची आमची वेगळी पद्धत आहे.” 

सहा पॅटिसपासून सुरू झालेला हा व्यवसाय आता हजारो पॅटिसच्या खपापर्यंत गेला आहे. इथे लोक फक्त पॅटिस खात नाहीत, तर खाऊन झाल्यावर लोक तोंड भरून कौतुक करतात. सुरेश सूर्यवंशी सांगतात, “जे लोक पूर्वी 15 पैशांना पॅटिस खायचे ते आजही आमच्याचकडे पॅटिस खायला येतात.” पूर्वी आपापल्या समाजानुसार काम करण्याची पद्धत होती, आजही काही प्रमाणात आहे. आपलं पारंपरिक काम सोडून नव्या व्यवसायात उडी घेणाऱ्यांसाठी सूर्यवंशी कुटुंबाचं उदाहरण स्फूर्ती देणारं ठरेल.    

अंक - सप्टेंबर 2023  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वस्तीतले धडपडे : पुण्यातल्या तृतीयपंथीयांच्या सन्मानासाठी झटणाऱ्या चांदणी गोरे

वस्तीतले धडपडे : विद्यार्थ्यांच्या रूपात स्वत:चं स्वप्न पूर्ण करणारा हनुमंत रेगी

कथा संघर्षाची : रॉकस्टार मंगलताई