कथा संघर्षाची : कर्तृत्ववान कल्पनाताई

कल्पनाताईंनी मुलाच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचलंय. या मायलेकराचा प्रेरणादायी संघर्ष...

तुषार कलबुर्गी

‘हार मानू नये, जिद्द ठेवावी. स्वप्नं पहावीत.' कळतनकळत कल्पना आढावांचं हे जीवनसूत्र बनलंय. त्यांनी हलाखीच्या परिस्थितीत मुलाला उच्चशिक्षित बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. त्यासाठी खस्ता खाल्ल्‌‍या, वेगवेगळी कामं करत, स्वत:ला बदललं. निराधार स्त्री मनात आणलं तर स्वतःचं नशीब पालटू शकते. याचं उदाहरण म्हणजे कल्पनाताई.

कल्पनाताई पिंपरीतल्या गुरुदत्त नगरमध्ये एका छोटयाश्या घरात राहतात. त्यांनी धुण्याभांड्यापासून सिक्युरिटीगार्डपर्यंत, मिळेल ते काम केलं. आपला मुलगा, अमितला शिक्षण दिलं. अमितनेही एक एक इयत्ता पूर्ण करत फिजिओथेरेपीचं शिक्षण पूर्ण केलं. अमितला आता परदेशात उच्चशिक्षणासाठी जायचंय. त्यासाठीचा खर्च लाखांच्या घरात आहे. पण काहीतरी मार्ग निघेलच, अशी आशा कल्पनाताईंना वाटते.

कल्पनाताई मुळच्या नगर जिल्ह्यातल्या. लग्नानंतर पुण्यात आल्या. एका छोट्याशा घरात संसार थाटला. पण अमितच्या जन्मानंतर काहीच महिन्यात पतीने कल्पनाताईंची साथ सोडली. तान्ह्या बाळाला घेऊन जगायचं कसं, हा प्रश्न त्यांना सतावत होता.

कल्पनाताई आणि त्यांचा मुलगा
कल्पनाताईंचं शिक्षण जेमतेम. त्यामुळे घरकाम आणि धुणीभांडी या कामांशिवाय पर्यायच नव्हता. एकीकडे बाळ सांभाळायचं आणि दुसरीकडे कामं करायची. असा खडतर काळ कल्पनाताईंनी काढला.

आपण जे भोगलं ते मुलाच्या वाट्याला येऊ नये असं कल्पनाताईंना वाटायचं. म्हणून त्यांनी अमितला पाचवीनंतर इंग्रजी शाळेत घालायचं ठरवलं. पण शाळेची फी तुम्हाला परवडणार नाही', हे कारण देऊन शाळेने प्रवेश नाकारला. पण कल्पनाताई निराश झाल्या नाहीत. त्यांनी मदत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एका संस्थेने अमितच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. ज्या शाळेने प्रवेश नाकारला तिथेच अमितला प्रवेश मिळाला.

काही वर्षांनंतर कल्पनाताईंनी धुण्याभांड्याचं काम सोडलं. त्या सुरक्षारक्षकाचं काम करू लागल्या. तोवर अमितचं दहावीचं वर्ष आलं. त्याने अभ्यासात मेहनत घेतली. अमित उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला. तोही आता करियरचे मार्ग शोधू लागला.

अमितला क्रिकेट आणि वाचनाची आवड आहे. एकदा त्याला क्रिकेटर्सवर उपचार करणाऱ्या फिजिओथेरपिस्टबाबत माहिती समजली. टीव्हीवरील सामन्यांमध्ये  दुखापत झालेल्या खेळाडूंवर उपचार करणारे फिजिथेरपिस्टही त्याने पाहिले होते. त्यामुळे या क्षेत्राची त्याने अधिक माहिती मिळवली. बारावीनंतर आपण याच क्षेत्रात करियर करायचं, असं त्याने ठरवलं.

फिजिओथेरेपीच्या पहिल्या वर्षाची फी एक लाख रूपये होती. एवढा खर्च कल्पनाताईंना पेलवणारा नव्हता. तरीही मुलाला उत्तम शिक्षण द्यायचंच, ही जिद्द असल्याने त्यांनी कर्ज काढलं. दुसऱ्या वर्षाची फी देखील त्यांनी कशीबशी भरली. तिसऱ्या वर्षी मात्र पुन्हा तेवढीच रक्कम भरणं त्यांना अशक्य वाटू लागलं. मुलाचं शिक्षण अर्ध्यातूनच सुटतंय' या विचाराने कल्पनाताई चिंताग्रस्त होत्या. ही गोष्ट रुग्णालयातल्या सहकाऱ्यांना समजली.  मग त्यांच्या सहकारी स्टाफने मदत जमवली. या पैशातून अमितची फी जमा झाली.

अमितने फिजिओथेरपीची पदवी मिळवली. इंग्लंडमधील एका विद्यापीठाने त्याला उच्चशिक्षणाची संधी देऊ केली आहे. त्यासाठी वीस लाख रूपये इतका भलामोठा खर्च आहे. अमित इंग्लंडला गेला तर कल्पनाताईंसाठी आकाश ठेंगणं होणार आहे. म्हणून त्या बँकांकडे शैक्षणिक कर्जासाठी धावाधाव करत आहेत.

कल्पनाताईंची ही मेहनत फळाला येईल का? अमितला परदेशी उच्चशिक्षण घेता येईल का? माहीत नाही. पण कल्पनाताईंचा संघर्ष मात्र आपल्या समोर आहे. आपणही मुलांना शिकवावं. आपल्या मुलांच्या स्वप्नांना पंखाचं बळ द्यावं, हेच कल्पनाताई आपल्याला सांगत आहेत.

अंक - डिसेंबर 2021

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वस्तीतले धडपडे : पुण्यातल्या तृतीयपंथीयांच्या सन्मानासाठी झटणाऱ्या चांदणी गोरे

वस्तीतले धडपडे : विद्यार्थ्यांच्या रूपात स्वत:चं स्वप्न पूर्ण करणारा हनुमंत रेगी

कथा संघर्षाची : रॉकस्टार मंगलताई