वस्तीतले धडपडे : ‘चटकदार मसाले'वाले रामनगरचे आजोबा-आजी
दुचाकीवर फिरून वस्त्या-वस्त्यांमध्ये चटकदार मसाले पोहोचवणारे रामनगरमधील जिगरबाज अवताडे आजोबा आणि त्यांच्या पत्नीची ही प्रेरणादायी गोष्ट
पांडुरंग अवताडे. वारज्यातील रामनगर वस्तीत राहणारे सत्तर वर्षांचे जिगरबाज आजोबा. पुण्यातल्या बऱ्याचशा वस्त्यांमध्ये त्यांची मसालाविक्रीची दुचाकी गाडी पाहायला मिळते. त्यांच्या गाडीवर लावलेल्या मसाल्याच्या पाटीकडे खवय्याचं लक्ष जातंच जातं. कांदा, लसूण, कारळे, जवस, शेंगदाणा या चटण्या, हळद, काळा मसाला आणि गावरान आंब्याचं लोणचं घरीच बनवून ते विकण्याचं काम पत्नी संगीताताई यांच्या साथीने मागील 25 वर्षांपासून न थकता करतायत.
पंधरा वर्षं हमाली; नंतर टाकले उद्योगाकडे पाऊल
1972 साली पडलेल्या दुष्काळानंतर सोलापूरच्या करमाळा भागातून अवताडे कुटुंबाने पुण्याची वाट धरली. इथे आल्यानंतर सुरुवातीची 7-8 वर्षं दोघा नवरा-बायकोने मिळून बिगारीकाम केलं. त्यानंतर पांडुरंगभाऊ पुणे स्टेशनवरील मालधक्क्यावर हमालीकाम करू लागले. 15 वर्षं ओझी उचलण्याची कामं केल्यानंतर माथाडी बोर्डातून चाळीस हजार रुपयांचं कर्ज घेऊन त्यांनी मिरची कांडप यंत्र खरेदी केलं. मिरच्या कुटून मसाला बनवून द्यायच्या कामाला संगीताताईंनी घरगुती मसाल्यांची जोड दिली.
मसाल्यांसाठी लागणारं सामान मार्केटयार्डातून आणलं जायचं. उन्हाळ्याच्या दिवसांत घरातील एका छोट्या खोलीत सगळे मसाले बनवले जायचे. घरी बनवलेले हे मसाले पांडुरंगभाऊ सुरुवातीला सायकलीवर फिरून पुण्यातल्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये विकायचे. आळंदी रोड, निगडी, हडपसर, स्वारगेट, पर्वती पायथा, वाघोली, कात्रज, बावधन या भागांतल्या अनेक वस्त्यांमध्ये त्यांनी हे मसाले विकलेत, आजही विकताहेत. संगीताताईसुद्धा टोपलं-घमेलं घेऊन वाड्या-वस्त्यांमध्ये हे मसाले विकायच्या. रामनगर भागातील हजारो घरांतील स्वयंपाकघरात ठाण मांडून बसलेले अवताडे यांचे हे मसाले चवीने खाल्ले जातायत.
25 वर्षं मेहनतीने मसाला व्यवसाय करणाऱ्या अवताडे दाम्पत्याने आपल्या चार मुलींची लग्नं याच व्यवसायाच्या जोरावर केली. जागा घेऊन स्वतःचं घरही बांधलं. ऊन-वारा-पावसातही रोजचा 50-60 किलोमीटरचा प्रवास करून पांडुरंगभाऊ मसाले विकतात. सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ते त्यांचं ठरलेलं काम पूर्ण करतात. मोबाइल वापरला की लोकसारखे फोन करून त्रास देतात, माल विकायला इकडे-तिकडे पळायला लागतं, म्हणून पांडुरंगभाऊंनी मोबाइल वापरणंही बंद केलंय. आपल्या कामाची आवड जोपासलेल्या या कष्टकरी माणसांचं काम प्रेरणादायी आहे.
आम्हा दोघांचंही शिक्षण झालेलं नाही. आकडेमोड करता यायची नाही म्हणून किराणा दुकान टाकलं नाही. मसाला बनवायचं काम मात्र आम्ही नेटाने केलं. एकदा तुम्ही आमच्याकडचा मसाला घेतला की पुन्हा तुम्ही आमच्याकडेच येणार! अशी शेकडो माणसं आमची गिऱ्हाइक झालीत. गोरगरिबांना चांगलं खायला मिळावं, त्यांच्या जेवणात तोंडी लावायला आपली चटणी असावी असं आम्हाला वाटायचं. हे स्वप्न आम्ही आमच्यापरीने पूर्ण केलंय असं वाटतं.
- संगीता अवताडे
अंक - मे 2023
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा