वस्तीतले धडपडे : अक्षयची 'नीट' भरारी
ज्या परीक्षेसाठी मुलं हजारो रुपयांचे क्लास लावता, पण अक्षय ही परीक्षा क्लास न लावता पास झालाय. त्याची गोष्ट..
नितीन गांगर्डे
वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी 'नीट'ची प्रवेशपरीक्षा पास होणं आवश्यक असतं. या परीक्षेची तयारी विद्यार्थी नववी-दहावीपासूनच सुरू करतात. त्यासाठी महागडे क्लास, अभ्यासिका लावतात. पण बिबवेवाडमधील भिम दिप वसाहतीत राहणाऱ्या अक्षय बोरेने कोणत्याही क्लासशिवाय आणि अभ्यासिकेशिवाय ही परीक्षा दिली. तो नुसता पास नाही झाला तर त्याने चांगले गुण मिळवले. आज अक्षयने डॉक्टर होण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकलंय.
अक्षय, त्याचे आईवडील अशा तिघांचं छोटं कुटुंब. वडील मूळचे सोलापूरमधल्या करमाळा तालुक्यातले. रोजगारासाठी पुण्यात आलेले. शौचालय साफ करणाऱ्या कुटुंबाला शौचालयावरची खोली राहण्यासाठी मिळते, ती खोली अक्षयच्या वडिलांना मिळाली. साफसफाई आणि बिगारी काम करून ते आपलं घर चालवत. पण या कामातून दोनवेळचं अन्न मिळेल याची बोरे कुटुंबियांना खात्री नसायची. आपण भोगलं ते मुलाच्या वाट्याला येऊ नये म्हणून अक्षयच्या आईवडिलांनी त्याला चांगलं शिक्षण द्यायचं ठरवलं.
अक्षयचा स्वभाव लहानपणापासून लाजाळू. तो कोणाशी फारसा बोलत नसायचा. घरात बसून अभ्यास करायचा. बाकीच्या वेळात टीव्हीवर अंतराळ-विज्ञानावरचे कार्यक्रम बघायचा. यातून तो आपण अंतराळ-विज्ञानात करिअर करण्याचं स्वप्न रंगवायचा.
पाचवीपर्यंत त्याला अभ्यासात फारशी गती नव्हती. पण करिअरच्या स्वप्नामुळे तो झपाटल्यासारखा अभ्यास करू लागला. पुढे त्याने दहावीत 92 टक्के गुण मिळवले आणि अकरावीला पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.
मार्च 2020मध्ये अक्षयची अकरावी संपत आली होती. त्याचवेळी कोविडची साथ भारतात आली. कोविडचे रुग्ण वाढत होते. डॉक्टरांची संख्या कमी पडत असल्यामुळे रुग्णांचे हाल होत होते.ही परिस्थती बघून अक्षय व्यथित व्हायचा. म्हणून अंतराळ-विज्ञानात करियर करायचं स्वप्न बाजूला सारून त्याने डॉक्टर व्हायचं ठरवलं. त्या दृष्टीने तो तयारीला लागला.
वैद्यकीय शिक्षणासाठी नीटची परीक्षा पास होणं आवश्यक असतं. पण परिस्थितीमुळे तो नीटचा क्लास लावू शकत नव्हता. म्हणून त्याने इंटरनेटवरून अभ्यास सुरु केला. पुस्तकं वाचून आणि युट्युबवरील लेक्चर पाहून संकल्पना समजावून घेतल्या. आपल्या छोट्याशा घरालाच त्याने अभ्यासिका मानली.
अक्षय नीटच्या परीक्षेचा दिवसरात्र अभ्यास करू लागला. त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं आणि अक्षय 'नीट'ची परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाला. त्याला आता चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळतोय. अक्षयला डॉक्टर होण्यासाठी आणखी काही वर्षे मेहनत घ्यावी लागेल. पण परिस्थिती प्रतिकूल असताना नीटची प्रवेशपरीक्षा पास होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास युवकांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
सार्वजनिक स्वच्छतागृहात गेल्यावर तिथून कधी एकदा बाहेर पडतो असं वाटतं. पण अक्षयने कित्येक वर्षे अशा स्वच्छतागृहावर काढली. तिथे तो टाचून अभ्यासाला बसायचा. आपण एका सार्वजनिक संडासाच्या वर राहायला आहोत, या गोष्टीचा त्याने आपल्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊ दिला नाही. - श्रीकांत लक्ष्मी शंकर, सामाजिक कार्यकर्ते
अंक - फेब्रुवारी 2022
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा