कथा संघर्षाची : धडपडी, खटपटी, स्वावलंबी आई शुभांगी चव्हाण
नवऱ्याचा जाच सहन करत, अल्प शिक्षणाचा अडथळा पार करत आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या महिलेची गोष्ट..
सतीश उगले
“पोरांना नुसतं शाळेत सोडायला जा म्हटलं की माझा नवरा माझ्याकडून गाडीत पेट्रोल टाकायला पैसेे मागायचा. मुलांच्या शाळेचा विचार करून मी नाईलाजाने द्यायचे. मला या गोष्टीचा वैताग आला. एक दिवस मी ठरवलं आणि टू-व्हिलर चालवायला शिकले. आणि पोरांना स्वतः शाळेत सोडायला लागले.” तीस वर्षीय शुभांगी चव्हाण आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट सांगत होत्या. त्या पुढे सांगतात, “टू-व्हिलर शिकले तेव्हापासून कुठल्याच गोष्टीसाठी नवऱ्यावर अवलंबून राहायचं नाही असं ठरवलं.” त्यांनी केलेला निर्धार आतापर्यंत खरा ठरलेला आहे. त्या सध्या दांडेकर पुलाजवळील राष्ट्र सेवा दलात लेडी बाऊन्सरचं काम करतायत. आणि याच्या जोरावर आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी धडपडत आहेत.
शुभांगीताईंचं बालपण उस्मानाबाद जिल्ह्यातील कटी या छोट्याशा गावात गेलं. शालेय जीवनापासून त्यांना अभ्यासात गोडी होती. मैदानी खेळही त्यांना आवडायचे. खोखो-कबड्डीच्या स्पर्धांमध्ये त्या सहभागी होत. उच्च शिक्षण घेऊन मोठं व्हायचं स्वप्न होतं. पण दहावीला असताना, वयाच्या जेमतेम पंधराव्या वर्षी आईवडिलांनी शुभांगीताईंचं लग्न लावून दिलं. दहावी अर्धवट सोडावी लागली. कोवळ्या वयातच त्यांचं आयुष्य आरपार बदलून गेलं.
शुभांगीताई लग्नानंतर पुण्यातल्या तळजाई वसाहतीमध्ये स्थायिक झाल्या. शाळा-कॉलेजात शिकण्याच्या वयात त्यांना संसाराच्या गोष्टी शिकाव्या लागल्या. नवऱ्याबद्दलची, कुटुंबाबद्दलची स्वप्नं त्या रंगवू लागल्या. पण तीही काही महिन्यांत उद्ध्वस्त झाली. नवरा अतोनात व्यसनी आणि भांडखोर निघाला. छोट्यामोठ्या गोष्टींवरून भांडायचा, मारहाण करायचा. कधीकधी जीव जाऊस्तोवर मारल्याचं शुभांगीताई सांगतात. अशातच त्यांना दोन मुली आणि एक मुलगा झाला. मुलं झाल्यावर तरी नवरा सुधरेल अशी आशा होती; पण तीही नंतर त्यांनी सोडून टाकली. नशेबाजी आणि मारहाण करणं चालूच होतं. कामाच्या नावाने मात्र शंख. या परिस्थितीत शुभांगीताईं घर चालवण्याची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. धुण्याभांडयाचं काम करत आपल्या संसाराचा गाडा त्या हाकू लागल्या.
शुभांगीताईंना धुण्याभांड्याच्या कामाने कसंबसं घर चालेल इतकेच पैसे मिळत होते. पण मुलांच्या शिक्षणासाठी कुठून पैसे आणणार? म्हणून त्यांनी नवीन कामाची शोधाशोध केली. पुण्यातल्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या कागद-काच-पत्रा पंचायतीत त्यांना सुपरवायजरचं काम मिळालं. धुण्याभांड्याच्या कामांपेक्षा यात त्यांना चार पैसे जास्त मिळू लागले. आता त्यांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक तरतूद करता येत होती.
कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायतीत नोकरी करत असताना शुभांगीताईंची ओळख सामाजिक क्षेत्रातल्या लोकांशी झाली. त्यातून त्यांना वाचनाची आवड लागली. रोज येणारे बरेवाईट अनुभव डायरीत लिहू लागल्या. कविता करू लागल्या. त्यांचं हे लिहिणं-वाचणं नवऱ्याला आवडत नसे. दारूच्या नशेत नवऱ्याने डायरी आणि पुस्तकं अनेक वेळा जाळल्याचं शुभांगीताई खिन्न होऊन सांगतात.
कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायतीत शुभांगीताईंनी चार वर्षे काम केलं. याच काळात त्या नवनवीन गोष्टी शिकल्या. रिक्षा आणि टेम्पो चालवणं व्यवस्थित शिकून घेतलं. पुढेमागे नोकरी सोडून स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी जमायला हव्यात, हा विचार त्यामागे होता. पुढे त्या एका नगरसेवकाच्या जनसंपर्क कार्यालयात रिसेप्शनिस्टची नोकरी करू लागल्या. सोबतच रात्री पंपावर पेट्रोल भरण्याचं कामही त्यांनी अंगावर घेतलं.
शुभांगीताई म्हणतात, “एकीकडे घर चालवण्यासाठी मी दिवसरात्र काम करायचे, दुसरीकडे दारूच्या नशेमुळे नवऱ्याला कुटुंबाच्या जबाबदारीचं भान उरलं नव्हतं. मुलांच्या शिक्षणालाही नवऱ्याचा विरोध होता. मुलं अभ्यासाला बसलेली असताना मुद्दामून भांडणं उकरून काढायचा.” एका आजाराने ग्रस्त होऊन 2017मध्ये त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला.
मुलांचं संगोपन आणि घर चालवणं या दोन्ही गोष्टी त्यांना सवयीच्या झाल्या आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी, क्लाससाठी कधीकधी पैसे नसायचे. त्यावेळी ताईंनी शेजारपाजारच्यांकडून उसने घेतले; विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांचा, शिष्यवृत्त्यांचा आधार घेतला. पण मुलांच्या शिक्षणात त्यांनी खंड पडू दिला नाही. त्यांची मोठी मुलगी दहावी पास झालीये; दुसरी मुलगी नववीला, तर मुलगा सातवीला आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी स्वतःची अर्धवट राहिलेली दहावी आणि बारावी बाह्यपरीक्षा देऊन पूर्ण केली.
शुभांगीताई सध्या दांडेकर पुलाजवळच्या राष्ट्र सेवा दलाच्या आवारात बाउंसरचं काम करतायत. मुलांना उच्चशिक्षित बनवून त्यांना आपल्या पायावर उभं करायचं, हे एकच ध्येय त्या उराशी बाळगून आहेत. त्या म्हणतात, “माझं लग्न झालं आणि खाईत लोटले गेले. माझ्या मुलीच्या बाबतीत मी तसं होऊ देणार नाही. माझी तीनही मुलं मला चांगली शिकलेली बघायची आहेत. त्यासाठी मी पडेल ते कष्ट करायला तयार आहे.
मुलांसाठी सरकारी योजनांची माहिती मिळवत असताना शुभांगीताईंना त्याबद्दलची बरीच माहिती होत गेली. एकदा जवळच्या वस्तीतल्या दोन महिलांची गाठ पडली. त्यांना एक योजना पदरात पडून घ्यायची होती. कशी ते त्यांना माहीत नव्हतं. शुभांगीताईंनी त्यांना मदत केली. तेव्हापासून त्या वस्तीतल्या महिला कागदपत्रांसाठी, योजनांच्या माहितीसाठी ताईंकडे येतात. त्यांना शक्य तेवढी मदत त्या करतात. लोकांना मदत करणं हा त्यांचा स्वभावच आहे. म्हणूनच त्या सध्या मुक्त विद्यापीठातून समाजसेवा या विषयात पदवीचं शिक्षण घेत आहेत.
शुभांगीताईंचा संघर्ष आणि मुलांच्या शिक्षणासाठीची धडपड पाहून ‘छात्र भारती' या संघटनेने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘संघर्षातून मुलांना शिक्षण देणारी माता' म्हणून त्यांचा सन्मान केला. शिवाय नगरसेवक आबा बागूल यांनीही शुभांगीताईंचा ‘स्वयंसिद्धा' या नावाने पुरस्कार देऊन सत्कार केला.
अंक - एप्रिल 2022
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा