कथा संघर्षाची : ‘शांताबाई' फेम संजय लोंढे, अजूनही संघर्ष चालूच आहे!
‘शांताबाई' या सुपरहिट गाण्याचे गायक संजय लोंढे यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला. परिस्थिती बिकट असतानाही त्यांनी गाण्याची आवड जोपासली. कुटुंबात संगीताचा वारसा नसूनही आपल्या अंगच्या गुणांनी त्यांनी गायक, गीतकार आणि संगीतकार म्हणून नाव कमावलं. त्याची ही गोष्ट.
नितीन गांगर्डे
संजय लोंढेंचं ‘शांताबाई' हे गाणं ऐकलेलं नाही असा माणूस मिळणं अवघड. लग्नाची वरात असो किंवा गणेश विसर्जनाची मिरवणूक, त्यामध्ये हे गाणं हमखास वाजणार. त्यांनी गायलेली ‘देव धनगर वाड्यात घुसला', ‘सुटला माझा पदर बाई', ‘गिरणीवाले दादा' ही गाणीही लोक आवडीने गुणगुणत असतात.
आज पन्नाशी गाठलेले संजयभाऊ पुण्याच्या ए. डी. कॅम्प चौक परिसरात राहतात. त्यांचे वडील नगरमधल्या कर्जत तालुक्यातले. पोटापाण्यासाठी रोजगाराच्या शोधात ते पुण्यात आले. त्यांना टिम्बर मार्केटमध्ये लाकडं विकण्याचं काम मिळालं. त्यांनी जवळच्याच राजेवाडीत छोटीशी खोली भाड्याने मिळवली. तिथेच संजयभाऊंचा जन्म झाला. तेव्हा त्यांची परिस्थिती हलाखीची होती. लाकडं विकण्याच्या कामातून कुटुंबाचं पोट भरेल एवढेच पैसे वडिलांना मिळायचे. संजयभाऊ शाळेत जाऊ लागल्यावर त्यांच्याकडे ना दप्तर असायचं, ना पायात घालायला चप्पल. त्यांचं लहानपण खूपच गरिबीत गेलं. अशा परिस्थितीमुळे सातवीत असताना त्यांना शाळा सोडावी लागली.
संजयभाऊंच्या आजोबांची गावाला शेती होती. उन्हाळाच्या सुट्टीत गावी गेल्यावर ते आजोबांसोबत शेतात जायचे. आजोबा नांगरणी करताना गाणी गायचे. ती गाणी संजयभाऊंना खूप आवडायची. आजोबांना गाताना बघून ते पण त्यांच्यामागून गायचे. तिथूनच त्यांना गाण्याची गोडी लागली.
संजय लोंढे |
तीन वर्षं कॅसेट्च्या दुकानात काम केल्यानंतर पुढे त्यांना ऑर्केस्ट्रामध्ये गाणं गाण्याची संधी मिळाली. मेहनत घेऊन ते तयारी करत. गाणं गिरवत. त्यामुळे ते अधिक चांगलं गाऊ लागले. पुढे त्यांनी गायलेल्या गाण्यावर प्रेक्षकांकडून टाळ्या मिळू लागल्या. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला.
पुढे ते स्वतःची गाणी रचू लागले. 1196 साली त्यांनी लिहिलेलं ‘देव धनगरवाड्यात घुसला' हे गाणं गाजलं. त्यांचं गाजलेलं हे पहिलंच गाणं. या गाण्यामुळे त्यांना ओळख मिळाली. “ज्या काळी जवळपास सगळीच लोकगीतं मुंबईतून प्रसिद्ध व्हायची, त्या काळात ‘धनगरवाड्यात' हे गाणं पुण्यातून प्रसिद्ध झालं”, असं संजयभाऊ अभिमानाने सांगतात.
नंतर संजयभाऊंनी ‘जेजुरी जाऊ पायी पायी', ‘सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात', ‘गिरणीवाले दादा' यांसारखी अनेक गाणी लिहली. त्यांनी लिहिलेलं आणि गायलेलं ‘शांताबाई' हे गाणं तर अखिल महाराष्ट्राने उचलून धरलं. या गाण्याने त्यांना अफाट प्रसिद्धी दिली. ‘चला हवा येऊ द्या' टीव्हीवरच्या लोकप्रिय कार्यक्रमात त्यांना बोलवण्यात आलं. त्यामुळे संजयभाऊंचा चेहरा घराघरात पोहचला.
संजयभाऊंनी आतापर्यंत देवांची, राजकीय प्रचाराची गाणी आणि लोकगीतं लिहिली-गायली आहेत. अनेक गाण्यांना संगीत दिलं आहे.
अर्थात, एवढं यश मिळूनही त्यांच्या आर्थिक परिस्थितीत फार फरक पडला नाही. संजयभाऊ आजही राजेवाडीतल्या छोट्याश्या घरात राहतात. पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असं त्यांचं कुटुंब आहे. परिस्थितीमुळे त्यांच्या घरी रियाजासाठी कोणतंही वाद्य नाही. घरातलं एक छोटंसं पातेलं वाजवून ते गाण्यांच्या चाली लावतात. पण अखंड वेळ त्यांच्या डोक्यात फक्त गाणंच असतं. गाणं लिहिणं, त्यावर विचार करणं, कविता वाचणं, चाली शोधणं आणि गाणी ऐकणं हाच त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम असतो. ते म्हणतात, ‘मी कमी शिकलो असलो तरी मला त्याचा कमीपणा वाटला नाही. गाणं लिहिण्यासाठी मी भरपूर वाचन केलं, अजूनही वाचतो.' ते पुढे म्हणतात, ‘माझी लिहिलेली गाणी अनेक प्रसिद्ध गायकांनी गायली आहेत. शिवाय मी गायलेली आणि लिहिलेली गाणी लोक गुणगुणत असतात, ही गोष्ट मला प्रेरणा देत राहते. म्हणून मला आणखी भरपूर गाणी गायची आहेत आणि लिहायची आहेत.'
मी लहानपणापासून वडिलांना गाणी लिहिताना आणि गाताना बघतेय. त्यांनी खूप हलाखीत दिवस काढले आहेत. त्यांच्याकडे लिहायला साधी वहीही नसायची. रद्दीच्या कागदांवर ते गाणी लिहायचे. पण त्यांच्यात प्रतिभा अशी आहे, की अर्ध्या तासात त्यांचं गाणं तयार व्हायचं. मला त्यांचा अभिमान वाटतो.
- रसिका लोंढे, संजय लोंढेंची मुलगी
अंक - सप्टेंबर 2021
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा