वस्तीतले धडपडे : मला सी ए व्हायचंय, मी सी ए होणारच!

दहा बाय दहाच्या पत्र्याच्या घरात राहून एक हुशार मुलगी सीए व्हायचं स्वप्न बघतेय. परिस्थिती विपरित असूनही तिचं कुटुंबही तिच्या पाठीशी आहे. तिच्या संघर्षाची गोष्ट.

तुषार कलबुर्गी

मंगल गायकवाड लोहियानगरमधल्या इनामके मळ्यात राहणारी मुलगी. ती सीए बनण्याचं स्वप्न पाहतेय. सीएच्या सुरवातीच्या दोन परीक्षा ती पास झालीये. नोव्हेंबर 2021 मध्ये तिची सीएची अंतिम परीक्षा आहे. आयुष्याचा एक मोठा टप्पा पार करण्याच्या तयारीत ती आहे.

मंगल लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. पहिली ते आठवीपर्यंत शाळेत प्रथम क्रमांक पटकावत गेली. नववीत मात्र तिला प्रथम क्रमांक पटकावत आला नाही. कारण नववीच्या पेपरच्या दिवशीच तिच्या बाबांचं निधन झालं. मृतदेह दारात होता आणि तिला परीक्षेला जायचं होतं. पण ती धीराने शाळेत गेली आणि तिने पेपर सोडवले. दहावीला मात्र तिने जोरदार तयारी करत 87 टक्के गुण मिळवले.

या सर्वांच्या जोरावर तिला विज्ञान शाखेत प्रवेश मिळू शकला असता. पण विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन पुढे डॉक्टर किंवा इंजिनियर होऊ शकेल, इतके पैसे तिच्याकडे नव्हते. म्हणून तिने कॉमर्सला प्रवेश घेतला. तिच्या शाळेच्या साळुंके मॅडमना मंगलच्या हुशारीची कल्पना होती. सीए होण्याचं स्वप्न तिने मनाशी धरावे, असा सल्ला त्यांनी दिला. 

मंगलच्या आयुष्याला त्यातून नवं ध्येय मिळालं. आधी बारावी आणि नंतर बी.कॉम करताना ‘आपल्याला सीए व्हायचंय' हे स्वप्न तिच्यात रुजत गेलं. ती झपाटून अभ्यास करत होती. त्यामुळे सीएची प्रवेश परिक्षा ती पहिल्याच प्रयत्नात पास झाली.  

प्रवेश परिक्षा तर पास झाली, पण पुढच्या परीक्षेची फी भरण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. तिची ही अडचण समजून तिच्या काकांनी फी भरण्यासाठी कर्ज काढलं. आणि मंगल समोरची अडचण दूर केली. नंतर झालेल्या परिक्षेत पहिल्यांदा ती पास होऊ शकली नाही, पण दुसर्या प्रयत्नात ती पास झाली.

सीएचा अभ्यास करता करता तिने बी कॉमची पदवीही मिळवली. सीएच्या अभ्यासामुळे एम कॉमचाही तिचा अभ्यास झाला होता. इतका, की ती जिथे बी कॉमसाठी क्लासला जायची, तिथे एम कॉमच्या विद्यार्थ्यांनाही ती शिकवू लागली. एम कॉमच्या विद्यार्थ्यांना या गोष्टीचं खूपच आश्चर्य वाटायचं. 

घरची परिस्थिती बेताचीच होती. आईने आणि बहिणीने धुण्याभांड्यांची कामं केली. भाऊही काम करत शिकत होता. पण ‘तुझं शिक्षण थांबव तुझ्या शिक्षणाचा खर्च परवडत नाही', असं एकदाही म्हणाले नाहीत, ना घरच्यांनी मुलगी आहे म्हणून कमी लेखलं. 

अंतिम परीक्षेमध्ये दोन ग्रुप असतात. अभ्यासाच्या दृष्टीने दोन्हीची परीक्षा देण्याची तिची तयारी आहे. पण दोन्ही ग्रुपच्या परीक्षांची फी देण्याइतके तिच्याकडे पैसे नाहीत. तो आकडा तब्बल दीड-दोन लाखांच्या घरात जातो. म्हणून नाईलाजाने एकाच ग्रुपची परीक्षा द्यायचं तिने ठरवलंय. एकेक परिक्षा पार करत सीए बनण्याच्या स्वप्नाला गाठण्याचा तिचा निर्धार आहे. म्हणूनच तिने तिच्या घरातल्या कपाटावर लिहलंय, ‘मला सी ए व्हायचंय आणि मी सी ए होणारच!'

मंगल अभ्यासात इतकी हुशार आणि एकाग्र आहे की तिच्याकडे बघून इनामके मळ्यातल्या मुलामुलींना शिकण्याची उर्जा मिळते. तिथले लोक आपल्या मुला-मुलींना ‘अभ्यास करायचा तर मंगलसारखा' असं सांगत असतात.

मंगल गायकवाड एक सुपरगर्ल आहे. ती दिवसातले 16-16 तास अभ्यास करते आणि ज्या परिस्थितीत अभ्यास करते ते बघून तिचं जास्त कौतुक वाटतं. ती आतापर्यंत सगळ्याच परीक्षा चांगल्या मार्कांनी पास होत आली आहे. मला खात्री आहे की ती सी ए होईलच.

- रवींद्र बोगम, क्लासचे सर

अंक - डिसेंबर 2021  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वस्तीतले धडपडे : पुण्यातल्या तृतीयपंथीयांच्या सन्मानासाठी झटणाऱ्या चांदणी गोरे

वस्तीतले धडपडे : विद्यार्थ्यांच्या रूपात स्वत:चं स्वप्न पूर्ण करणारा हनुमंत रेगी

कथा संघर्षाची : रॉकस्टार मंगलताई