वस्तीतले धडपडे : शिकण्यासाठी धडपडणाऱ्या मीनाताई

आर्थिक परिस्थिती बेताची असताना संसार सांभाळत शिक्षण घेण्यासाठी धडपडणाऱ्या महिलेविषयी..

सतिश उगले

आपल्याकडे आजही अनेक मुलींचं शिक्षण सुरू असतानाच त्यांची लग्नं लावली जातात. त्यामुळे बऱ्याच मुलींना इच्छा नसूनही चूल आणि मूल या चक्रात अडकावं लागतं. पण त्यातूनही मार्ग काढत अनेक बायका आपलं राहिलेलं शिक्षण पूर्ण करतात, आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी धडपडतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे 40 वर्षांच्या मीना वाघमारे. मीनाताईंनी लग्नानंतर शाळेत अर्धवट सोडलेलं शिक्षण पूर्ण करून पदवीपर्यंत मजल मारली. त्या आता एका संस्थेत शिक्षिका म्हणून काम करत आहेत. 

मीनाताईंचा जन्म लातूरचा. शाळेत त्या हुशार होत्या. सहावीपर्यंत त्या गावात शिकल्या. पण पुढच्या शिक्षणासाठी त्यांना दुसऱ्या गावाला जावं लागणार होतं. गावची फार कमी मुलं दुसऱ्या गावातल्या शाळेत जायची. मीनाताई त्यातल्याच एक.  

मीनाताईंच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती जेमतेमच. म्हणून त्यांनी अवघ्या तेराव्या वर्षीच मीनाताईंचं लग्न ठरवलं. आत्याच्या मुलासोबत मीनाताईंचा साखरपुडा झाला आणि दहावी पूर्ण झाल्या झाल्या घरच्यांनी लग्न लावून दिलं. मीनाताईंना पुढे शिकण्याची इच्छा होती. पण त्यांच्या सासऱ्यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी घरी राहूनच अकरावी आणि बारावी पूर्ण केली. बारावीचं वर्ष चालू असताना मीनाताईंना मुलगा झाला. 

त्यानंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब पुण्यातल्या नवीन शिवणे वस्तीत राहायला आलं. पती विष्णू वाघमारे पेशाने चर्मकार. त्यांना या व्यवसातून फारसे पैसे मिळत नव्हते. उत्पन्नात हातभार लावावा म्हणून मीनाताई काम शोधू लागल्या. चांगलं काम मिळण्यासाठी कौशल्यं हवीत या उद्देशाने बेकरी आणि बिल्डिंग मेंटेनन्स या कोर्सचा फॉर्म भरला. पण यावेळीही सासऱ्यांनी शिकण्यास नकार दिला. 

वाघमारे परिवार नवीन शिवणे वस्ती सोडून कोथरूडच्या लक्ष्मीनगरमध्ये आलं. इथे एका संस्थेचं ग्रंथालय होतं. मीनाताईंनी प्रयत्न करून तिथे ग्रंथपालाची नोकरी मिळवली. नोकरी करताना ताईंना पुन्हा शिक्षण पूर्ण करण्याची उर्मी दाटून आली. त्यांनी कसलाही विचार न करता टिळक महाराष्ट्र विद्यापिठात बी.ए.ला प्रवेश घेतला. या अभ्यासक्रमाचे आठवड्यातून दोन दिवसच तास व्हायचे. त्यामुळे घर आणि नोकरी सांभाळून त्यांनी पदवी मिळवली. पदवीनंतर मीनाताईंनी एम.ए. ला प्रवेश घेतला. एक वर्ष शिकल्या, पण पैशांच्या अडचणींमुळे त्या एम.ए.चं शिक्षण पूर्ण करू शकल्या नाहीत. 

आधीच्या संस्थेचं ग्रंथालय बंद पडलं आणि दुसऱ्या एका संस्थेचं ग्रंथालय सुरू झालं. अनुभवामुळे आता याही संस्थेत ग्रंथपालाचीच नोकरी मिळाली. काही वर्षांनंतर त्याच संस्थेने त्यांना लहान मुलांना शिकवण्याची जबाबदारी सोपवली. ती त्यांनी आनंदाने स्वीकारली. लक्ष्मीनगरमध्ये मीनाताईंची आता शिक्षिका म्हणून ओळख तयार झाली आहे. आपलं शिक्षण अर्धवट राहिलं आणि आता वय उलटून गेलंय, अशी खंत वाटत असेल; तर मीनाताईंकडे बघा. 



माझं शिक्षणाचं वय उलटून गेलंय, असं मला अजूनही वाटत नाही. संधी मिळाली तर माझं राहिलेलं शिक्षण पूर्ण करून आणखी शिकण्याचा प्रयत्न करेन. 

- मीना वाघमारे

अंक - जून 2022


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वस्तीतले धडपडे : पुण्यातल्या तृतीयपंथीयांच्या सन्मानासाठी झटणाऱ्या चांदणी गोरे

वस्तीतले धडपडे : विद्यार्थ्यांच्या रूपात स्वत:चं स्वप्न पूर्ण करणारा हनुमंत रेगी

कथा संघर्षाची : रॉकस्टार मंगलताई